Thursday, 27 September 2018

नाती

नाती
मनुष्यासारखी, त्याची आपसातली नाती देखिल नश्वर  आहेत.
हे तर निश्चितच !!
नात्यांची बीजं असतात.
ती आधी मनांच्या मातीत रूजावी लागतात.
मग प्रेम, काळजी, स्नेह,  सहवास, समजूतदारपणा यांचं खत पाणी.
खूप निगराणी करावी लागते.
तेव्हा कालांतराने अंकुर फुटतो.
पण मग मात्र, मत्सर, हेवेदावे, गैरसमज आणि
सगळ्यात महत्त्वाचं....ego...  ही किड लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.
त्यासाठी समाधानी वृत्ती, पारदर्शकता आणि मोकळा संवाद या सारखी किटक नाशकं, काळानुसार फवारणं गरजेचं आहे.
आणि त्या नात्याला बहरण्यासाठी, डवरण्यासाठी विशिष्ठ 'वेळ' व 'अवकाश' द्यावा लागतो.
काही वेळा जमिनच नापिक असते.
ते आपलं दुर्दैव !
पण ब-याचदा ही बंजर जमिनही, उपजाऊ होऊ शकते.
पण तिथे गरजेची असते ती मेहनत आणि  patience !
आणि इथे परत... "मीच का ?" ...हा प्रश्न उपस्थित झाला....की संपलंच सगळं.
उरते ती केवळ शुष्क औपचारिकता.
पण काही झालं तरी टाळी दोन हातानेच वाजते नं !
Adjustment आणि flexibility एकतर्फीच असेल तर त्याचीही काल मर्यादा ठरवायला हवी !
आपले निकष आपणच ठरवायचे.
असलेलं नातं आपल्याला किती महत्त्वाचं आहे?
मुळात ' गरज' आणि 'अपेक्षा ' हाच नात्याचा पाया असेल तर जन्मत:च ते अल्पायुषी असतं.
नाती "सांभाळावी लागतात".
पण मग ...जी 'सांभाळावी' लागतात....ती 'खरी नाती' असतात का ?
पण या 'ख-या' नात्याची तरी 'खरी' व्याख्या काय  ? 
जी नाती खरी असतात ...ती सांभाळावी/ टिकवावी का लागावी? 
खरी नाती मुळात असतात का  ?
की हे कपोकल्पितच?
असलीच तर ती कशी असतील? 
वादळ आलं तर / वेळ पडली तर....झुकणारी.
पण न मोडणारी.
वादळ शमल्यावर पूर्ववत होणारी.
लव्हाळ्या सारखी !
काही मोजकीच पण उत्स्फूर्त नाती निर्माण करता
आली तर ती निखळ आनंदाचा स्त्रोत बनतात.
आणि आपलं छोटंस आयुष्य समृद्ध करतात.
शुभं भवतु !!!!! 
........निलिमा देशपांडे.१२/०९/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment