Thursday, 27 September 2018

गजर

गजर

नच आवडे मज, गजर हा प्रातःकाळचा,
उतरला कुठे अंमल, अजूनी त्या निद्रेचा ?

कडाडून विरोध, जड झाल्या पापण्यांचा,
संपला न संप सुस्तावल्या या अवयवांचा.

ओढलेली उबदार दुलई, गुलाबी थंडीची,
सोडवावी कशी, गोड ती मिठी सख्याची ?

घाई किती बाई, आदित्यास उगवण्याची,
संपली एवढ्यात, रात्रपाळी शशीधराची ?

गोष्ट बाकी ती, रात्रीच्या पाऊस झडीची,
तुटली अन् मालिका, कडू गोड स्वप्नांची.

अविट तरी गोडी, या सा-याच अपूर्णतेची,
नसे वेगळी याहून, व्याख्या मम सुखाची.

व्हावी रोज, ही अशीच सुरवात दिवसाची,
यास्तव करिते मी, प्रार्थना रोज ईशाची.
..........निलिमा देशपांडे.
२७/०६/२०१८,नवीन पनवेल.

नवसावित्री

नवसावित्री

नकोच मज तो, सात जन्माचा वायदा,
केला कुणी, वेठीस धरण्याचा कायदा ?

पाहिले कुणी रे, जनन मरणाचे चक्र?
नशीब, याजन्मी लग्नी नाही शनि वक्र.

ठाऊक मज आहे, न मिळेल दुजा कुणी,
तुझ्या सारखा सहचर, प्रेमळ अन् गुणी.

घेता, वैवाहीक जीवनाचा, मी रे परामर्श,
दिसती तृप्ती, समाधान, सौख्याची वर्ष.

नसावे ना, नाते परि इतके बंधनकारक ?
ठरेल ते, तुझ्या माझ्या भावनांना मारक.

हरेल काळ, इतकी श्रेष्ठ ना मी सावित्री,
सुख दुःखात असेल साथ, बाळग खात्री.

चल संपवू, इथले इथेच सारे भावबंध,
लिहील सटवाई, भाळी नवे ऋणानुबंध.

वाटले तुला मला, करू तेव्हाच करार,
पाहू खेळून नव्याने, हा लग्नाचा जुगार.

विसरून पूर्व प्रारब्ध, चल भेटू नव्याने,
हो तू नवा गडी, करू राज्य नवे सुखाने.

......... ...निलिमा देशपांडे.
२७/०६/२०१८, नवीन पनवेल.

Not the Google guy......

Not the Google guy......
just a गोगल गाय.......
गोगल गाय, गोगल गाय, 
तुझे आपले, पोटात पाय.
पाठीवर घर,मिरवित जाय,
असं कुणाचं,नशीब नाय.
जग, शर्यतीत धावतं हाय ?
ना देणं हाय, ना घेणं हाय.
मार्गीआपल्या, मुकाट जाय,
अध्यात नाय, मध्यात नाय.
ज्याचीच नियत, ठिक नाय,
तो माणूस, दूषण देतो हाय.
लबाडाला उपमा,तुझी  हाय,
जगाचा न्यायच, अजब हाय.
.......निलिमा देशपांडे. 
०१/०७/२०१८, नवीन पनवेल.

जिंदगी

दो हिस्सों में, बटी हैं जिंदगी,
दोनों से हैं, मेरी बंदगी ।
एक, पलकों के इस पार,
एक, पलकों के उस पार ।
इस पार, कुछ सपने अधूरे ,
उस पार, दुनिया हकीकत से परे ।
इस पार, है बस दुनियादारी ,
उस पार, हर बात सुनहरी । 
इस पार है, जीने की जगह ,
उस पार है, जीने की वजह ।
दोनों की सरहदे हैं , मुंदी पलके, 
डरती हूँ .......
कहीं, एक दुसरे में न छलके ।
.............निलिमा देशपांडे । ११/०७/२०१८, नवीन पनवेल ।

फळी

फळी

प्रत्येक कुटुंबात असं असतंच ना! जरी विभक्त कुटुंब पद्धतीत, एका घराची अनेक पोटघर झालेली असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे, सगळी कधी तरी एका छपरा खाली जमतात. त्यात मग  वेगवेगळ्या पिढ्यांच्या वेगवेगळ्या 'फळ्या' तयार झालेल्या असतात. एक senior most... आज्जी आजोबांची फळी,  एक आई बाबांच्या category ची middle  फळी आणि घरातल्या मुलांची, मग त्यात नवीन सुना पण included.....एक junior फळी. ..

. सगळं कुटुंब एखाद्या week end ला एकत्र जमतं. रात्रीची जेवणं आटोपल्यावर, थोड्या सामूहिक गप्पा झाल्यावर, एखादा junior declare करतो, "ए चला रे, seniors ना झोपू दे, आपण आपला अड्डा वरच्या खोलीत टाकू" असं म्हणून, धाडधाड निघून जातात. .... . मग strike होतं....आपण मागे उरलोय....म्हणजे आपणही 'senior फळी' त शामिल झालो.....पण फार दिवस नाही लोटलेले की...आपणही होतो 'त्यांच्या'  फळीत. वाईट वाटायला हवं होतं का?  वय झाल्याच्या जाणीवेनं?  पण चक्क नाही वाटलं. खुदकन हसायला मात्र आलं. उलट हायसं वाटतं. ...नकोच वाटतायत आताशा जागरणं....शिणलेली गात्र गादीवर विसावायला आसुसलेली असतात. मग वरच्या खोलीत.... चढणा-या हास्याचे मजले ऐकत निद्रेच्या अधिन व्हायचं ...एक आगळं समाधान मिळत असतं.  जे define नाही करता येणार ..पण मनावर हात ठेवला तर..... 'all is well'.... ऐकू येतं....एवढं मात्र नक्की ! आणि तेवढंच पुरेसं असतं की त्या दिवशी शांत झोप लागायला !
.............निलिमा देशपांडे.
१४/०७/२०१८, नवीन पनवेल.

लपंडाव

लपंडाव

चालत असते मी....
वळणं घेत घेत.. 
एकटीच !
पण मग अचानक एका वळणावर तू हात हाती घेतोस.
तो उबदार स्पर्श केव्हढा आश्वासक, हवाहवासा असतो !
मनाला उभारी मिळते.
पावलांना नवचैतन्य मिळतं
मग गंतव्याची घाई नसते.
प्रवास संपूच नये असं वाटतं.
आजूबाजूचं जगही रम्य वाटायला लागतं.
खुळ मन रमतं, हरखत जातं त्या दुनियेच्या भुलभुलैयात.
तरीही आपण हरवणार नाही याची खात्री असते.
कारण तू हात धरलेला असतोस नं
पण मग अचानक पुढल्या एका  वळणावर हात रिकामाच असल्याची जाणीव होते.
सैरभैर होतं मन !
कधी सोडलास हात ?...मला कळलं कसं नाही  ? 
या वाटांच्या जाळ्यातून, मी माझी वाट कशी शोधू  ?
वाट पहावी का? 
पण थांबणं, माझ्या हातात कुठे? 
मागे वळून पहायची तरी कुठे मुभा आहे ?
मग चालत रहाते निरिच्छेनं, जगरहाटी म्हणून. 
आता तर गंतव्याचीही उत्सुकता नाही, ओढ नाही.
बेफिकीरीनी घेत रहाते, पुढची अनिवार्य वळणं.
वाट चालणं आणि वाट पहाणं....दोन्ही अपरिहार्य  !
पण मग पुन्हा एका वळणावर तोच आश्वासक उबदार स्पर्श ! 
मनाची परत तीच आंदोलनं !
पण आता तरी सावध व्हावं का ?
माहित आहे....कुठच्या तरी वळणावर परत हात मोकळा होणार आहे.
आता मनाची तयारी आहे.
तुझ्या या लपंडावाच्या खेळाचीही सवय झालीये.
ठरवून टाकलंय जेवढ्या वळणांवर साथ देशील , 
तेवढेच क्षण भरभरून लुटायचे.
हात सुटला तरी मन शांत असतं आताशा !
कारण आता माहित असतं.....खात्री असते... .दिसला नाहिस ...तरी असतोस बरोबर !
भेटशीलच कुठच्या न कुठच्या अनवट वळणावर !
आवडायला लागलाय का....मलाही हा लपंडाव ????
.............निलिमा देशपांडे.
२८/०७/२०१८, नवीन पनवेल.

चव

*चव*

पण पिकतं तिथे विकत नाही....हे कालाबादीत सत्य आहे. 
माझा अनुभव...
खरं तर माहेर सासर...दोन्ही देशस्थच,  पण स्वयंपाकाच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक.  सासु बाई खुप लवकर वारल्या म्हणून मोठ्या दिरांचं लग्न खुप लवकर झालं. जाऊ बाई विदर्भातल्या असल्या मुळे  त्यांच्या स्वयंपाक झणझणीत. आणि शिवाय...चव....टाकण्याची....म्हणजेच चवीपुरते..साखर किंवा गुळ टाकायची तर अजिबातच पध्दत नव्हती. त्यामुळे माझं लग्न होईपर्यंत इतक्या वर्षात , घरच्या सर्वाना तीच चव अंगवळणी पडलेली.  माझ्या आई कडे मात्र सगळ्यातच 'चव' घालायची पध्दत त्यामुळे माझ्या जिभेला त्याच चवीची सवय.
पण गंमत अशी की,  माहेरी मी जरा अति लाडात वाढलेले. लग्न होईपर्यंत कोणत्याही कामाला कधी हात लावला नव्हता त्यामुळे स्वयंपाक करणं तर दूरचीच गोष्ट ! पण मला विचाराल तर ही गोष्ट माझ्या (आणि सासरच्यांच्याही)  पथ्यावर पडली. कारण मुळात स्वयंपाक  करताच येत नसल्याने....हाताला, कोणतीही विशिष्ट सवय  ( आणि चवही 🤪) नव्हती. त्यामुळे नवीन घरातील नवीन पध्दती आत्मसात करायला मला विशेष त्रास पडला नाही. घरचे सगळे  प्रेमळ आणि समजुतदार असल्याने, हळूहळू 'स्वयंपाक ' ही कला मी शिकले. तेही,  'चव' न टाकता,  चवदार पदार्थ करायला ! 
अधूनमधून..."आम्हाला नाही हो आवडत...तुझ्या माहेर सारखं...ज्यात त्यात साखर आणि गुळ घालणं."...असे मस्करी वजा टोमणे मिळायचेच. मला स्वतः ला मात्र अजूनही 'चव ' टाकलेला स्वयंपाकच आवडतो. पण म्हणतात ना....जैसा देस वैसा भेस....  तुम्हाला तसं आवडतं तर तसं....आपण बायका मुळातच फार adjusting आणि accomodative असतो नाही का? म्हणून मला कसलंच objection नव्हतं.
आणि परवा मात्र माझा हा 'समजूतदार' पणा अचानक मुर्खपणा ठरला.  मग मात्र मी बिथरले.
झालं असं की पाहूणे आले असता....नाश्ता,  पळस्पा फाट्या वरच्या दत्त स्नॅक्स मधून आणायचा...असं एकमताने ठरलं. माझे कष्ट तर वाचलेच शिवाय आयतं खायला मिळणार या आनंदात मी ( आणि चांगलं खायला मिळणार या आनंदात घरचे आणि दारचे😝😝)
आणलेल्या सगळ्या पदार्थांचा फन्ना पडला. सगळ्यांचच पोट आणि मन तृप्त झालं. त्यातही मला काही वावगं वाटलं नाही. कारण माझ्या culinary skills चा मला फाजिल अभिमान वगैरे नाही. 
 साबूदाणा खिचडीची जरा विशेषच तारीफ झाली. "आई तुझी कधीच अशी का नाही ग होत? "...इति लेक. मग मात्र मी तिरीमिरीत, त्या  'चवी ' च बिंग फोडलंच.  म्हटलं ,"अरे शहाण्यांनो, त्यात खंडीभर साखर टाकलीये म्हणून ती एवढी चविष्ट लागत्येय. आपल्या घरच्या खिचडीत ती तुम्ही मला घालूच देत नाही. नाही तर या खिचडीच्या तोंडात मारेल...अशी माझीही खिचडी होईल हो !"
क्षणभर सन्नाटा !  " नाही पण मला मात्र तुझ्याच हातची आवडते हो " . हे अर्थातच माझ्या 'better half' ची , घरातली परिस्थिती bitter होऊ नये म्हणून केविलवाणी  सारवासारव.  ....दुसरं काय !
मीही अर्थातच विषय वाढवला नाही.  पण आता मात्र सर्रास, सगळ्यात,  आठवणीने 'चव' टाकते. आणि घरचेही ते( मुकाट्याने तर तसही खातंच होते बिचारे. इतक्या वर्षात वळणंच तसं लावलंय मी ! )  'चवीनं ' खातात. 😁😁😁
.......निलिमा देशपांडे.
२९/०७/२०१८, नवीन पनवेल.

मैत्री असते.....

मैत्री असते.....
कधी खट्टी मिठी, कधी हट्टी,
चवी पुरती, थोडी कट्टी बट्टी.
थोडं caring, थोडं sharing,
जरी हटके, तरी not boring.
मुद्यावरून, गुद्यावरची भांडाभांडी.
मग गळ्यात पडून, थोडी रडारडी.

मैत्री असते....
शिकलेला, शिकवलेला धडा,
तुझ्या वाचून, माझा अडलेला घोडा.
"साथ मिलकर, करेंगे चल दंगा,
वक्त आने पर, लेंगे 'दुश्मन' से पंगा. "
"साला ! तू कभी नहीं सुधरेगा !"
"चल, तू भी क्या याद करेगा ?"

मैत्री असते.....
जेव्हा तुझ्या डोळ्यातंल पाणी,
माझ्या काळजाचं पाणी पाणी.
न कधी खोळंबा, न अडचण,
प्रत्येक वयातलं, ते पोरपण.
तुझं माझं, stress buster,
आयुष्याचं, hit block buster.

............निलिमा देशपांडे. ०५/०८/२०१८,नवीन पनवेल.

Will you love me, even then ?

Will you love me, even then ?

When I go Gray,
No more, 'I wish', only ' i pray'.
My hands, shaky,
Simple tasks, appear tricky.
All efforts, in vain
Social appearances, a strain.
Will you love me, even then ?

My mouth, dentured,
& memory, punctured.
Everyday, there is a stranger,
looking back, from the mirror.
Words, I speak again and again,
Sanity, no longer my terrain.
Will you love me, even then ?

Time is, nothing but sand,
But when, you hold my hand.
Weak flame in my eyes, still flickers, 
A smile, however faint, appears. 
Still, what they reflect, is pain,
There is nothing more to gain.
Will you love me, even then ?

End of the journey near,
A few breaths sheer.
Our story, I cannot rewind,
But our duet, lingers behind.
Even if life ceases it's reign,
I want to hold your hand again.
Will you love me, even then ?
...........Nilima Deshpande.
07/08/2018,New Panvel.

सख्या प्रेम मजवर तरीही करशील का?

कालच्या माझ्याच कवितेचा अनुवाद....

सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

केस आता होतील सारे रूपेरी
रमणे प्रार्थनेत  स्वप्न रंजनापरि 
भरेल रे बघ कंप आता करात
घ्यावी माघार ती कर्तेपणात 
प्रयत्नात जाणवेल व्यर्थता
वावरण्यात राहिल न सहजता
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

वसेल मुखी उपरी ती कवळी
खेळेल काळ विस्मरणाची खेळी
आरशात दिसे मज कोणी अनोळखी
रोज रोज नव्याने तोच मला पारखी
विचारहीन शब्दात मी असेन गर्क 
असेल सुंसंगतीशी तुटलेला संपर्क
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

जाईल रेती काळाची हातून वेगे निसटून
जाणवेल परि जादू तीच  तुझ्या स्पर्शातून
उजळेल मग मंदावलेली नयन ज्योत
उमलेल ओठी तेच जुने बघ स्मित
पडतील उघड्या जुन्या सा-या जखमा
उरतील वेदना बाकी, न आशा जमा
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

उरतील शेवटच्या प्रवासाचे काही क्षण
अन् मोजके काही श्वास पण
न अवगत काळ फिरवण्याची युक्ती
रेंगाळतील खचित काही या काव्यपंक्ती
जाईल अस्तास राज्य जरी ऐलतटी
हवा तुझाच हात हाती पैलतटी   
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 
............निलिमा देशपांडे.०८/०८/२०१८, नवीन पनवेल.

Replacement

Replacement

घाई घाईने आम्ही दोघी रोज रात्री ९ वा घरात शिरतो. ती खालमानेने आत येते. हात पाय धुवून direct स्वयंपाक घरात शिरते. ती येई पर्यंत दिवा सुध्दा लावला गेलेला नसतो. जाता जाता लटकवते ती   मला....fridge ला. मग direct दुस-या दिवशी  सकाळी, ताजा डबा कोंबला जातो, आणि आम्ही दोघी पडतो बाहेर,  धावत पळत ९:३२ ची लोकल गाठायला. मग दिवसभर ती तिच्या कामाच्या गडबडीत. इथेही तर तेच करायचं असायचं. 'वरिष्ठांची मर्जी सांभाळणे' ! आजूबाजूच्या राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करत, आपली कर्तव्य निभावायची....आणि मी....माझं निर्जीवपण गृहीत धरलेलं...... त्यामुळे तटस्थपणे तिची ही जगण्याची कसरत लांबून बघण्या व्यतिरिक्त मी काय करणार? पण तरीही आमच्या दोघींमध्ये एक धागा common असतो. तो म्हणजे.....both of us were 'replaceable ' ! ती office मधे तर होतीच पण घरीही.

हं ! धक्का बसला नं? अर्थात माझ्या बाबतीत तर...it was but obvious....पण तुम्ही म्हणाल... 'ही' पण  ? तर हो !..ती मुळातच त्या घरातली एक 'replacement' आणि ...'replaceable सोय' म्हणूनच आलेली होती २७ वर्षांपूर्वी. नव-याच्या दुसरेपणाची. दीड वर्षाचं पोर मागे सोडून त्याच्या पहिल्या बायकोने या जगातून exit घेतलेली. मग काय....लहान बाळाचं कारण पुढे करून..दोन महिन्यातंच तिचा दादला, बोहल्यावर चढला. हिच्या गरिबीने गांजलेल्या बापाने, चार पैकी एका तरी पोरीची,  बिना हुंडा ब्याद टळत्येय...या आनंदात....बिजवराच्या गळ्यात तिला बांधली. तिच्या येण्याने , सासरी....सासु सासरे, नवरा, बाळ...या  सगळ्यांचीच, 'सोय' झाली. प्रत्येकाची आपापल्या परीनं वेळ वेगळी ! आणि पहिल्याच दिवशी तिला जाणीव करून देेेण्यात आलेली....की तिने आपल्या वकुुबात रहावं... वेेेळ पडली तर तिही........'replaceable' आहे. तिचा नवरा तर तिला येता जाता ऐकवायचा," तुझ्या नोकरीची जास्त मिजास दाखवू नकोस......तुला माहितीये न...you are a replacement & you are        replaceable.......तू नहीं तो और सही...और नही तो......." असं म्हणून खदाखदा हसायचा.
 'स्वतःच्या' म्हणण्या सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गोष्टींमध्येे माझा नंबर लागत होता. आणि दोघींमधल्या 'त्या' common धाग्यामुळे की काय, तिला माझ्या बद्दल soft corner होता. खुप जपत होती ती मला.......शक्यतो replacement ची वेेळ माझ्यावर तरी येऊ नये म्हणून. एरवी घरी मी नजरेेसमोर असावी म्हणून fridge लाच अडकवून ठेवायची. आणि मुख्य म्हणजे तिकडे बाकी कोणी फिरकायचं नाही म्हणूनही असेल.  कारण ही घरात असली की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हातात मिळायची...म्हणजेे लागायची. अगदी पोटच्या मुुुलाप्रमाणे जीव लावलेल्या तिच्या सावत्र लेेेकालाही, तिची कदर नव्हती.....आडातंंच नाही तर पोह-यात कुुुठून येणार?  ती, त्याच्या साठी देखिल, एक 'replaceable सोय' होती. 

  रोजचं, आम्हा दोघींचं हेच routine होतं. Office मधून थकून भागून, रात्री उशिरा घरी आल्यावर,  मान वर न उचलताच, तिला, घरातल्यांच्या कपाळावरच्या आठ्या दिसायच्या. बोलायचं कोणीच नाही पण ते मौन आणि त्या टोचणा-या नजरा सुध्दा तिचं काळीज चिरत जायच्या. रोजच.काल तर दारा बाहेरंच किती वेळ ताटकळत उभं रहावं लागलं होतं. इतक्यांदा बेल मारूनही कोणी पटकन दरवाजा उघडला नव्हता. कारण मुळात,  दार उघडण्याचं 'काम' तिचंच होतं न. मग तीच घराबाहेर असल्यावर, ते उघडणार कोण  ? खरं तर 'तिचं घर'....तिचं?....हो आता इतक्या वर्षांच्या संसारानंतर,  लौकिकार्थाने ते 'तिचं घर' होतं ....तर तिचं हे घर भरलेलं होतं. माणसांनी आणि संपदेने देखिल ! पण समाधान ? कुणाच्याच वाट्याला आलं नव्हतं.  तिच्या तर नक्कीच नाही.  मी पहात्येय न....गेली पाच वर्ष तरी आहे मी तिच्या सोबत. जाता येता train च्या प्रवासात, ती मला तिच्या उराशी कवटाळून धरते. जाणवतात मला तेव्हा तिची स्पंदनं, तिच्या काळजातल्या वेदना. आणि तिच्या सोबत मीही जीर्ण होत जाते. माहित आहे करेल तीच एखादे दिवशी माझी replacement. पण मला माझी काळजी नाही. 

 Office मधला, आजचाही दिवस रोजच्या सारखाच गेलेला. नाही म्हणायला,  घरी आज थोडा बदल असणार होता. लेकाचं दोन आठवड्यांपूर्वी लग्न झालेलं.
 ती दोघं honeymoon ला बाली ला गेलेली, आज दुपारच्या  flight ने परतणारेत.
 म्हणजे आज संध्याकाळ पासून अजून एका जास्तीच्या  माणसाची तैैैनान तिला ठेवावी लागणार होती.....एवढाच काय तो फरक ! हो ! कारण नवीन सून उच्च शिक्षित, एका MNC त उच्च पदाधिकारी होती. तिच्या कडून कशाचीच अपेक्षा ठेवणं फोल होतं. म्हणून आज एका तासाचं concession घेऊन आम्ही निघालो. तेव्हा सुध्दा सायबाने, चार वाक्य सुनावूूून , डोंगरा एवढे उपकार केल्याच्या आविर्भावात तिला permission दिलेेली.

स्टेशन ला आलो तर गाड्यांचा गोंधळ ! अर्धा अर्धा तास सगळ्या trains late होत्या. Ladies डब्याला तर ही अशी प्रचंड गर्दी लोटलेली. मी तिची वाढती धडाधड ऐकत, होते बिलगून तिच्या उराशी.  Train आली आणि अपेक्षेप्रमाणे प्रचंड धक्काबुक्की झाली.  Train सुटली,  आणि तिचा एक पाय वर, एक खाली ! गाडी बरोबर थोड्या फरफटल्या गेलो असतो आम्ही दोघी. पण वेळीच आतल्या बायकांनी तिला वर ओढून घेतलं. नशीब !  काळ आला होता पण.....
ह्या सगळ्या गोंधळात तिची माझ्या वरची पकड अर्थातच सुटली. खेचाखेचीत माझे दोन्ही हात निकामी झाले. मला तर वाटलं ती आता तिथेच सोडून देईल मला. पण नाही.  त्याही परिस्थितीत,  तिने मला एका हाताने धरून ठेवलेलं. डब्यात चढल्यावर पुन्हा एकदा मला छातीशी कवटाळलं. तिची वाढलेली धडधड मला ऐकू येत होती. तिला कळत होती का.....माझी घालमेल  ?

खरं तर आज नवीन सुनेसाठी काही गोडधोड करावं. जमलंच तर कोथिंबीर वड्या कराव्यात....तिला आवडतात म्हणे....असा तिचा बेत होता. पण आता.....नेहमी पेक्षा जास्त गलितगात्र होवून तिने घराची बेल दाबली.  एकीकडे, थांबावं लागणार हे मनाशी घोकत.
आणि काय आश्चर्य ! बेल दाबल्या क्षणीच,  दरवाजा उघडला गेला. सुन हसतमुखाने दारात स्वागताला  उभी! " या या आई! किती दमलेल्या दिसताय ! द्या ती पर्स इकडे. अरे बापरे ! पूर्ण वाट लागलीये पर्सची ! काय झालं तरी काय? तुम्ही बसा निवांत सोफ्यावर.  मी पाणी आणून देते. मी केव्हापासून तुमची वाट बघत होते. लवकर ना निघालेलात office  मधून  ? I was worried.  मी अव्याला म्हटलं सुध्दा.  आईला फोन करून बघ !  But he didn't take it seriously.  म्हणाला "येईल! रोजच तर उशीरा येते. त्यात काय panic होण्या सारखं ! " you know , I didn't like that attitude of his. त्याला तर मी घेईन बघून. आणि आई,  . आज मी स्वयंपाक केलाय. सगळे नकोच म्हणत होते.  म्हणे 'ती आल्यावर करेल. सवय आहे तिला. मी म्हटलं nothing doing. मी तर बाकी सगळ्यांची जेवणं पण उरकून घेतलीयेत. चला आता तुम्हाला वाढते.तुम्ही आधी हातपाय धुऊन या. मी सगळं गरम करते. C'mon असं काय ghost बघितल्या सारखं करताय?  आणि हो जेवताना मला तुम्हाला आमच्या trip चे फोटो दाखवायचे आहेत हं. आणि आता मी आल्ये न. Of course I won't be able to replace your position in this house. But you don't worry. आपण दोघी मिळून कामं वाटून घेऊत. "

उत्साह आणि आपुलकीचा हा अनपेक्षित धबधबा अंगावर झेलत ती दगडा सारखी बसून होती आधी, स्वतःची कुडी आणि मला घट्ट कवटाळून.  पण मग हळूहळू तिची थकलेली गात्र सैलावत गेली. झिरपलीच ती आपूलकी आणि प्रेम तिच्यातही.किती वर्ष वाट पाहिलेली/ धडपडलेली यासाठीच !  आणि सगळ्या आशा सोडून दिल्यावर आज अचानक...हा असा वर्षाव ! 'उसके घर देर है, पर अंधेर नहीं....हेच खरं.

ती प्रसन्न मनाने,  मला हातात घेऊन उठली.  सवयी प्रमाणे मला fridge ला लटकावायला गेली आणि तिच्या लक्षात आलं....माझे हात तुटलेले. मग घेऊन गेली मला ती तिच्या bedroom मध्ये. आणि मायेनं हात फिरवत कपाटात ठेवलं. पहिल्यांदाच. 
एकीकडे सुनेची अखंड बडबड चालूच होती. " आणि हो आई, तुमच्या साठी मी तिकडून मस्त एक पर्स आणलीये.  आवडेल तुम्हाला.  नाही तरी ही तुटलेलीच दिसत्येय.  ती replace करून टाका ."
पण आता त्या replacement ची भिती उरली नाही.  तिलाही अन् मलाही !!!!! 
. ..............निलिमा देशपांडे. ०८/०८/२०१८, नवीन पनवेल.

हमारे जमाने में.......

हमारे जमाने में.......

आज ९१.९ fm वर पूर्ण 'शोले' सिनेमा लावलाय.  अर्थात audio. Tv वरही लागतो म्हणा ब-याचदा. पण सलग एका जागी बसून बघण्या इतके patience नाहीत आता. त्यामुळे तो येता जाता बघितला जातो. त्यामुळे मधले मधले scenes, miss out होतात. पण audio चा फायदा असा की ते पण येता जाता, ( काम करता करता) ऐकता येतं. आज इतक्या वर्षांनंतरही बरेचसे dialogues पाठ आहेत याचं, माझं मलाच आश्चर्य वाटलं आणि अर्थातच प्रचंड आनंद! आणि त्याच्या बरोबरीने तो तो scene डोळ्यासमोर साकार होत गेला. म्हणजे मी दृक्श्राव्य अनुभूती घेत होते. चालू असलेल्या dialogues च्या बरोबरीने किंवा आधीच पुढचा dialogue म्हणणं...यातला आनंद आमच्या पिढीला नक्की कळेल.  गंमत म्हणजे लेेेकही तेवढ्याच आवडीने ऐकत होती. आणि  'आईला dialogues पाठ आहेेत' was 'cool' for her.

पण आज प्रकर्षाने काय जाणवलं असेल तर..... dialogues तेच पण बदलत्या ( वाढत्या) वयानुसार, त्याचे अर्थ,  संदर्भ, मनात उमटणा-या प्रतिक्रिया,  सगळंच बदलतंय. केवळ २०,००० करता गब्बर सारख्या 'खुँख्वार मुजरीम' ला पकडायला तयार होणारे जय वीरू बापूडवाणे वाटले. हल्ली हजार करोडचे गफले  तर नागरीकच करून पळून जातात. तरी त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते.  Non stop बोलणारी, चुलबुली बसंती जास्तच आवडली. तो naiveness किंवा innocence हल्ली बालपणातून सुध्दा हद्दपार झालाय. Thanks to advance technology.  एकुलता एक मुलगा गमावणा-या रहिमचाचाचं दुःख,  मनाला जास्तच भिडलं. ठाकूर च्या प्रत्येक family member वर 'दागलेली' गोळी,  विशेषतः,  छोट्या मास्टर अलंकार वर, हृदयाची धडधड वाढवून गेली. जणू ती प्रत्येक गोळी आपल्याच छातीत घुसल्या सारखी वाटली. खरं तर प्रत्येक जागीच, काही तरी नवीन काही जाणीवा जन्म घेत होत्या. 

"इतना सन्नाटा क्यों है ", "मौसी चक्की पिसींग अॅन्ड पिसींग अॅन्ड पिसिंग.....",  "कितने आदमी थे ", "ये हाथ मुझे दे दे ठाकूर "......असे सगळेच dialogues मनात कायमची वस्ती करून राहिलेले आहेत.  एक एक dialogue अर्थपूर्ण ! विनोद निर्मीती असो, कारूण्य असो की आयुष्याची philosophy ! एकही शब्द  illogical,  Out of place नाही. हल्ली एवढ्या ताकदीचे, असे अजरामर होणारे dialogues, असतात का हो ...नवीन pics मध्ये  ?

निव्वळ अंगवळणी पडलेलं म्हणून हात काम करत होते. कान मात्र,  त्या कारटूनस् मध्ये दाखवतात तसे, रेडीओ च्या दिशेने वळलेले असावेत..  ...  मी काही 'नवीन' च्या विरोधात नाही.किंवा नवीन सगळंच टाकाऊ असंत असं तर मुळीच नाही.   बदलत्या काळानुसार नवीनही खूप चांगलं येतंय, येत राहिल. आता परवाचा 'कारवाँ ' पण तेव्हढाच enjoy केला.तरीही.....तरीही......एक घीसा पीटा dialogue,  सारखा मनात घोळत रहातोच....... " हमारे जमाने में....... "
..........निलिमा देशपांडे. १५/०८/२०१८, नवीन पनवेल.

कल्पना विलास

कल्पना विलासात, मला फार रमता येत नाही ,
वास्तवाशी जोडलेली नाळ, तोडता येत नाही.
असं नाही की....
मी स्वप्नच पहात नाही.
पण दोन्हीत मला फारसं अंतर जाणवत नाही.
असं नाही की....
आभाळाला गवसणी घालायची, महत्वाकांक्षाच नाही, 
पण कदाचित माझं आभाळंच ठेंगण आहे.
असं नाही की.....
मी फार नशीबवान आहे,
किंवा फारच अल्पसंतुष्ट !
पण एवढं ठाऊक आहे
स्वप्न पहायला झोप 'यावी' लागते
आणि मला ती, रोजच्या रोज 'गाढ लागते'.
आणि तेवढंच मला पुरेसं आहे.
म्हणूनच कदाचित.......
कल्पना विलासात मला फार रमता येत नाही,
वास्तवाशी जोडलेली नाळ, तोडता येत नाही.
................निलिमा देशपांडे.१६/०८/२०१८, नवीन पनवेल.

वांझोटी

वांझोटी......
भर दुपारची वेळ.
रेल्वे स्टेशनच्या तिकिट घराच्या पायरीवर लोळत होती ती तिघं. 
त्यातली ती दोघं...... त्यांचं नवजातपण पुरतं सरलं नव्हतं.
ती भावंड होती हे निश्चित.
दिसण्यातलं साम्य माझ्या या तर्कावर शिक्कामोर्तब करत होतं.
पण जुळी असावीत का ?
असतीलही.
आणि समजा असतील....तर काय ? 
झाली असेल का ती आई कृतकृत्य या आभाळ मायेने?
का कोसळलं असेल आभाळ तिच्यावर? 
निसर्गाकडे नसतो न गरिब श्रीमंतीचा भेद !
तो देताना भरभरूनच देतो.
पण मग माझी सुखवस्तू कुस का राहिली वांझोटी ?
प्रारब्ध ? हो....दुसरं काय ! 
महत्प्रयासाने काबूत ठेवलेलं मन पुन्हा बिथरलंच ! 
पाण्याच्या पडद्यामुळे, समोरचं दृश्य अचानक धूसर झालं.
उलट्या हातानेच टिपलं, त्या वेड्या पाण्याला.
कुणी पाहिलं तर नाही ?.....चोरून आजूबाजूला बघितलं.
वेळ कुणाला होता म्हणा !
नजर पुन्हा वळली त्या तिघांकडे.
नैसर्गिक बाळश्याच्या संपत्तीला अजून ओहोटी लागली नव्हती. 
आणि कुपोषणाने अजून आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं नव्हतं.
त्या अपु-या फाटक्या कपड्यांमधून ते ऐश्वर्य डोळ्यात भरत होतं. 
हं ! आणि तिसरं कोण...असंच न  ?
तिसरा होता त्या दोघांच्याच उंची एवढा ...टेडी. 
ह्या आगंतुकाचं आगमन होऊनही फार काळ लोटला नसावा.
रंग फिक्कटला असला तरी त्या दोघा भावंडांएवढा अजून तो मळकटला नव्हता. 
कुणी पैशानं आणि मनानं श्रीमंत ....झाला होता वाटतं ऊदार ! 
का कुणा शहजाद्याची त्याच्या वरची मर्जी खप्पा झाली होती ?
म्हणून हे बेवारस जगणं त्याच्या वाट्याला आलं ?
का सटवाईने त्याच्याही कपाळी लिहिलेलं प्रारब्ध ? 
अर्थात त्या पिटुकल्यांना तर काय ' आम खानेसे मतलब था, पेड़ गिनने से नहीं. '
किती गाढ झोपलेली ती !
जगाशी/ परिस्थितीशी अनभिज्ञ  !
निरागसतेचं अदृश्य पांघरूण ओढून !
तो टेडी देखील जणू त्यांचं दुःख समजू शकत होता. 
त्याने त्या दोघांना आपल्या कुशीत घेतलेलं.
कदाचित तेवढीच ऊब/आडोसा...त्या उघड्यावरच्या जगण्याला. 
त्या चिमुकल्यांची आई परत येईपर्यंत तो काळजी घेत होता.
पण मुळात....यांची आई....आहे न ?
आणि ती परतून येणार आहे न ?
नुसत्या विचारानेच गलबललं . 
पण दोन्ही पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी
असतं तरी मी काय करणार होते?  .
माझं दुःख/ काळजी पण वांझोटीच होती का ?
पण  मग जाणवलं...
निसर्ग माझी कुस उजवायला विसरला.
पण 'मातृत्वभावना'  द्यायचं त्याचं कार्य त्याने चोख बजावलंय .
मी निसर्गतः 'आई ' च आहे की !
पण हे तर सत्यच की  माझं आणि त्यांचं जगच वेगळं होतं.
जड पावलांनी, त्यांच्या जगाकडे पाठ फिरवून,
 मी वळले परत माझ्या विश्वात. 
आणि यावेळेस मात्र त्या वाहणा-या अश्रूंनी, माझ्या मनातला,
तो वांझोटेपणाचा कलंक धुऊन टाकला होता.
...........निलिमा देशपांडे.
०८/०९/२०१८, नवीन पनवेल.

Diet plan

Diet plan..

झाले बाई मी, ऋजुताची fan,
भावलाच 'तो', दोन तासाचा span.

डोळ्यासमोर, करिनाची कंबर,
मनात, " कब आएगा मेरा नंबर ?"

कश्शाकश्शात, माझं लागेना लक्ष,
'दोन तास', एवढं एकच लक्ष्य.

अचानक आले कि हो, डाॅ दीक्षित,
कसं बरं ठेवावं, त्यांना दुर्लक्षित?

दिवसातून दोनदा, भरघोस slot,
म्हणे, "वाट्टेल ते खा, फिकर not".

आता, नो diabetes, नो suger,
 वर bonus म्हणून, स्लिम figure.

आता मात्र, माझं जाम confusion,
मग करूनच टाकलं, दोन्हीच fusion.

जोपासली गेली, खाण्याची आवड,
व्यायामाला मात्र, मिळेना हो सवड.

सध्या... दर दोन तासांनी, पंच्चावन्न मिनटं,
आणि... वजनाचा काटा बिघडलाय वाट्टं.
...........निलिमा देशपांडे.  १०/०९/२०१८. नवीन पनवेल.

नाती

नाती
मनुष्यासारखी, त्याची आपसातली नाती देखिल नश्वर  आहेत.
हे तर निश्चितच !!
नात्यांची बीजं असतात.
ती आधी मनांच्या मातीत रूजावी लागतात.
मग प्रेम, काळजी, स्नेह,  सहवास, समजूतदारपणा यांचं खत पाणी.
खूप निगराणी करावी लागते.
तेव्हा कालांतराने अंकुर फुटतो.
पण मग मात्र, मत्सर, हेवेदावे, गैरसमज आणि
सगळ्यात महत्त्वाचं....ego...  ही किड लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.
त्यासाठी समाधानी वृत्ती, पारदर्शकता आणि मोकळा संवाद या सारखी किटक नाशकं, काळानुसार फवारणं गरजेचं आहे.
आणि त्या नात्याला बहरण्यासाठी, डवरण्यासाठी विशिष्ठ 'वेळ' व 'अवकाश' द्यावा लागतो.
काही वेळा जमिनच नापिक असते.
ते आपलं दुर्दैव !
पण ब-याचदा ही बंजर जमिनही, उपजाऊ होऊ शकते.
पण तिथे गरजेची असते ती मेहनत आणि  patience !
आणि इथे परत... "मीच का ?" ...हा प्रश्न उपस्थित झाला....की संपलंच सगळं.
उरते ती केवळ शुष्क औपचारिकता.
पण काही झालं तरी टाळी दोन हातानेच वाजते नं !
Adjustment आणि flexibility एकतर्फीच असेल तर त्याचीही काल मर्यादा ठरवायला हवी !
आपले निकष आपणच ठरवायचे.
असलेलं नातं आपल्याला किती महत्त्वाचं आहे?
मुळात ' गरज' आणि 'अपेक्षा ' हाच नात्याचा पाया असेल तर जन्मत:च ते अल्पायुषी असतं.
नाती "सांभाळावी लागतात".
पण मग ...जी 'सांभाळावी' लागतात....ती 'खरी नाती' असतात का ?
पण या 'ख-या' नात्याची तरी 'खरी' व्याख्या काय  ? 
जी नाती खरी असतात ...ती सांभाळावी/ टिकवावी का लागावी? 
खरी नाती मुळात असतात का  ?
की हे कपोकल्पितच?
असलीच तर ती कशी असतील? 
वादळ आलं तर / वेळ पडली तर....झुकणारी.
पण न मोडणारी.
वादळ शमल्यावर पूर्ववत होणारी.
लव्हाळ्या सारखी !
काही मोजकीच पण उत्स्फूर्त नाती निर्माण करता
आली तर ती निखळ आनंदाचा स्त्रोत बनतात.
आणि आपलं छोटंस आयुष्य समृद्ध करतात.
शुभं भवतु !!!!! 
........निलिमा देशपांडे.१२/०९/२०१८, नवीन पनवेल.

भाव

भाव...
विकल्या न गेलेल्या
मूर्ती 'तला' आणि मूर्ती 'चा'
आणि भक्ताचा......

रांगेत सारेच होते, बसले दिमाखात,
मांडलेले सा-यांनाच, जणू प्रदर्शनात.
कलियुगाचा, कशास दुसरा दाखला ?
विघ्नहर्ताच, विक्रीस बाजारी मांडला.
दिसला तो एक, मात्र जरासा नाराज,
पुसिले मी,"काय झाले हो देवाधिराज ?"
"नच आवडलो रे, मी कुणा भक्ताला,
का लागावी ओहोटी, माझ्या प्रेमाला ?
मिळेल ना आता, घरचा नैवेद्य सुग्रास,
घरच्या पाहूणचाराचा, राहिला मानस.
न जाणे भोगतो, कोण्या कर्माची शिक्षा,
मिळण्या देवत्व, लागे करावी प्रतिक्षा "
स्थिती दीनवाणी, ती मला न पाहवली,
मग मीच देवाची, जरा समजूत घातली.
"जरी मुर्तिकाराने, ओतला मूर्तीत प्राण,
'भाव तेथेची देव' ,ही नसे अजूनी जाण.
निकष निवडीचा, वरवरचे ते रंग रूप,
वाटे, तुझ्या गोजि-या स्वरूपाचे अप्रुप. 
गोष्ट युक्तीची सांगतो, सोड रे विवंचना,
नशीब तुझे चांगले, टळली देह विटंबना.
अरे, आहेस तू देव अन् रहाशील तू देव,
रूजेल 'भाव' पुढल्या वर्षी, उतरता भाव".
............निलिमा देशपांडे.१३/०९/२०१८, नवीन पनवेल.

अच्छे दिन

अच्छे दिन

उठा रहा है बेचारा, नयी लुगाई के खर्चे,
खूब हो रहे है, लोगों में जलोटा के चर्चे।
पुछा, " कैसे चबाएगा ये लोहे का चना?"
तोडा है गिलास, तो भरेगा बारा आना ।
जलने वाले बोले, "हूर के गले में लंगूर",
लोगों के लिए तो खैर, सारे खट्टे अंगूर ।
कहाँ लोगों ने," बुढी घोडी, लाल लगाम ",
पर बड़े बुढों के लिए, हैं यह एक पैगाम ।
" भक्ति रस में तुम, दिन रात रहो मगन,
फिर हूस्न को भी, लगेगी तुम्हारी लगन ।
अपने बचे हुए दिन, क्यों रहे हो गिन ?
मित्रों, लो आ गए तुम्हारे भी 'अच्छे दिन' "!!!!!
......... निलिमा देशपांडे । १९/०९/२०१८, नवीन पनवेल ।

शब्दकैफ

शब्दकैफ.....
तू आणि शब्द,
मी दोंघांवर लुब्ध.
वाटे, पूर्व जन्मीचं संचित,
जणू, जग झालं अंकित. 
उतरवत गेले तुला, शब्दात,
मग्न मी, शब्दकैफात.
होत गेली, कविता साकार,
गोवला त्यात, तुझाही रूकार.
सुरू झालं, एक नवं पर्व,
सांगणारंच होते रे, तुला सर्व.
पण, 'मति कुंठीत प्रेमात,
अन् अवज्ञा अतिपरिचयात.'
दोघांनाही, धरलं गृहीत,
तिथेच चुकलं, गणित.
झालीच, 'ग' चीही बाधा,
कारण मी नव्हते ना रे, 'राधा' !
हो ! गाजवलाही थोडा हक्क,
तुलाही आवडंत होतं, पक्क !
मग का फिरवलीस, अशी पाठ ? 
पडत नाही रे आताशा, शब्दांचीही गाठ.
..........निलिमा देशपांडे.२१/०९/२०१८,नवीन पनवेल.

माझ्या नव-याच्या, तीन वाढदिवसांची एक गोष्ट'

' माझ्या नव-याच्या, तीन वाढदिवसांची एक गोष्ट'

आज २२ सप्टेंबर !  
मग आजचा दिन विशेष काय? 
तर... आज माझ्या नव-याचा 'पहिला' वाढदिवस ! 
हं हं हं असं विचित्र बघू नका . 
पहिला म्हणजे 'तसा' पहिला नाही हो. 
तर या calendar year मधला पहिला.  
आणि नाही तरी tv मालिकांनीही आपल्याला सवय लावली आहे न !  
' एका लग्नाची दुसरी गोष्ट ' , एका लग्नाची तिसरी गोष्ट ',
झालंच तर latest ....माझ्या नव-याची  (दुसरी) बायको....
त्या धर्तीवर....माझ्या नव-याचा 'पहिला ' वाढदिवस. 
अजून थोडं नीट सविस्तर समजावून सांगू का  ? 
अहो म्हणजे....असं बघा...शिवाजी महाराजांचे नाही का....
.वर्षातून दोन वाढदिवस असतात....तसं ! 
अर्थात ही comparison इथेच थांबते बरं का ! 
नाही म्हणजे....तसा मध्यम वर्गाला शोभेल/ झेपेल एवढा 'करारीपणा', 'बाणेदारपणा' वगैरे गुण पण आहेत बरं का. 
झालंच तर आयुष्यातील त्या त्या टप्प्यावरचे 'किल्ले'  पण सर केलेले आहेतच. 
आणि  स्वगृही, 'स्वराज्य' प्रस्थापित केलेलं आहेच की !  ( आणि तसं घोषित करायला , मी त्याला केव्हाच परवानगीही दिली आहे.)
पण अर्थातच यदा कदाचित, कायद्यानं जरी परवानगी दिली असती, तरी.... पुतळा बाई,  सोयरा बाई.....असा ' अष्टवर्ग ' खचितच बाळगला नसता. 
असो !
म्हणूनच म्हटलं....comparison वाढदिवसा पुरतीच मर्यादित ठेऊ या.  
तर ...माझ्या नव-याचा हा पहिला वाढदिवस !  
त्याचं असं आहे की....हा पहिला वाढदिवस 'कागदोपत्री ', सरकारी दस्तावेजांमध्ये नमूद केलेला.
अहो,  ते मुलाला लवकर शाळेत अडकवण्यासाठी, वर्ष वाया जाऊ नये...म्हणून नाही का जन्म तारीख adjust करतात? 
तसा हा आजचा २३ सप्टेंबर .. official b'day.  
वर्षातला हा पहिला ! 
आता खरं तर technically, अजून एकच b'day possible होता. 
तो म्हणजे actual जन्म तारीख ! 
पण झालं असं की ' डिसेंबर ', या महिन्या बाबत एकमत होतं.
पण तारखे बाबत,  बाप लेकात dispute होतं. 
लेकाला म्हणजे माझ्या नव-याला वाटत होतं की २२ तारीख आहे.
आणि सासरे म्हणत होते ३ तारीख ! 
खरं तर वडीलांचा शब्द प्रमाण मानायला काहीच हरकत नव्हती. 
पण लेकाला ठामपणे वाटत होतं की आईने आपल्याला २२ सच तारीख सांगितली आहे.
बरं ! ह्यावर शिक्कामोर्तब करायला दुर्दैवाने सासुबाई हयात नाहीत. 
त्या खूपच लवकर गेल्या आणि त्या होत्या,  तेव्हा यांच्याकडे वाढदिवस वगैरे 'साजरे' करायची पद्धतच  नव्हती. 
तो पायंडा मी या घरात आल्यावर पाडला. 
मग कुणाचंच मन मोडायला नको म्हणून आम्ही आपले, तीनही तारखा...वाढदिवस म्हणून साजरा करतो. 
अर्थात काही वर्षांपूर्वी आजोबांच्या दस्तावेजांमध्ये ३ तारखेचा उल्लेख मिळाला.  
म्हणून '३ डिसेंबर' हा खराखुरा वाढदिवस...ह्याला सर्वानुमते मान्यता मिळाली. 
आणि २२ डिसेंबर मोडीत निघायला काहीच हरकत नव्हती. 
पण मुळातच आपण माणसं उत्सव प्रिय !  
म्हणून आम्ही, तीनही वाढदिवस साजरे करायची प्रथा चालूच ठेवली.  
अहो आणि शेवटी काय....'जगणं' हा 'सोहळा' आहे आणि तो आप्त स्नेह्यां सोबत साजरा करणं महत्त्वाचं  ! 
वाढदिवस....हे तर फक्त एक निमित्त  ! 
So....more the merrier  ! 
नाही का ? 
म्हणून म्हटलं....आज माझ्या नव-याचा 'पहिला' वाढदिवस आहे ! 
So....ज्याच्यामुळे माझं आयुष्य, खरोखरच परिपूर्ण  आहे, अशा माझ्या...literally,  'better half' ला..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!
............निलिमा. 
२२/०९/२०१८.नवीन पनवेल.

विसर्जन

विसर्जन

दिस दहा केले, पूजन अर्चन,
अन् असे हो आज, विसर्जन.

वास्तव्याचा, अपूर्व सोहळा,
आज, प्राण कंठाशी गोळा.

आधार जो, तरण्या भवसागर,
गंतव्य त्याचे,असे का सागर ?

नव्हत्या, लाटा आज उन्मत्त,
पदस्पर्शास हो, अलवार नत.
     
खळबळ, रत्नाकराच्या उरी, 
घ्यावे कसे, विधात्यास उदरी ?

बुडवी जग, त्यास जल्लोषात,
शिरे पहा पाणी, नाकातोंडात.

जीव माझा होई, घाबरा घुबरा,
वाटे ओरडावे, "जन हो सुधरा".

मुर्ती, हळू हळू होई दिसेनाशी, 
प्रथाच, मला मुळी आवडेनाशी. 

परि अंती, देवत्वाचीच सरशी,
येई आवर्जून तो, पुढल्या वर्षी.
..........निलिमा देशपांडे. २४/०९/२०१८,नवीन पनवेल.

मेहेरबान


आईची हरवलेली कहाणी


श्रावण


अमृतपान


घास


मीरा भक्ती


विठ्ठल


कहर


वाटसरू


सल, पागोळ्या, मेघा रे , पाऊस कविता आणि बटाटा पुरी, गारूड






आनंद शिदोरी


मनमर्जियाँ


Wednesday, 27 June 2018

ई-श्रीमंती

ई-श्रीमंती
प्लास्टिक बंदी आल्यामुळे,  सध्या रद्दीला सोन्याचे भाव,
पेपर पेपर जमवण्यासाठी, लोकांची धावाधाव.

 मी मात्र बसले होते, कविता पाडत मस्त,
आणि झेंगाट एक, मागे लागलं नस्त.

कालच पडली, आयकर विभागाची धाड,
आहे म्हणे तुमच्याकडे, अनाधिकृत रद्दीचे बाड.

खबर आहे म्हणे, अगदी पक्की,
सांगा कुठे लपवलीयेत, ते नक्की.

समजावले किती, डोळ्यात पाणी आणून,
"येतो घरात पेपर, केवळ परंपरा म्हणून.

नाही आम्हाला, पेपर वाचायची आवड,
इथे ई साहित्यातूनच, मिळत नाही सवड. 

हा...आहेत हजार बाराशे, जुन्या कवितांच्या वह्या,
दाखवू का वाचून?" मनी फुटल्या लाह्या.

"का करू तुमच्यावरच कविता, वानगी दाखल?"
म्हणाले, " क्या काटा है हमे, कुत्तेने पागल? "

आयकर वाल्यांची, झाली पळता भुई थोडी,
सोडल्यात म्हणे त्यानी, टाकायच्या धाडी.

खोट नाही सांगत, आम्ही पिढीजात प्रामाणिक ,
रद्दी विना कफल्लक, आम्ही ई साहित्यिक.
..........निलिमा देशपांडे.
०६/०४/२०१८, नवीन पनवेल.

e चोरी

वाढल्यात खरंच हल्ली, फार चो-या मा-या,
म्हणूनच शोधल्यात मी, काही ई तिजो-या.
झालीच साहित्यिक चोरी, तरी चिंता कशाला?
चार चौघात होतो, तेवढाच आपला बोलबाला.
तसही हल्ली, मी विचार करत नाही फारसा,
हा थोडाच आहे काही, साहित्यिक वारसा?
लिखाण माझं सर्व आहे फक्त स्वानंदासाठी,
(अहो म्हणजे fb आणि wa वरच्या, वाहवांसाठी.🤪)
क्षणिक अस्तित्वाचं आहे, या सा-याचं मुल्य,
माझ्यासाठी, माझ्या प्रतिभेचं  (?) 'असणं' च अमुल्य.
........निलिमा देशपांडे.
०७/०४/२०१८, नवीन पनवेल.

आनंद

आनंद
मनाचं आभाळ सारखं भरून येतं.
उगाचंच !
खरं म्हणजे मनमोराने पिसारा फुलवून नाचायला हवं नं? 
पण पिसारा घट्ट मिटवून, तोंड फिरवून बसतो वेडा.
काय हवं असतं याला नक्की ? 
असं वेड्या सारखं वागून तरी आनंद मिळतो का त्याला ? 
आनंद !
कुणी पाहिलाय ?  अनुभवलाय ?
कधीतरी ऊन होऊन येतो तो आनंद !
" क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ".
कधी बालकवींच्या श्रावणासारखा  !
पण आनंदाचा हा कवडसा असाच हुलकावणी देत असतो.
मुठीत धरायला गेलं तर मुठीच्या वर नाचत असतो. मुठ रिकामीच !
दोन्ही हातात पकडू म्हणे पर्यंत गायब ! 
परत दुसरीकडे  कुठेतरी वाकुल्या दाखवत लकाकताना दिसतो. 
की पुन्हा पळा त्याच्या मागे ! 
खरं तर पैशाने विकत मिळत नाही म्हणतात.
पण मग पहिल्या कमाईतून घरच्यांना घेतलेल्या छोट्या छोट्या वस्तू?
मिळालेला की आनंद..  त्यांनाही,  मलाही ! आणि हो त्यातच मिसळलेला अभिमान ! 
आईचा बोलका,  बाबांचा अबोल....नजरेतला !
तारूण्यात हे आनंदचांदणं लेऊन किती रात्री जागवलेल्या !
मग मुलांनी आणलेला.. बाळ मुठी भरभरून  !
वर्तमानात जगलं तर मिळतो म्हणे!
पण भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंता....यात वर्तमान कुठे निसटतो....तेच कळत नाही.
खरं तर आता जाणवतंय.....
पूर्वी कुठूनही केव्हाही कसाही कोणत्याही रूपात यायचा हा आनंद ! 
मग आताच का हा झाला असा अळवावरला थेंब? 
कुठेही न रेंगळता ओघळून जाणारा?  त्याचा ओलावा झिरपायच्या आतच ! 
काल मात्र अवचित मिळालेला.
Season चा पहिला आंबा खाताना  !
अवर्णनीय,  शब्दातीत  !
मग आठवलं,  माझी एक मैत्रीण आंब्याचा रस zip lock पिशव्यांमधे बंद करून fridger मधे साठवून ठेवते.
वर्षभरासाठी ! हवा तेव्हा हवा तेवढा काढून घ्यायचा, उरलेल्याची परत साठवण !
मी विचार करत्येय....हा आनंद सुध्दा असाच छोट्या छोट्या sachets मध्ये साठवून ठेवावा  !
भासलीच उणीव, तर एक एक sachet काढायचा. 
लागेल तसा वापरून परत मनाच्या कुपीत साठवून ठेवावा.
स्वतःसाठी आणि कधी दुस-यासाठी !
आनंदाचे डोही आनंद तरंग  !
जिंदगी के साथ भी...जिंदगी के बाद भी !
...........निलिमा देशपांडे. 

२१/०४/२०१८, नवीन पनवेल.

नातं, अपेक्षा आणि सापेक्षता

नातं, अपेक्षा आणि सापेक्षता......
अपेक्षा 'ठेवल्याने' की, 'न ठेवल्याने' एखादं नातं, मरत॔ किंवा तरतं?
या उत्तरावर एखाद्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं का?  ....
पण दिलेलं उत्तर... चूक/बरोबर ....कोण ठरवणार?  .
खरंच ! विचार करत्येय. 
इथे प्रत्येक गोष्टीला 'सापेक्षतेचा ' कस लागतो....लक्षात कसं आलं नाही आपल्या ?
खरं तर या जगात कुठलंच नातं 'निरपेक्ष' किंवा 'अपेक्षा विरहित ' नाही.
जिथे नातं आहे तिथे कोणती न कोणती अपेक्षा येतेच.
हं ! कदाचित त्या अपेक्षेत स्वार्थ नसेल....हि शक्यता आहे.
कळत नकळत का होईना किमान 'स्वानंद' तरी अपेक्षित असतोच ना ?
आम्ही बायका तर खरंच वेड्या असतो.
नाती जोडायची आणि ती जोडलेली नाती टिकवण्याचा आटापिटा आयुष्यभर  करायचा !
त्यात स्वतःचं अस्तित्व सुध्दा हरवून जातंय...हे कळतंच नाही.
कळतं तेव्हा उशिर झालेला असतो.
आणि हो,  एक चौकट लागते का...नात्याला ?
...... ...आर्थिक,  सामाजिक,  व्यावसायिक , कायदेशीर , रक्ताची वा मैत्रीची ?
आणि समाज मान्यता ?
सगळंच व्यक्ती सापेक्ष !
आणि नात्यात व्यवहारापेक्षा भावनिक गुंतवणूक जास्त असेल तिथे अपेक्षा जास्त .
आणि 'गरज' ? नातं गरजेवर अवलंबून असतं कि नात्यावर गरज ?
दोन्ही  ! संकल्पना पचायला जड आहे.
पण ते वास्तव आहे.
म्हणूनच ही नात्याची 'गरज' दोघांनाही असावी लागते.
पण नेहमीच ....एकाला जास्त,  दुस-याला कमी असते.
मग ज्याला जास्त  गरज....त्यानेच नेहमी पडतं घ्यायचं. लाचारी,  अगतिकता ?
मग कालांतराने आणि ओघाने येतोच तो..... अपेक्षाभंग !
पण मग आपणच ठरवायचं नं....नातं महत्वाचं असेल तर घालायची मुरड अपेक्षांना !
नातं तोडण्याने येणार दुःख आणि अपेक्षाभंगाचं दुःख....यात अधिक क्लेषकारक काय आहे ?
हे ठरवणं पण, व्यक्ती सापेक्षच असतं न?
तेव्हा...
माझ्या पुरतं तरी मी ठरवलंय......
जी नाती माझ्यासाठी अमुल्य आहेत.....ती रहाणारंच !
अपेक्षा पूर्ण होणं...न होणं....यावर आता ती अवलंबून नाहीत.
निदान माझ्या साठी तरी !
बाकीच्यांच आपण काय सांगावं ?
ते तर व्यक्ती सापेक्षच ! 
..........निलिमा देशपांडे.
०८/०५/२०१८, नवीन पनवेल.

ए दोस्त

ए दोस्त .....
आखिरकार जब पुंछ ही ली, तुमने हमारी खैरीयत,
कह न पाए, " हमें तुमसे नहीं,  जिंदगी से हैं शिकायत"

देखो, निभा न पाए, आज भी हम दुनियादारी,
कह न पाए, " सुनाओ कुछ तुम्हारी, सुनो कुछ हमारी "

गुमराह कर दिया तुम्हें, हमारी मुस्कुराहट ने,
कह न पाए, " ये करिश्मा किया है, तुम्हारी आहट ने"

पुछते गर तुम, "रहते हो क्यों आजकल गुमसुम ? "
कह न पाते, " हो खयालों में, बस तुम ही तुम "

पुछते गर तुम, " किस बात पर है नाराजगी? "
कह न पाते, " अहम् है जिंदगी में, तुम्हारी  मौजूदगी "
..........निलिमा देशपांडे ।
१७/०५/२०१७, नवीन पनवेल ।

Last Holiday

Last Holiday

असाच एक English picture बघितलेला,   ...'Last Holiday'......'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.

त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस  तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत  नव्हतं,  त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत,  उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते...."why now ?...आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?" 

पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता 'आणखी काही'  गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा  'दांभिक सभ्यतेचा' बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ 'प्रामाणिक ' रहाते/ वागतेे/ बोलते.

आणि तिला जाणवतं....आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना....आपण आयुष्य ख-या अर्थाने जगलोच नाही.  केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'....याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं." I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality " राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या departmental store owner लाही खरी खोटी सुनावते  ....त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.

आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत.... तिला कसलाही आजार नाही....ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday न शिकवलेला धडा, ती कधीच  विसरत नाही.

तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात... फिल्मी भाग सोडला तर खरंच विचार करायला लावणारा होता, नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास. आपणही,  ...आजचा/ आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही....मनात कायम उद्याची चिंता ! काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी ...कायम हातचं सोडून  पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो....इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या  ' सुट्टीत' उपभोगण्यासाठी , शिलकीत टाकत जातो....आणि हे सगळं व्यर्थ आहे....जे खरच हवं होतं...आनंद/ समाधान...हे या कशात नव्हतच. ......हेे कळायच्या आतच ....'शेवटची सुट्टी लागते'. शिलकीतली 'पुंजी' तशीच राहून जाते....न वापरलेली....कोरीच्या कोरी....पण आता निरूपयोगी  !

या 'शेवटच्या सुट्टी' पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर? तर प्रत्येक क्षण त्या 'सुट्टी' इतकाच आनंद देईल ! हो न ? 
........निलिमा देशपांडे. 
२२/०५/२०१८, नवीन पनवेल.

तुझ्या तोंडात साखर पडो....

"तुझ्या तोंडात साखर पडो"

मध्यंतरी, शं नां च पुस्तक वाचत होते,  त्यात हा वाक्प्रचार आला होता.  आणि एकदम जाणवलं,  किती कमी वेळा वापरतोय हा आपण हल्ली !

अर्थात त्याला 'साखर ' हा शब्द कारणीभूत असू शकतो.  अणू बाॅम्ब ला घाबरावं तसं सगळे हल्ली 'साखर' या शब्दाला घाबरतात.
आहारात समाविष्ट करायचं तर  सोडाच पण  बोलण्यात देखिल गोडवा आला तरी मधुमेह होईल की काय अशी लोकांना भिती वाटत असावी आजकाल. 

आणि परवा काय झालं, एक मैत्रीण रस्त्यात भेटली. मला आवर्जून थांबवून म्हणाली, "अग गंमत सांगू का ? मला न काल स्वप्न पडलेलं.... तु तुझ्या नवीन घरात रहायला गेलीयेस आणि घराचा खुप मोठ्ठा हाॅल आहे....अं....पण पुढचं नाही आठवते बाई  "
मला इतका आनंद झाला.  मी almost नाचत म्हटलं, " नको आठवु दे ग....तुझ्या तोंडात साखर पडो! "
तर चक्क, तिच्या तोंडात मी किडे घातल्याच्या आविर्भावात ओरडलीच माझ्या अंगावर ( आजुबाजुची चार डोकी वळली आमच्या कडे)  ,  "का ग असं ?मी काय तुझं घोडं मारलं? मी तुझ्या साठी एवढं छान स्वप्न पाहिलं तर 'thank you' म्हणणं तर दूरच..... आणि वर मला शाप देत्येस...  ! मैत्रीण म्हणवतेस न स्वतःला?  मग अशी वैरीणी सारखी का वागलीस?" 
मला कळेचना...  माझं काय चुकलं? " अग अग.....काय झालं?  मी तुझ्या स्वप्नात आले आणि तु माझ्या प्रगतीची इच्छा केलीस.. म्हणून आनंदानेच म्हटलं  ..तुझ्या तोंडात साखर....."
" तेच तेच.... एक वेळ विष म्हणाली असतीस तरी चाललं असतं ...पण  'तो' शब्द सुध्दा उच्चारू नकोस. नुसतं तो शब्द कानावर पडल्याने पण वजन वाढेल..... 'तुझ्या सारखं !'  सध्या dieting वर आहे न  मी.  १०० ग्रॅम कमी झालंय..... एका आठवड्यात ! केवळ साखर वर्ज्य केल्याने..... आता बोल "

मी काय बोलणार कप्पाळ !...मला जाडी म्हटल्याचा राग व्यक्त करू की...अग बाई मी तुला thank you च म्हणत होते......हे समजावण्याचा प्रयत्न करू?  .....तेच मला कळेना ! 
आ वासलेलं माझं तोंड मी गपकन् मिटलं. आणि " thank you " म्हणून विषय बदलला. 'तिच्या लेकिचा अन् तिचा dp कित्ती गोड आलाय'  असं म्हटलं ....तेव्हा  कुठे ती शांत झाली.
 मग पुढचा अर्धा तास तिच्या लेकिच्या कौतुकाचं पुराण ऐकून घेतलं. आणि अधून मधून...." हो न ग ", " कित्ती छान ", " मग काय तर.." , वगैरे शब्दांची साखरपेरणी  ( पण अर्थात, तििच्या नकळत)करत, गप्पा मारून, दोघी परत आपापल्या दिशांना मार्गस्थ झालो.

मी चालायला लागले खरी....आणि मनातल्या मनात हसायला आलं.
पुन्हा त्या दिवशीचाच विचार मनात घोळायला लागला.  ' तुझ्या तोंडात साखर पडो '....किती दुर्मिळ झालंय हे म्हणणं !  असं का बरं ?

मी जस जसा विचार करायला लागले....तश्या काही कारणांच्या शक्यता डोक्यात आल्या.
पहिलं म्हणजे....ब्रिटिश ! हो ब्रिटिशच कारणीभूत आहेत ! कारण त्यांनीच तर आणली न ती आंग्ल भाषा....
जी आता आपल्याला आपल्या मायबोली पेक्षा सहज सोपी आणि सोयीची वाटायला लागलीये.
 त्यातले....'sorry' , 'thank you' या दोन शब्दांनी तर मायबोलीतले कितीतरी शब्द आणि भावना , आपल्या बोली भाषेतून हद्दपार केल्या
 ....  माफी मागणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं...यातलं अवघडलेपण संपवून टाकलं....किती short & sweet झालंय दोन्ही !

आणि पुढचं कारण डोक्यात आलं तेव्हा जरा अस्वस्थच झाले. हल्ली ....दुस-याच्या मनोकामना पूर्ण होवोत ....म्हणून मनापासून शुभेच्छा व्यक्त करणारे कुठे कोणी उरलंय ?
बहुतांशी सगळे... स्व...मध्ये रमलेले असतात. स्वतः पलिकडे दुस-याचा विचार करायला वेळच कोणाला आहे ?
 ' शुभेच्छुक ' ही जमात नष्ट व्हायच्या पातळीवर आहे. 
 हां ! आता...शिष्टाचार म्हणून,  उपचारादाखल....'wish' ...केलं जातं.आणि  म्हणून त्यासाठी...'thank you'...पुरेसं असतं.
पण खरंच ! किती कोरडेपणा आहे त्यात !
....."तुझ्या तोंडात साखर पडो"....यातलं....'तुझही भलं होवो'...या सदिच्छेचं उत्स्फूर्तपण,  भावनेचा ओलावा....कुठे  व्यक्त होतो ?
 आणि आता तर काय, या social media वरच्या emoji नी, अजूनच सगळं सोप्पं करून टाकलंय.

पण असो....कालाय तस्मै नमः !

घरी आल्या आल्या लेक म्हणाली,  "आई, उद्या पासून बहुतेक कामवाल्या मावशी यायला लागतील. आत्ता office मधून  येताना रस्त्यात दिसल्या. गावाहून आल्या वाटतं."
मी एकदम खुश होऊन म्हटलं," तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई! "
तर म्हणाली, "  ए आई, बाई आल्या तर मी कशाला साखर खाऊ ? तुला माहितीये न...मला गोड आवडत नाही ते. "
मी ' explain ' केलं की तिला खरंच साखर खायची नाहिये तर मी तिला 'thank you' म्हणत्ये.
 " अगं मग..thank you ...असं सरळ सोप्या मराठीत म्हण की. उगाच difficult words वापरून bore मारू नकोस. आणि तोंडात काही पाडायचंच असेल तर मस्त पैकी पाणीपुरी,  शेवपुरी,  वडापाव असलं काही तरी चमचमीत घाल नं. साखर काय? पकाऊ नुसती  "

आता बोला ! 
" काय म्हणताय?  काळजी नको करू ? सगळं ठीक होईल?
तुमच्या तोंडात साखर पडो बाई!!!!!" 
............निलिमा देशपांडे.
२३/०५/२०१८,नवीन पनवेल.

शिखर

मजल दरमजल करत, आयुष्याच्या शिखरावर आपण चढायला सुरुवात करतो. तेव्हा, किती चढायचंय हे माहित नसतं . पण आपल्या  शिखराची उंची आपणंच ठरवायची...एवढं निश्चित. गाठलेली उंची, आपल्यासाठी पुरेशी आहे का  ? नसेल तर अजून वर चढण्यासाठी आपल्या कडे वेळ,  शक्ती आणि पात्रता आहे का ? नसेल तर अट्टाहास करावा का ? & ultimately,  is it worth it  ?

आणि हो ! शिखरावर पठार हे हवंच.  नसेल तर तेही आपणच तयार करायचं ! अर्थात थांबायचं तर नाहीच. पण गती थोडी मंद करून, गाठलेल्या उंचीचा आनंद घ्यायचा. आयुष्याच्या या मुक्कामी, एक दीर्घ श्वास घ्यायचा.....ज्या दरीतून वर आलो तिथे डोकावून पहायला हरकत नाही. चढून आलेली दरी जितकी खोल, तितकं मोठं आपलं यश ! या यशााचा आस्वाद घ्यायचा. तिथली हवा श्वासात ओढून, पेशीपेशीत भरून घ्यायची. हं ! मात्र, तिथलं वारं डोक्यात शिरणार नाही,  याची काळजी घ्यायला हवी.

शिवाय वरती चढून येण्याच्या चुरशीत, चढावावरची, काही सौंदर्य स्थळं, नजरेतून सुटली असतील. तेव्हा वेळे अभावी नाही उपभोगता आलं ते सुख ! हरकत नाही. या शिखरावरून पाहतानाही त्यांच एक आगळं सौंदर्य असतं.  त्याचा आता तरी, आस्वाद घेऊच शकतो.

मात्र हे करताना गाफिल राहून चालणार नाही.  कारण,  चालतोय या पठाराची लांबी तरी कुठे माहितीये ? कधी अचानक उतार सुरू होईल ते कळणार नाही आणि नाहक गडगडत खाली येऊ. सतर्क राहिलो तर उतार जाणवेल.  मग तोही सावकाश उतरायचा . उताराची देखिल आपली एक नजाकत असतेच. अनुभवायची तीही .

तो उतारही संपणार, हे अटळ आहे. मात्र हा शेवट जिथे कुठे असेल तिथे , आनंद समाधान आणि तृप्ती आपल्या सोबत असावेत. एवढंच !!!!!
.........निलिमा देशपांडे.
०८/०६/ २०१८,
नवीन पनवेल.

मृगजळ


किताब


माल


फुंकर


ए दोस्त...


तीट


प्रतिक्षा


बाधित


मीराभक्ती


Tuesday, 3 April 2018

स्वप्न विश्व


कर्ज


ती....


साकव


मर्कट लीला


सनई चौघडा


बहावा


गवत फुला रे फुला


हितगुज


हद


Saturday, 17 February 2018

निर्माल्य


रविवारची कहाणी


सांध्य छटा


हरी चरण


अनुनय


Pretty woman


कोरडा


हो , मी आई आहे म्हणून.......


अंधार यात्रा


आगंतुक