कैफ
माणसाच्या जगण्याला कोणतातरी एक कैफ लागतो .
सकारात्मक नसेल तर नकारात्मकही चालतो .
आता हेच पहा ना ,
कैफ , सत्याचा नसेल तर असत्याचाही चालतो .
सत्याची कास धरून , ताठ मानेने तो जीवनात मार्गक्रमण करतो .
नाहीच तर असत्याच्या गर्ततेत स्वतःला हरवू न देण्याचा तरी प्रयत्न करत जगत रहातो .
कैफ , विजयाचा नसेल तर पराजयाचाही चालतो
विजयाच्या उन्मादात तर तो जगजेत्त्याच्या आविर्भावात जगत असतो.
नाहीच तर पराजयातल्या अपमानाचे कढ गिळत तरी उर्वरित आयुष्यातले काही क्षण काढतो .
कैफ ,आशेचा नसेल तर निराशेचाही चालतो .
आशेचे किरण, त्याला नेहमी उद्याची पहाट बघण्यासाठी जगायला लावतात.
पण त्या किरणांची प्रखरता सहन करण्याची क्षमता नसेल तर निराशेच्या अंधारात काही काळ तरी तो चाचपडत जगतोच .
कैफ , यशाचा नसेल तर अपयशाचाही चालतो.
यशाच्या शिखरावर असताना , स्वकर्तृत्वाचा टेंभा मिरवत तो जगत असतो.
पण आलच कधी अपयश तर त्याच खापर नशिबावर फोडत जगण्यात धन्यता मानतो .
कैफ , प्रेमाचा नसेल तर द्वेषाचाही चालतो .
प्रेमाच्या धुंदीत तर त्याला जगण्याचाच विसर पडतो.
मात्र द्वेषाची आग , त्याला आयुष्यभर जाळत जिवंत ठेऊ शकते.
कैफ , मिलनाचा नसेल तर विरहाचाही चालतो .
मिलनाच्या रंगात, स्वतःबरोबर तो साऱ्या जगाला रंगवत जगत असतो
मात्र विरहाचा क्षण देखिल त्याला एखादी विराणी गायला लावतोच
कैफ , यौवनाचा नसेल तर वृधत्वाचाही चालतो
यौवनाच्या मस्तीत सारे आयुष्य उधळून देत जगत रहातो
आणि वृद्धत्वाच्या असहाय्यतेत त्याच उधळलेल्या क्षणांचे हिशोब मांडत उर्वरित क्षण जगतो .
फार कशाला , मदिरा आणि मदिराक्षीच्या नशेत तर प्रत्येकजणच साक्षात स्वर्गलोकीचा इंद्र असल्यासारखा जगतो.
पण नाहीच मिळालं ह्यातलं काही तर बायकोने हातात दिलेल्या वाफाळलेल्या चहाच्या कपाचा आस्वाद घेताना , आपण सार्वभौम राजे असल्याच्या आभासात मजेत एक शीळ घालून तो क्षण तर साजरा करतोच करतो .
त्या त्या क्षणाचा एक कैफ असतो , तो तो क्षण जगण्याकरता जो गरजेचा असतो .
…………… निलिमा देशपांडे
No comments:
Post a Comment