Thursday, 27 September 2018

भाव

भाव...
विकल्या न गेलेल्या
मूर्ती 'तला' आणि मूर्ती 'चा'
आणि भक्ताचा......

रांगेत सारेच होते, बसले दिमाखात,
मांडलेले सा-यांनाच, जणू प्रदर्शनात.
कलियुगाचा, कशास दुसरा दाखला ?
विघ्नहर्ताच, विक्रीस बाजारी मांडला.
दिसला तो एक, मात्र जरासा नाराज,
पुसिले मी,"काय झाले हो देवाधिराज ?"
"नच आवडलो रे, मी कुणा भक्ताला,
का लागावी ओहोटी, माझ्या प्रेमाला ?
मिळेल ना आता, घरचा नैवेद्य सुग्रास,
घरच्या पाहूणचाराचा, राहिला मानस.
न जाणे भोगतो, कोण्या कर्माची शिक्षा,
मिळण्या देवत्व, लागे करावी प्रतिक्षा "
स्थिती दीनवाणी, ती मला न पाहवली,
मग मीच देवाची, जरा समजूत घातली.
"जरी मुर्तिकाराने, ओतला मूर्तीत प्राण,
'भाव तेथेची देव' ,ही नसे अजूनी जाण.
निकष निवडीचा, वरवरचे ते रंग रूप,
वाटे, तुझ्या गोजि-या स्वरूपाचे अप्रुप. 
गोष्ट युक्तीची सांगतो, सोड रे विवंचना,
नशीब तुझे चांगले, टळली देह विटंबना.
अरे, आहेस तू देव अन् रहाशील तू देव,
रूजेल 'भाव' पुढल्या वर्षी, उतरता भाव".
............निलिमा देशपांडे.१३/०९/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment