Thursday, 27 September 2018

लपंडाव

लपंडाव

चालत असते मी....
वळणं घेत घेत.. 
एकटीच !
पण मग अचानक एका वळणावर तू हात हाती घेतोस.
तो उबदार स्पर्श केव्हढा आश्वासक, हवाहवासा असतो !
मनाला उभारी मिळते.
पावलांना नवचैतन्य मिळतं
मग गंतव्याची घाई नसते.
प्रवास संपूच नये असं वाटतं.
आजूबाजूचं जगही रम्य वाटायला लागतं.
खुळ मन रमतं, हरखत जातं त्या दुनियेच्या भुलभुलैयात.
तरीही आपण हरवणार नाही याची खात्री असते.
कारण तू हात धरलेला असतोस नं
पण मग अचानक पुढल्या एका  वळणावर हात रिकामाच असल्याची जाणीव होते.
सैरभैर होतं मन !
कधी सोडलास हात ?...मला कळलं कसं नाही  ? 
या वाटांच्या जाळ्यातून, मी माझी वाट कशी शोधू  ?
वाट पहावी का? 
पण थांबणं, माझ्या हातात कुठे? 
मागे वळून पहायची तरी कुठे मुभा आहे ?
मग चालत रहाते निरिच्छेनं, जगरहाटी म्हणून. 
आता तर गंतव्याचीही उत्सुकता नाही, ओढ नाही.
बेफिकीरीनी घेत रहाते, पुढची अनिवार्य वळणं.
वाट चालणं आणि वाट पहाणं....दोन्ही अपरिहार्य  !
पण मग पुन्हा एका वळणावर तोच आश्वासक उबदार स्पर्श ! 
मनाची परत तीच आंदोलनं !
पण आता तरी सावध व्हावं का ?
माहित आहे....कुठच्या तरी वळणावर परत हात मोकळा होणार आहे.
आता मनाची तयारी आहे.
तुझ्या या लपंडावाच्या खेळाचीही सवय झालीये.
ठरवून टाकलंय जेवढ्या वळणांवर साथ देशील , 
तेवढेच क्षण भरभरून लुटायचे.
हात सुटला तरी मन शांत असतं आताशा !
कारण आता माहित असतं.....खात्री असते... .दिसला नाहिस ...तरी असतोस बरोबर !
भेटशीलच कुठच्या न कुठच्या अनवट वळणावर !
आवडायला लागलाय का....मलाही हा लपंडाव ????
.............निलिमा देशपांडे.
२८/०७/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment