सवय
माणूस कसला गमतीशीर प्राणी असतो नाही ! त्याला कसलीही ' सवय ' लागू शकते. वस्तूची किवा माणसाची ! हि सवय जर 'प्रमाणात' असेल , तर त्याच कौतुक होत . आवड , छंद, नाद , प्रेम …अशी गोड नाव दिली जातात . आणि हीच सवय जर अनाठायी असेल, प्रमाणाबाहेर असेल तर चक्क त्याला ' व्यसन ' म्हणून समाजाकडून तिचा धिक्कार होतो . आपल्या खूप जवळच्या माणसांची सवय होण , स्वाभाविकच असत. पण गम्मत म्हणजे , आपल्या दैनंदिन व्यवहारात , जी माणस आपल्या संपर्कात येतात , त्यांची पण आपल्याला सवय होऊन जाते . आणि मग एखाद्या विशिष्ट व्यवहारासाठी त्याच एका व्यक्तीशी communicate करायला आपण जास्त comfortable असतो .जस रोजचा इस्त्रीवाला,वाणी , पेपरवाला, electrician , plumber , भाजीवाला , फळवाला वगैरे वगैरे .हि मंडळी नेहमीची असली कि आपण त्यांच्यावर विशेष हक्क दाखवू शकतो. आपण त्याचे नेहमीचे ग्राहक असल्याने तो आपल्याला favours देतो, म्हणजे …कमी भाव लावण , चांगल्या प्रतीचा माल देण इत्यादी , असा आपल्याला ( उगाचच ) त्याच्या बद्दल विश्वास वाटायला लागलेला असतो . नकळत त्या व्यक्ती बद्दल आपुलकी तयार होते. एक वेगळा bond तयार होतो . पूर्वी ' family doctor ' अशी एक संकल्पना होती . कि मग़ कुटुंबात कोणालाही काहीही झाल कि पाहिलं ' doctor काकां ' कडे रवानगी व्हायची . डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ' नस ' माहिती असायची .डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास टाकला जायचा . पण गेले ते दिवस! हल्ली कपडे बदलतो तसे डॉक्टर्स हि बदलले जातात . अर्थात टाळी एका हाताने वाजत नाही ! असो ! तर सांगायचा मुद्दा हा कि ' सवय '! माझा कांदे बटाटेवालाही ठरलेला . एक दिवस अचानक त्याच्या जागी दुसराच माणूस होता . मी अस्वस्थ ! " का हो , ते नेहमीचे भाऊ दिसत नाहीत ? " " त्यांला नोकरी लागली बघा ! मी त्यांचा लहाना भाऊ ! आता मीच बागेन दुकान . " मी दोन मिनिट घुटमळले अन कांदे न घेताच परतले. उगाचच आपली फसवणूक झाल्यासारखं वाटल ! आता वास्तविक , ह्यात odd काहीच नव्हत . त्याला नोकरी मिळाली, तो गेला ! तो मला कशाला सांगत बसणारे ? मीही दोन तीन दिवसांनी मुकाट्याने कांदे बटाटे घेतलेच की ! आणि आता त्या 'नवीन भाऊ ' चीही सवय झाली ! म्हणूनच म्हटल न , माणसाच मन गमतीशीर असत ! अर्थात खूप जवळच्या माणसाची अशी ' replacement ' इतक्या सहजासहजी होत नाही , हा भाग वेगळा !
आज नेहमीप्रमाणे बँकांची काम आटोपून घरी येत होते. ऊन मात्र नेहमीप्रमाणे 'मी ' म्हणत नव्हत . रस्ता रोजचाच (तोही सवयीचा )! तशी एरवी नाकासमोरच पाहून चालायची सवय आहे. ( लहानपणापासुनच वळण हो !) पण तरीही काही विविक्षित ठिकाण आली , कि मान आपोआप वळतेच ! कारण ….सवय !! त्या प्रमाणे आत्ताही वळलीच ! भाजीवाल्या आज्जीच्या ठेल्याकडे ! गेली आठ वर्ष मी त्या आज्जीला तिथे बघतेय !! वय वर्ष …नक्की अंदाज बांधता येत नाही …पण साठीच्या पुढची …एवढ निश्चित ! काही बदल नाही तिच्यात ! छोटीशी कृश मूर्ती !अजूनही काळ्या असलेल्या केसांचा घट्ट आंबाडा ! चापून चोपून नेसलेली नववारी साडी ! आणि चेहेऱ्यावर कायम उत्साह !वयाच्या सुरकुत्यांनाही तिथ जागा नव्हती. पळस्पा फाट्याहून , रोज एवढी भाजी रिक्षात घालून घेऊन येते ! या वयात …. एवढे कष्ट घेणे…हे तिच स्वावलम्बन होत की मजबुरी ? कोण जाणे ! पण इमाने इतबरे ती ते करताना मला दिसते .अगदी वसा घेतल्या सारखा ! खर तर मी तिच्या कडून भाजी घेतही नाही. पण एक सवय ! जाता जाता …आज्जी तिथे आहे न …य़चि खात्री करायची आणि पुढे जायचं ! तीही हल्ली ओळखीच हसु हसते , माझ्याकडे बघुन ! नाही म्हणायला एकदा सलग ८-१० दिवस ठेला बंद दिसला . मग न रहावून , ज्या घराच्या बाहेर तिने तो ठेला टाकलाय , त्या लोकांना विचारलच , " काय हो हल्ली आज्जी दिसत नाहीत त्या !" " त्याचं मोती बिंदूच operation झालंय ! येतील १५ दिवसांनी " बापरे , म्हणजे मोतीबिंदू असताना देखील , ती एवढ्या लांबून रोज येत होती ! नकळत मी माझा विचार केला . अगदी धडधाकट असताना , वयाची जमेची बाजु असताना ( अर्थात आज्जीच्या मानाने ), केवळ , कपडे बदलायचा कंटाळा , म्हणून मी बऱ्याचदा बाहेरच पडत नाही ! मला वाटलं आता महिनाभर तरी काही ती यायची नाही ! कसे येऊ देतील , तिला तिच्या घरचे ! मी मोजले नाहीत , पण खरच मोजक्याच दिवसात म्हातारी , परत हजर ! डोळ्यांना झोकात काळा goggle लावुन ! " काय आज्जी कशा आहात ? खूप दिवसांनी ! goggle बाकी झकास बर का ! " आज्जी चक्क लाजली ! पदर तोंडाला लावून खुदुखुदू हसली' काय गोड दिसली ! " काय चेष्टा करताय माह्या म्हातारीची ! दागदर म्हनाल , हा मयना होउस्तो ऱ्हावदे . मला लई लाज वाटतीया . आमचं म्हातार बी चिडवत व्हत मला . म्हनला , जवानीत तुजी काय हौस मौज केली न्हाई म्या ! आता कर ! कायतरी उगा! " मला एकीकडे गम्मत वाटत होती . एकीकडे त्यातलं कारुण्य मनाला शिवून गेल ! " आज्जी आराम करायचा न अजून थोडे दिवस! कशाला घाई केली यायची ? " लागलीच तिच्या चेहेऱ्यावरच हसू मावळल. " हातावर पोट असणाऱ्यांच , हात थांबून चालत न्हाई ताई , कारन पोटाले थांबायचं म्हाईत न्हाई ! त्ये आता या जीवाबरोबरच थांबल ! न्हव का ?" " आज्जी एक विचारू ? राग तर नाही येणार ? " " ठाव हाय माह्या , काय इच्यारणार हायेस त्ये ! माह्या पोर बाळ न्हाईत का ? असच न ? " मी फक्त मान डोलावली . " व्हती ! एक सोडून दोन व्हती ! तरणी ताठी ! हाता तोंडाशी आलेला घास , नशिबान हिसकावून घेतला ! मागल्या टायमाला पूर आल्ता , त्यात घरादारासोबत दोगाबी वाहून गेली ! काय जाल कललच न्हाई . म्या आन धनी , दोगबी कामाव व्हतो . त्या रातीला आमाला घरी यायला भेटलच न्हाई . परत आलो , तवा सारच संपल्याल व्हत ! नवर्यान बी हाय खाल्ली ! त्यान हातारून धरल ! त्यो वापस उभाच ऱ्हायला न्हाय ! पार म म्या मातुर नशिबा इरूध उभा ऱ्हायलो ! जमल त्ये काम केल ! ताई ,खोपट तर उभं केल म्या . पन त्ये रितच ऱ्हायल वो , कायमच ! पर म्या हार मानलेली न्हाई ! आम्ही हौत दोग , एकमेकासाठी ! बास हाय ! " त्या काळ्या चष्म्या आडचा प्रलय मला दिसत नव्हता पण तिच्या दुःखाच्या प्रलयात मीच वाहून जाईन , अस वाटायला लागलं. माझ्या डोळ्याच्या कडा माझ्याही नकळत ओलावल्या होत्या. कोणत्या शब्दांनी सांत्वन करणार होते तीच ? तो दांभिकपणा नाहीच जमला मला . तेव्हढ्यात नशिबाने , हो ! नशिबानेच , फोन वाजला , आणि सवयीने मी तो झटकन उचलला ! तो घ्यायच्या निमित्ताने , नुसताच तिला हात करून पुढे गेले . माझ्या रोजच्या रस्त्याला लागले. पुढे मैत्रीण भेटली. आणि दोघीही , आपापल्या सात गाद्यांखालची दुःख उगाळण्यात रंगून गेलो ! सवयीने ! आज्जी च विश्व आमच्या सवयीच्या विश्वाचा भाग नव्हतच न !
रोजच्या सारख आजही सवयीनेच मी ठेल्याकडे पाहिलं ! आज तर ती चक्क शेवंतीची वेणी माळून आली होती ! आज्जी ओळखीच हसली! जणू एक सुंदर आयुष्य माझ्याकडे पाहून हसलं ! ते पाहुन उन्हाच्या प्रकाशात आक्रसलेला माझा चेहरा , इस्त्री फिरवल्या सारखा सरळ झाला आणि हसण्यासाठी ओठ मुडपले गेले . पण नुसत ओळखीच , सवयीच हसू हसण्यासाठी नाही! आज तिच्यातली ती जगण्याची उमेद, तिने तिच्या नुसत्या स्मितातून माझ्यात transfer केली होती रोजचाच, सवयीचा रस्ता मी चालत राहिले , पण आयुष्याकडे उदासीनतेने बघण्याची सवय मोडुन !
……………. निलिमा देशपांडे