Thursday, 27 September 2018

चव

*चव*

पण पिकतं तिथे विकत नाही....हे कालाबादीत सत्य आहे. 
माझा अनुभव...
खरं तर माहेर सासर...दोन्ही देशस्थच,  पण स्वयंपाकाच्या पद्धतीत जमीन अस्मानाचा फरक.  सासु बाई खुप लवकर वारल्या म्हणून मोठ्या दिरांचं लग्न खुप लवकर झालं. जाऊ बाई विदर्भातल्या असल्या मुळे  त्यांच्या स्वयंपाक झणझणीत. आणि शिवाय...चव....टाकण्याची....म्हणजेच चवीपुरते..साखर किंवा गुळ टाकायची तर अजिबातच पध्दत नव्हती. त्यामुळे माझं लग्न होईपर्यंत इतक्या वर्षात , घरच्या सर्वाना तीच चव अंगवळणी पडलेली.  माझ्या आई कडे मात्र सगळ्यातच 'चव' घालायची पध्दत त्यामुळे माझ्या जिभेला त्याच चवीची सवय.
पण गंमत अशी की,  माहेरी मी जरा अति लाडात वाढलेले. लग्न होईपर्यंत कोणत्याही कामाला कधी हात लावला नव्हता त्यामुळे स्वयंपाक करणं तर दूरचीच गोष्ट ! पण मला विचाराल तर ही गोष्ट माझ्या (आणि सासरच्यांच्याही)  पथ्यावर पडली. कारण मुळात स्वयंपाक  करताच येत नसल्याने....हाताला, कोणतीही विशिष्ट सवय  ( आणि चवही 🤪) नव्हती. त्यामुळे नवीन घरातील नवीन पध्दती आत्मसात करायला मला विशेष त्रास पडला नाही. घरचे सगळे  प्रेमळ आणि समजुतदार असल्याने, हळूहळू 'स्वयंपाक ' ही कला मी शिकले. तेही,  'चव' न टाकता,  चवदार पदार्थ करायला ! 
अधूनमधून..."आम्हाला नाही हो आवडत...तुझ्या माहेर सारखं...ज्यात त्यात साखर आणि गुळ घालणं."...असे मस्करी वजा टोमणे मिळायचेच. मला स्वतः ला मात्र अजूनही 'चव ' टाकलेला स्वयंपाकच आवडतो. पण म्हणतात ना....जैसा देस वैसा भेस....  तुम्हाला तसं आवडतं तर तसं....आपण बायका मुळातच फार adjusting आणि accomodative असतो नाही का? म्हणून मला कसलंच objection नव्हतं.
आणि परवा मात्र माझा हा 'समजूतदार' पणा अचानक मुर्खपणा ठरला.  मग मात्र मी बिथरले.
झालं असं की पाहूणे आले असता....नाश्ता,  पळस्पा फाट्या वरच्या दत्त स्नॅक्स मधून आणायचा...असं एकमताने ठरलं. माझे कष्ट तर वाचलेच शिवाय आयतं खायला मिळणार या आनंदात मी ( आणि चांगलं खायला मिळणार या आनंदात घरचे आणि दारचे😝😝)
आणलेल्या सगळ्या पदार्थांचा फन्ना पडला. सगळ्यांचच पोट आणि मन तृप्त झालं. त्यातही मला काही वावगं वाटलं नाही. कारण माझ्या culinary skills चा मला फाजिल अभिमान वगैरे नाही. 
 साबूदाणा खिचडीची जरा विशेषच तारीफ झाली. "आई तुझी कधीच अशी का नाही ग होत? "...इति लेक. मग मात्र मी तिरीमिरीत, त्या  'चवी ' च बिंग फोडलंच.  म्हटलं ,"अरे शहाण्यांनो, त्यात खंडीभर साखर टाकलीये म्हणून ती एवढी चविष्ट लागत्येय. आपल्या घरच्या खिचडीत ती तुम्ही मला घालूच देत नाही. नाही तर या खिचडीच्या तोंडात मारेल...अशी माझीही खिचडी होईल हो !"
क्षणभर सन्नाटा !  " नाही पण मला मात्र तुझ्याच हातची आवडते हो " . हे अर्थातच माझ्या 'better half' ची , घरातली परिस्थिती bitter होऊ नये म्हणून केविलवाणी  सारवासारव.  ....दुसरं काय !
मीही अर्थातच विषय वाढवला नाही.  पण आता मात्र सर्रास, सगळ्यात,  आठवणीने 'चव' टाकते. आणि घरचेही ते( मुकाट्याने तर तसही खातंच होते बिचारे. इतक्या वर्षात वळणंच तसं लावलंय मी ! )  'चवीनं ' खातात. 😁😁😁
.......निलिमा देशपांडे.
२९/०७/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment