Thursday, 27 September 2018

वांझोटी

वांझोटी......
भर दुपारची वेळ.
रेल्वे स्टेशनच्या तिकिट घराच्या पायरीवर लोळत होती ती तिघं. 
त्यातली ती दोघं...... त्यांचं नवजातपण पुरतं सरलं नव्हतं.
ती भावंड होती हे निश्चित.
दिसण्यातलं साम्य माझ्या या तर्कावर शिक्कामोर्तब करत होतं.
पण जुळी असावीत का ?
असतीलही.
आणि समजा असतील....तर काय ? 
झाली असेल का ती आई कृतकृत्य या आभाळ मायेने?
का कोसळलं असेल आभाळ तिच्यावर? 
निसर्गाकडे नसतो न गरिब श्रीमंतीचा भेद !
तो देताना भरभरूनच देतो.
पण मग माझी सुखवस्तू कुस का राहिली वांझोटी ?
प्रारब्ध ? हो....दुसरं काय ! 
महत्प्रयासाने काबूत ठेवलेलं मन पुन्हा बिथरलंच ! 
पाण्याच्या पडद्यामुळे, समोरचं दृश्य अचानक धूसर झालं.
उलट्या हातानेच टिपलं, त्या वेड्या पाण्याला.
कुणी पाहिलं तर नाही ?.....चोरून आजूबाजूला बघितलं.
वेळ कुणाला होता म्हणा !
नजर पुन्हा वळली त्या तिघांकडे.
नैसर्गिक बाळश्याच्या संपत्तीला अजून ओहोटी लागली नव्हती. 
आणि कुपोषणाने अजून आपलं अधिराज्य प्रस्थापित केलं नव्हतं.
त्या अपु-या फाटक्या कपड्यांमधून ते ऐश्वर्य डोळ्यात भरत होतं. 
हं ! आणि तिसरं कोण...असंच न  ?
तिसरा होता त्या दोघांच्याच उंची एवढा ...टेडी. 
ह्या आगंतुकाचं आगमन होऊनही फार काळ लोटला नसावा.
रंग फिक्कटला असला तरी त्या दोघा भावंडांएवढा अजून तो मळकटला नव्हता. 
कुणी पैशानं आणि मनानं श्रीमंत ....झाला होता वाटतं ऊदार ! 
का कुणा शहजाद्याची त्याच्या वरची मर्जी खप्पा झाली होती ?
म्हणून हे बेवारस जगणं त्याच्या वाट्याला आलं ?
का सटवाईने त्याच्याही कपाळी लिहिलेलं प्रारब्ध ? 
अर्थात त्या पिटुकल्यांना तर काय ' आम खानेसे मतलब था, पेड़ गिनने से नहीं. '
किती गाढ झोपलेली ती !
जगाशी/ परिस्थितीशी अनभिज्ञ  !
निरागसतेचं अदृश्य पांघरूण ओढून !
तो टेडी देखील जणू त्यांचं दुःख समजू शकत होता. 
त्याने त्या दोघांना आपल्या कुशीत घेतलेलं.
कदाचित तेवढीच ऊब/आडोसा...त्या उघड्यावरच्या जगण्याला. 
त्या चिमुकल्यांची आई परत येईपर्यंत तो काळजी घेत होता.
पण मुळात....यांची आई....आहे न ?
आणि ती परतून येणार आहे न ?
नुसत्या विचारानेच गलबललं . 
पण दोन्ही पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी
असतं तरी मी काय करणार होते?  .
माझं दुःख/ काळजी पण वांझोटीच होती का ?
पण  मग जाणवलं...
निसर्ग माझी कुस उजवायला विसरला.
पण 'मातृत्वभावना'  द्यायचं त्याचं कार्य त्याने चोख बजावलंय .
मी निसर्गतः 'आई ' च आहे की !
पण हे तर सत्यच की  माझं आणि त्यांचं जगच वेगळं होतं.
जड पावलांनी, त्यांच्या जगाकडे पाठ फिरवून,
 मी वळले परत माझ्या विश्वात. 
आणि यावेळेस मात्र त्या वाहणा-या अश्रूंनी, माझ्या मनातला,
तो वांझोटेपणाचा कलंक धुऊन टाकला होता.
...........निलिमा देशपांडे.
०८/०९/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment