Wednesday, 27 June 2018

शिखर

मजल दरमजल करत, आयुष्याच्या शिखरावर आपण चढायला सुरुवात करतो. तेव्हा, किती चढायचंय हे माहित नसतं . पण आपल्या  शिखराची उंची आपणंच ठरवायची...एवढं निश्चित. गाठलेली उंची, आपल्यासाठी पुरेशी आहे का  ? नसेल तर अजून वर चढण्यासाठी आपल्या कडे वेळ,  शक्ती आणि पात्रता आहे का ? नसेल तर अट्टाहास करावा का ? & ultimately,  is it worth it  ?

आणि हो ! शिखरावर पठार हे हवंच.  नसेल तर तेही आपणच तयार करायचं ! अर्थात थांबायचं तर नाहीच. पण गती थोडी मंद करून, गाठलेल्या उंचीचा आनंद घ्यायचा. आयुष्याच्या या मुक्कामी, एक दीर्घ श्वास घ्यायचा.....ज्या दरीतून वर आलो तिथे डोकावून पहायला हरकत नाही. चढून आलेली दरी जितकी खोल, तितकं मोठं आपलं यश ! या यशााचा आस्वाद घ्यायचा. तिथली हवा श्वासात ओढून, पेशीपेशीत भरून घ्यायची. हं ! मात्र, तिथलं वारं डोक्यात शिरणार नाही,  याची काळजी घ्यायला हवी.

शिवाय वरती चढून येण्याच्या चुरशीत, चढावावरची, काही सौंदर्य स्थळं, नजरेतून सुटली असतील. तेव्हा वेळे अभावी नाही उपभोगता आलं ते सुख ! हरकत नाही. या शिखरावरून पाहतानाही त्यांच एक आगळं सौंदर्य असतं.  त्याचा आता तरी, आस्वाद घेऊच शकतो.

मात्र हे करताना गाफिल राहून चालणार नाही.  कारण,  चालतोय या पठाराची लांबी तरी कुठे माहितीये ? कधी अचानक उतार सुरू होईल ते कळणार नाही आणि नाहक गडगडत खाली येऊ. सतर्क राहिलो तर उतार जाणवेल.  मग तोही सावकाश उतरायचा . उताराची देखिल आपली एक नजाकत असतेच. अनुभवायची तीही .

तो उतारही संपणार, हे अटळ आहे. मात्र हा शेवट जिथे कुठे असेल तिथे , आनंद समाधान आणि तृप्ती आपल्या सोबत असावेत. एवढंच !!!!!
.........निलिमा देशपांडे.
०८/०६/ २०१८,
नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment