Wednesday, 27 June 2018

आनंद

आनंद
मनाचं आभाळ सारखं भरून येतं.
उगाचंच !
खरं म्हणजे मनमोराने पिसारा फुलवून नाचायला हवं नं? 
पण पिसारा घट्ट मिटवून, तोंड फिरवून बसतो वेडा.
काय हवं असतं याला नक्की ? 
असं वेड्या सारखं वागून तरी आनंद मिळतो का त्याला ? 
आनंद !
कुणी पाहिलाय ?  अनुभवलाय ?
कधीतरी ऊन होऊन येतो तो आनंद !
" क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ".
कधी बालकवींच्या श्रावणासारखा  !
पण आनंदाचा हा कवडसा असाच हुलकावणी देत असतो.
मुठीत धरायला गेलं तर मुठीच्या वर नाचत असतो. मुठ रिकामीच !
दोन्ही हातात पकडू म्हणे पर्यंत गायब ! 
परत दुसरीकडे  कुठेतरी वाकुल्या दाखवत लकाकताना दिसतो. 
की पुन्हा पळा त्याच्या मागे ! 
खरं तर पैशाने विकत मिळत नाही म्हणतात.
पण मग पहिल्या कमाईतून घरच्यांना घेतलेल्या छोट्या छोट्या वस्तू?
मिळालेला की आनंद..  त्यांनाही,  मलाही ! आणि हो त्यातच मिसळलेला अभिमान ! 
आईचा बोलका,  बाबांचा अबोल....नजरेतला !
तारूण्यात हे आनंदचांदणं लेऊन किती रात्री जागवलेल्या !
मग मुलांनी आणलेला.. बाळ मुठी भरभरून  !
वर्तमानात जगलं तर मिळतो म्हणे!
पण भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंता....यात वर्तमान कुठे निसटतो....तेच कळत नाही.
खरं तर आता जाणवतंय.....
पूर्वी कुठूनही केव्हाही कसाही कोणत्याही रूपात यायचा हा आनंद ! 
मग आताच का हा झाला असा अळवावरला थेंब? 
कुठेही न रेंगळता ओघळून जाणारा?  त्याचा ओलावा झिरपायच्या आतच ! 
काल मात्र अवचित मिळालेला.
Season चा पहिला आंबा खाताना  !
अवर्णनीय,  शब्दातीत  !
मग आठवलं,  माझी एक मैत्रीण आंब्याचा रस zip lock पिशव्यांमधे बंद करून fridger मधे साठवून ठेवते.
वर्षभरासाठी ! हवा तेव्हा हवा तेवढा काढून घ्यायचा, उरलेल्याची परत साठवण !
मी विचार करत्येय....हा आनंद सुध्दा असाच छोट्या छोट्या sachets मध्ये साठवून ठेवावा  !
भासलीच उणीव, तर एक एक sachet काढायचा. 
लागेल तसा वापरून परत मनाच्या कुपीत साठवून ठेवावा.
स्वतःसाठी आणि कधी दुस-यासाठी !
आनंदाचे डोही आनंद तरंग  !
जिंदगी के साथ भी...जिंदगी के बाद भी !
...........निलिमा देशपांडे. 

२१/०४/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment