Wednesday, 27 June 2018

ई-श्रीमंती

ई-श्रीमंती
प्लास्टिक बंदी आल्यामुळे,  सध्या रद्दीला सोन्याचे भाव,
पेपर पेपर जमवण्यासाठी, लोकांची धावाधाव.

 मी मात्र बसले होते, कविता पाडत मस्त,
आणि झेंगाट एक, मागे लागलं नस्त.

कालच पडली, आयकर विभागाची धाड,
आहे म्हणे तुमच्याकडे, अनाधिकृत रद्दीचे बाड.

खबर आहे म्हणे, अगदी पक्की,
सांगा कुठे लपवलीयेत, ते नक्की.

समजावले किती, डोळ्यात पाणी आणून,
"येतो घरात पेपर, केवळ परंपरा म्हणून.

नाही आम्हाला, पेपर वाचायची आवड,
इथे ई साहित्यातूनच, मिळत नाही सवड. 

हा...आहेत हजार बाराशे, जुन्या कवितांच्या वह्या,
दाखवू का वाचून?" मनी फुटल्या लाह्या.

"का करू तुमच्यावरच कविता, वानगी दाखल?"
म्हणाले, " क्या काटा है हमे, कुत्तेने पागल? "

आयकर वाल्यांची, झाली पळता भुई थोडी,
सोडल्यात म्हणे त्यानी, टाकायच्या धाडी.

खोट नाही सांगत, आम्ही पिढीजात प्रामाणिक ,
रद्दी विना कफल्लक, आम्ही ई साहित्यिक.
..........निलिमा देशपांडे.
०६/०४/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment