Thursday, 27 September 2018

माझ्या नव-याच्या, तीन वाढदिवसांची एक गोष्ट'

' माझ्या नव-याच्या, तीन वाढदिवसांची एक गोष्ट'

आज २२ सप्टेंबर !  
मग आजचा दिन विशेष काय? 
तर... आज माझ्या नव-याचा 'पहिला' वाढदिवस ! 
हं हं हं असं विचित्र बघू नका . 
पहिला म्हणजे 'तसा' पहिला नाही हो. 
तर या calendar year मधला पहिला.  
आणि नाही तरी tv मालिकांनीही आपल्याला सवय लावली आहे न !  
' एका लग्नाची दुसरी गोष्ट ' , एका लग्नाची तिसरी गोष्ट ',
झालंच तर latest ....माझ्या नव-याची  (दुसरी) बायको....
त्या धर्तीवर....माझ्या नव-याचा 'पहिला ' वाढदिवस. 
अजून थोडं नीट सविस्तर समजावून सांगू का  ? 
अहो म्हणजे....असं बघा...शिवाजी महाराजांचे नाही का....
.वर्षातून दोन वाढदिवस असतात....तसं ! 
अर्थात ही comparison इथेच थांबते बरं का ! 
नाही म्हणजे....तसा मध्यम वर्गाला शोभेल/ झेपेल एवढा 'करारीपणा', 'बाणेदारपणा' वगैरे गुण पण आहेत बरं का. 
झालंच तर आयुष्यातील त्या त्या टप्प्यावरचे 'किल्ले'  पण सर केलेले आहेतच. 
आणि  स्वगृही, 'स्वराज्य' प्रस्थापित केलेलं आहेच की !  ( आणि तसं घोषित करायला , मी त्याला केव्हाच परवानगीही दिली आहे.)
पण अर्थातच यदा कदाचित, कायद्यानं जरी परवानगी दिली असती, तरी.... पुतळा बाई,  सोयरा बाई.....असा ' अष्टवर्ग ' खचितच बाळगला नसता. 
असो !
म्हणूनच म्हटलं....comparison वाढदिवसा पुरतीच मर्यादित ठेऊ या.  
तर ...माझ्या नव-याचा हा पहिला वाढदिवस !  
त्याचं असं आहे की....हा पहिला वाढदिवस 'कागदोपत्री ', सरकारी दस्तावेजांमध्ये नमूद केलेला.
अहो,  ते मुलाला लवकर शाळेत अडकवण्यासाठी, वर्ष वाया जाऊ नये...म्हणून नाही का जन्म तारीख adjust करतात? 
तसा हा आजचा २३ सप्टेंबर .. official b'day.  
वर्षातला हा पहिला ! 
आता खरं तर technically, अजून एकच b'day possible होता. 
तो म्हणजे actual जन्म तारीख ! 
पण झालं असं की ' डिसेंबर ', या महिन्या बाबत एकमत होतं.
पण तारखे बाबत,  बाप लेकात dispute होतं. 
लेकाला म्हणजे माझ्या नव-याला वाटत होतं की २२ तारीख आहे.
आणि सासरे म्हणत होते ३ तारीख ! 
खरं तर वडीलांचा शब्द प्रमाण मानायला काहीच हरकत नव्हती. 
पण लेकाला ठामपणे वाटत होतं की आईने आपल्याला २२ सच तारीख सांगितली आहे.
बरं ! ह्यावर शिक्कामोर्तब करायला दुर्दैवाने सासुबाई हयात नाहीत. 
त्या खूपच लवकर गेल्या आणि त्या होत्या,  तेव्हा यांच्याकडे वाढदिवस वगैरे 'साजरे' करायची पद्धतच  नव्हती. 
तो पायंडा मी या घरात आल्यावर पाडला. 
मग कुणाचंच मन मोडायला नको म्हणून आम्ही आपले, तीनही तारखा...वाढदिवस म्हणून साजरा करतो. 
अर्थात काही वर्षांपूर्वी आजोबांच्या दस्तावेजांमध्ये ३ तारखेचा उल्लेख मिळाला.  
म्हणून '३ डिसेंबर' हा खराखुरा वाढदिवस...ह्याला सर्वानुमते मान्यता मिळाली. 
आणि २२ डिसेंबर मोडीत निघायला काहीच हरकत नव्हती. 
पण मुळातच आपण माणसं उत्सव प्रिय !  
म्हणून आम्ही, तीनही वाढदिवस साजरे करायची प्रथा चालूच ठेवली.  
अहो आणि शेवटी काय....'जगणं' हा 'सोहळा' आहे आणि तो आप्त स्नेह्यां सोबत साजरा करणं महत्त्वाचं  ! 
वाढदिवस....हे तर फक्त एक निमित्त  ! 
So....more the merrier  ! 
नाही का ? 
म्हणून म्हटलं....आज माझ्या नव-याचा 'पहिला' वाढदिवस आहे ! 
So....ज्याच्यामुळे माझं आयुष्य, खरोखरच परिपूर्ण  आहे, अशा माझ्या...literally,  'better half' ला..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!!
............निलिमा. 
२२/०९/२०१८.नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment