Thursday, 27 September 2018

सख्या प्रेम मजवर तरीही करशील का?

कालच्या माझ्याच कवितेचा अनुवाद....

सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

केस आता होतील सारे रूपेरी
रमणे प्रार्थनेत  स्वप्न रंजनापरि 
भरेल रे बघ कंप आता करात
घ्यावी माघार ती कर्तेपणात 
प्रयत्नात जाणवेल व्यर्थता
वावरण्यात राहिल न सहजता
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

वसेल मुखी उपरी ती कवळी
खेळेल काळ विस्मरणाची खेळी
आरशात दिसे मज कोणी अनोळखी
रोज रोज नव्याने तोच मला पारखी
विचारहीन शब्दात मी असेन गर्क 
असेल सुंसंगतीशी तुटलेला संपर्क
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

जाईल रेती काळाची हातून वेगे निसटून
जाणवेल परि जादू तीच  तुझ्या स्पर्शातून
उजळेल मग मंदावलेली नयन ज्योत
उमलेल ओठी तेच जुने बघ स्मित
पडतील उघड्या जुन्या सा-या जखमा
उरतील वेदना बाकी, न आशा जमा
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 

उरतील शेवटच्या प्रवासाचे काही क्षण
अन् मोजके काही श्वास पण
न अवगत काळ फिरवण्याची युक्ती
रेंगाळतील खचित काही या काव्यपंक्ती
जाईल अस्तास राज्य जरी ऐलतटी
हवा तुझाच हात हाती पैलतटी   
सख्या प्रेम मजवर तरीही करशील का? 
............निलिमा देशपांडे.०८/०८/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment