Tuesday, 22 December 2015

आमचं तुमचं

" hello शक्या , कशी आहेस ग राणी ? Hello,hello , शलाका, अग बोल कि राणी काय झालय ? बोलत का नाहीयेस ? बरी आहेस ना ? काही झालंय का ? "
' मम्मा मम्मा , chill ! m fine ! don't panic as usual  अग अजून झोप नाही ग झाली. थोड्या वेळाने कर न फोन. "
" अग गधडे , सासरी न आहेस ? आणि अजून झोपायचं ? अग, आई बापाचा उद्धार करतील ना तुझ्या सासरचे ! "
" अग मम्मा , तुला गम्मत सांगु का ? आमच्या घरी न सगळेच उशिरा उठतात . mummy कालच म्हणाल्या , मुलांनो उगाच लवकर वगैरे उठून आमची झोप disturb करू नका. Sunday ला आपल्याकडे  ९ च्या आत कोणी उठायचच नाही , असा rule आहे . कसलं भारी न ? तुमच्या घरासारखी इथे hitlar गिरी नाही ह !" 
त्याच क्षणी अचानक , माझ्या हातातली ताकदच गेल्यासारखी झाली आणि फोन आपसूकच गळून पडला. त्याचे वेगवेगळे parts इतस्ततः विखुरले. अचानक जाणवलं , डोळ्यातही पाणी तरारलेल माझ्या ! अस का व्हावं ? 
mobile चे spare parts गोळा करताना जणू मी स्वतःला सुध्धा गोळा करत होते ! का अस झाल ? मग battery बसवता बसवता लक्षात आलं , शक्याच्या  बोलण्यातले ते  दोन शब्द ! कट्यारी सारखे काळजात घुसले होते. ' आमचं , तुमचं " !
आत्तापर्यंत जे ' आमचं' होत ते ' तुमचं ' कधी  झाल ? अचानक ? इतक्या पटकन ? 
काल  परवा पर्यंत हिनेच तर  , " अभ्या आमचं  कस असत न ? सगळ well  planned  ! तुमच्या सारख नाही ! मनात आल कि उठल आणि गेलं कुठेही , केव्हाही ! " असं अभिजीतला , तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ऐकवलेलं ! तेव्हा आपणच तिला झापलेल न ? " अग शक्या , अस ' आमच , तु मचं ' करू नये ग ! आता त्याचं घर पण तुझंच होणार न ! " तेव्हाही गळ्यात पडून नेहमीप्रमाणे लाडात येउन म्हणालेली " नाही ह मम्मा , आपलं ते आपलंच  ! " आणि आज ? लगेच party बदलली हिने ? खर तर आपल्या लेकीने नवीन घराला आणि नवीन घराने लेकीला, इतक्या लवकर आपलंस केल , ह्याचा आनद वाटायला हवा होता . मग अस का झालं ? डोळयात आलेलं पाणी , आनंदाश्रू होते कि ……. ?  
उत्तर माहित असूनही , माझ्या मनाशी देखील मला ते कबूल करायचं नव्हत . मुळात असतंच का हे ' आमचं , तुमचं ' ? एवढाच प्रश्न मनात घोळत राहिला !!! 
....... निलिमा देशपांडे. 

वाटा मनातल्या


आत्मविश्वास


Promise


Saturday, 5 December 2015

माझं घर

'गुंतणं' हा आपल्या मनाचा गुणधर्म आहे.  मग ते.... कुठे, कधी, कुणात, कशात...आणि का... गुंतेल, हे एक देवालाही न सुटणारं कोडं असावं.
ज्या अगणित गोष्टींमध्ये ते गुंततं, त्यापैकी एक असतं, 'आपलं स्वत:च घर'!
आज' जयविजय सोसायटीच्या ' म्हणजे पार्ल्याच्या माझ्या माहेरच्या घराच्या demolition ला सुरवात झाली.
फोटो बघितले आणि आठवणीं सोबत खुप काही दाटून आलं........

Thursday, 1 October 2015

तो......

'तो 'आपल्याला गाठतोच! कुठे न कुठे, कधी न कधी.  कितीही टाळलं तरी! कितीही ठरवलं, त्याच्या वाऱ्यालाही उभं रहायचं नाही किंवा त्याला थाऱ्यालाही येऊ द्यायचं नाही, तरीही' तो 'येतोच! कोणत्या तरी अवचित क्षणी, एखाद्या बेसावध वळणावर! तो जणू जातपात, लिंग भेद मानत नाही. त्याला आपल्या वयाशी, आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी, यशापयशाशी, घेण देण नसतं . जसं निराशेच्या खाईत, जणू हात धरून घेऊन जातो, तसाच आनंदाच्या अत्युच्च क्षणी देखील, असू शकतो, आपल्या सोबत!
जेव्हा त्याने असावसं वाटतं, तेव्हा त्याचा मागमूसही नसतो आणि जेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेनेही थरकाप होतो तेव्हा दत्त म्हणून हजर होतो. त्याचं साटंलोटं असतं, ते फक्त आपल्या मनाशी! आपल्याही नकळत या मनानेच त्याला निमंत्रण दिलेलं असतं.  तोही तेवढ्याच तत्परतेने, हक्काने येतो.  आपला जिवलग असल्या सारखा! आणि ठाण मांडून बसतो. अगदी माणसांच्या, विचारांच्या गर्दीत सुध्दा, स्वतः च्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो!
आणि मग मात्र त्याला नीट हाताळणं गरजेचं आहे.  त्याला त्याची जागा वेळीच दाखवून दिली गेली पाहिजे.  डोईजड झाला तर आपल्या पूर्ण आयुष्याचा ताबा घेऊन , आयुष्यातून उठवू शकतो.  'म्हातारपण' हे त्याचं सगळ्यात सहजसाध्य सावध असतं. पण क्वचितच एखाद्याचा तो स्थायीभावच असतो.  
सामान्य माणसाचं आणि त्याचं, सख्य नसतच पण एखादा कलंदर कलाकार मात्र त्याच्या सानिध्यात फुलतो.  कारण तोच देतो कलाकाराला, त्याच्या निर्मितीचा क्षण! त्याचं असणच, एखाद्या महान कलाकृतीच्या निर्मितीला कारणीभूत ठरतं. त्याला सकारात्मक होऊ द्यायचं की नकारात्मक, ते आपण ठरवायचं.
एक, जन्माला येताना आणि दुसर, हा नश्वर देह सोडून जाताना, कुणाला आवडो न आवडो, आयुष्याच्या या दोन महत्वपूर्ण टप्प्यांवर तरी , प्रत्येकाच्या बरोबर असतोच असतो, तो , ' एकटेपणा'!!!
......... निलिमा देशपांडे. 

ए दिल......


Saturday, 22 August 2015

सुरकुत्या

'सुरकुती'...............शब्द जरी चार अक्षरी असला न तरीही , मनातल्या मनात उच्चारल्यावर सुध्धा, अस वाटत कि तो स्वतःलाच  आक्रसून घेऊन , खूप छोटी जागा व्यापतोय. विचार केला तर गम्मत वाटते . आपण शब्दांना सुद्धा काहीतरी स्वरूप देत असतो का? आकार आणि आकारमान सुध्धा ?त्यांच्या अभिप्रेत असलेल्या अर्थानुसार ? मुळात आधी एखाद्या भाषेत , अमुक एक विशिष्ट शब्द, तमुक एक विशिष्ट अर्थ दर्शवतो हे मानवाला कस ठरवता आल ? ( का  सुरकुत्यांअभावि असे प्रश्न मलाच पडतात ? कोण जाणे ! ) 
जस आता हेच पहाना ……सुरकुती , म्हटलकी मनात काही फारशी सकारात्मक भावना येत नाही चुरगळलेपण . आळशीपण , अस्ताव्यस्तता , अजागळपण ……आणि हो , म्हातारपण …. ह्या  आणि अश्याच काही भावना मनात निर्माण होतात. ह्यातली कोणतीच भावना मनाला उल्हसित करत नाही . आपल्याही आणि इतरांच्याही !
आमच्या कडे तर ' सुरकुत्या ' हा गृहकलहाचा मुद्दा असतो.  बऱ्याचदा तो कळीचा नारद असतो . उदा. bed वर घातलेल्या चादरीला किंवा कपाटातून काढलेल्या uniform ला  सुरकुत्या असल्या,  कि त्याच व्यस्त प्रमाणात , 'आमच्या ह्यांच्या ' कपाळावर उमटतात .! कलहाला सुरुवात होते. मग त्या  सुरकुत्या हळुहळू  माझ्या आणि अर्थातच मुलांच्याही कपाळावार पसरतात . एकूणच आत्तापर्यंत नितळ असलेल्या घरादाराच्या वातावरणात उमटतात ! आणि वातावरण बिघडत !
त्याही पेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होते , जेव्हा ह्या सुरकुत्या कपाळा पर्यंतच आपल अस्तित्व सीमित न ठेवता , पूर्ण शरीर व्यापून टाकतात. त्यांच  क्षणिक अस्तित्व आपण एकवेळ सहन करू शकतो पण जेव्हा त्या कायम स्वरूपी आपल्या शरीरावर वास्तव्य करू लागतात, तेव्हा त्यांचा स्वीकार करण खूप त्रास दायक असत . जणू मग त्यांचा तो वहिवाटीचा हक्क होतो . खर तर आपल्या शेवटापर्यंत त्या आपल्याशी एकनिष्ठ रहातात, पण म्हणून काही त्यांची कदर केली जात नाही !
हवतर  ह्या शब्दाबद्दल थोडासा तिटकाराच वाटतो म्हणानात ! कदाचित हा त्या शब्दावर अन्याय होत असेल , पण ते त्या शब्दाचं प्रारब्ध ! आणि प्रारब्धापुढे कुणाच काय चालत ?
पण मंडळी जस आपल्याकडे 'वेळेला' महत्व आहे तसच ' स्थानालाही'! सुरकुत्या ह्या देखील त्याला अपवाद नाही ! त्या 'कुठे ' उमटल्यात ह्यावर त्यांचा अभिप्रेत होणारा अर्थ बदलतो , त्यांच महात्म्य ठरत ! जस वरती, त्या अप्रिय ठरण्याच उदाहरण दिलच आहे.
पण हीच सुरकुती , जेव्हा एखाद्या जलाशयावर उमटते , तेव्हा ती 'तरंग ' होते . अस्तित्व क्षणिक असल तरी ,या रुपात तिला ' गती  ' आणि ' सौंदर्य  ' दोन्ही प्राप्त होण्याच भाग्य मिळत ! गम्मत बघा ,जशी हि सुरकुती , पाण्यावर उमटली तर 'तरंग' होते तीच दुधावर उमटली तर ' साय ' होते ! आणि ' दुधापेक्षा दुधावरची साय , जास्त घट्ट असते ' हे वेगळ सांगायला नकोच ! आणि  हवेवर उठलेले तरंग म्हणजे वाऱ्याची झुळूक ! खचितच  मनाला आनंद देणारी ! मनात उमटणारे भावतरंग म्हणजे पण एक प्रकारच्या सुराकुत्याच असतील नाही ? काही सुंदर तर काही कुरूप !
मात्र एकंदरीत बहुतेक ठिकाणी , यांच अस्तित्व मिटवण्याचाच घाट घातला जातो ! माणसाला सगळ्याच गोष्टीतली नितळता जास्त आकर्षित करते , नाही का ?
परंतु  हीच सुरकुती  जेव्हा नुसती वरवर न रहाता , हातावर थोडी खोलवर उमटलेली असते तेव्हा तीच आपली ' भाग्यरेषा ' ठरते !  आपल विधिलिखित, तिच्या स्वरुपात अधोरेखित झालेलं असत जणू !
एकंदरीत ह्या सुरकुत्या , कुठेही , ' जेवढ्या कमी, तेवढ चांगल' , अशी जरी एक सर्वसामान्य भावना असली तरी एक स्थान अस आहे जिथे त्याचं अल्पसंख्यांक असंण चक्क कमीपणाच मानल जात ! ते स्थान म्हणजे , मानवी मष्तीश्क ! तिथे म्हणजे चक्क  'more the merrier ' असा प्रकार ! म्हणे, त्या एवढ्याश्या मेंदूवर जेवढ्या सुरकुत्या जास्त तेवढा तो मेंदू तल्लख ! असेल बुवा ! Less said the better ! आपल तर बुवा सगळच smooth ! आयुष्यही आणि ……….
………………. निलिमा देशपांडे 


Wednesday, 19 August 2015

मुंबई मेरी जान

ये मुंबई है मेरी जान,
जिंदादिली है इसकी पहचान |

जिंदगीकी यहा तेज है रफ्तार,
जिसमे खुद वख्त भी गिरफ्तार |

हर चीज की यहाँ होती नुमाईश,
हर दिल में एक अधुरी ख्वाइश |

मेहनत परस्त अगर है  इंसान,
मंजिल पाना  है बहोत आसान |

इमान है धरम, इमान है करम,
बेईमानी भी मगर पलती है बेशरम |

लाखो दिलो मे यहा है  ईन्सानियत,
मौजूद है फिर भी शर्मनाक हैवानियत |

अमिरी गरिबी में  जरूर है फासले,
फिर भी जीनेके के है सबमे बुलंद हौसले |

कभी अजनबीको, है अपनाती,
अपनोंको कभी पराया बनाती |

रोती न सोती, सबको लुभाती,
जिंदगी से भी लोहा मनवाती |

समझना नही आसान,
ये है बंबई मेरी जान |
........... निलिमा देशपांडे.p 

Friday, 14 August 2015

कृष्णविवर

गुढ, अकल्पित  किती दडलेले कृष्णविवारा  अंगी,
'गुरुत्वाकर्षण' मुख्य तत्व असे परि जया अंतरंगी.
तारा एक अतिविशाल होई गिळंकृत स्वकेंद्रस्थानी,
ठरे प्रकाश निष्प्रभ, जाई खेचला आप भक्ष्यस्थानी.
करी धारण अणू रेणू वा सहस्त्र सूर्याचे आकारमान,
'उद्रेकात आत्मदहन' ताऱ्याचे, अंतराळात भासमान ,
वसे द्रुष्टी आडच्या सृष्टी, म्हणे जग ' आकाशगंगा',
अगणित प्रकाश वर्ष योजने , कशी मोजावी सांगा.
ना वेळ काळ ना परिमिती च्या उरती  तेथ सीमा,
कुंठित मम अल्पमती,आवरु कैसा मनीचा संभ्रमा?
उकलण्या अज्ञाताचे मर्म ठेविसी दूरस्थ केंद्री लक्ष,
मानवा,परि शोधिसी का कधी स्व मनाचे अंतरिक्ष?

………निलिमा देशपांडे. 

Wednesday, 5 August 2015

मुलगी

'मुलगी' असतेच ग , खरच  लाघवी,
म्हणूनच, 'घरटी एक' तरी जन्मावी.
चिवचिवाटाने तिच्या, सार घर भरत,
खुळावलेल घर, तिच्या भोवती फिरत.
तीच असण, मनाला देत प्रसन्नता,
तीच तर असते घराची खरी संपन्नता.
तीच घेते, आईच्या मनाचा अचूक ठाव,
कळतात तिला चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव.
तिच्या स्पर्शातली जादू, जिभेवर साखर,
विरघळत बापाच काळीजही  कणखर
असतेच ती मुळात स्वभावाने चाणाक्ष,
घरातल्या सगळ्यांवर असत तिंच लक्ष.
" आई,आज तोंड का ग तुझ उतरलय?"
"आई,दाद्याच काहीतरी हल्ली बिनसलय !"
"आई, आबांच्या उशीच कव्हर  फाटलय  "
"आई, आजीच औषध कालच संपलय "
"आई,बाबांचा दिवसेंदिवस वाढतोय घेर "
"आई कामवाली निट काढत नाही ग केर"
होऊ देत मोठी, ती आणि तीची सारी स्वप्न
सोडवू  दे तिचे तिलाच, पडलेले सगळे प्रश्न
पंखातील बळावर, घेईल ती क्षितीज भरारी
तू मात्र, कच न खाता ,कर मनाची तयारी.
कितीही दूर गेली, तरी तुटणार नाही नाळ,
वियोगाच्या दुःखावर, फुंकर घालेल काळ.
कोण म्हणतं, मुलगी चालवत नाही आपला वंश,
तीच्यातही असतोच न आपला एक सुंदर अविभाज्य अंश?
.......... निलिमा देशपांडे.

Monday, 3 August 2015

सोहळे नात्यांचे

कालच 'friendship day'  झाला.  'मैत्री' बद्दल खुप काही लिहिल, बोलल, व्यक्त केल गेल.  हल्ली father's day,  mother's day, valentine day असे विविध नात्यांचे सोहळे साजरे केले जातात शिवाय  rose day,  chocolate day,  ....... आणि असे अगणित days साजरे केले जातात.  काहींच्या मते, हे एक  fad आहे.  पाश्चात्यांच केलेल अंधानुकरण आहे.  " आमच्या काळी नव्हती हो असली थेर !", " आम्हाला नाही वाटली आपल्या नात्यांची प्रदर्शन करायची गरज!", हे आणि असे बरेच शेरे , ताशेरे जुन्या पिढीकडून ऐकायला मिळतात. त्यातही तथ्य नाही अस नाही ! 
          आपल्या कडे म्हणजे आपल्या संस्कृतीत , बहुतांश  नाती,  'गृहीत ' धरली   जातात.  आत्तापर्यंत , एखाद्या नात्यात अभिप्रेत असलेल्या भावना , आवर्जून , वेगळ्या, व्यक्त करायची गरज भासत नव्हती. कारण, त्या  कृतीतून व्यक्त केल्या जाण्याइतकी  त्या नात्यांमध्ये  सहजता होती आणि सहवासही  होता ! पण गम्मत अशी आहे, कि कृतीतून कितीही व्यक्त झाल्या तरी काही भावना , समोरच्या ' आपल्या ' माणसाने , शब्दातूनही बोलून दाखविल्या कि मिळणार समाधान केवळ शब्दातीत असत ! जसा पोकळ शब्दांना अर्थ नाही तसाच नुसत्या यंत्रवत कृतींनाही ! त्यामुळे हि, 'भावनांचे  सोहळे ' साजरे करण्यातही वेगळी नजाकत आहे ! निष्तेज  होऊ पाहणाऱ्या नात्यांमध्ये , पुन्हा एकदा नव्याने रंग भरण्याची , नव्या पिढीची हि एक अदा आहे , अस म्हणायला हरकत नाही.  
             परंतू  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आधुनिकीकरण आणि गतीमानाशीलता हे आजच्या जीवन पद्धतीचे अविभाज्य घटक झाले आहेत . कुणालाही  इथे कशासाठीही थांबण अशक्यप्राय झालंय.कारण ' थांबला तो संपला ' !  एवढ मात्र नक्की , माणसांमध्ये नाती , जिव्हाळा अजूनही आहे. फक्त त्याची  स्वरूप बदलली. कृतीतून दाखवण्याच्या वेळेअभावी , ती व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या पध्दती  अवलंबण्यात आल्या . मग पाश्चात्यांप्रमाणे एखादा विशिष्ठ दिवस, एखाद्या विशिष्ट्य नात्यासाठी  मुकर्रर करून, त्या विषयीची आपली भावना व्यक्त व्हायला सुरुवात झाली. पण त्यालाही ठराविक मर्यादा होत्या. कारण greeting cards , gifts या सारख्या माध्यमासाठी  होणारा आर्थिक भार उचलण , प्रत्येकाला शक्य नव्हत. परंतु म्हणतात न ' गरज हि शोधाची जननी आहे!' technology develop होत राहिली , आणि social media हे एक अत्यंत सहज सुंदर , सोयीस्कर माध्यम, सर्वसामान्यांच्या  हाती लागलं. Everything and everybody became accessible ,with a click of a button !' ' copy paste ' , ' forward ' केलं , कि तीच एक भावना, असंख्य लोकांपर्यंत निमिषात पोहोचवू शकतो ! technology ची केव्हढी हि किमया ! 
नात्यांची परिभाषाच बदलली ! Everybody, who crosses  our path , becomes a 'buddy' ! रोज नवीन नाती तयार होतात. ज्यात 'commitment' या शब्दाची गरज देखील नाही. उलट ' गरजेपुरतच नात ' , हि संकल्पना रुजत चालली. जेव्हढ्या सहजतेने जुळतात, तेव्हढ्याच सहजतेने संपतातही ! & people ' move on '! कुठलाही खेद , दुःख न बाळगता , नवीन नात्याच्या शोधात! आणि मग या सगळ्या नात्यांच्या रामरगाड्यात , खरी , जवळची , नाती जपायला वेळ कुणाला आहे ? म्हणून मग हे ' days ' ' celebrate ' करण सोयीस्कर होत! वर्षातून एक दिवस त्या नात्याचा ' सोहळा ' केला कि उरलेले ३६४ दिवस परत आयुष्याच्या मागे, मनात कोणतीही अपराधी भावना न बाळगता , धावायला मोकळे ! शिवाय रोजच्या चकोरिबद्द , ' boring' आयुष्यात, तेव्हढाच थोडासा ' time pass '! नाही का ?
……………………. निलिमा देशपांडे. 

Sunday, 2 August 2015

मैत्र

कुणीतरी असाव .....
आपल जीवाभावाच......
हातात हात घालून ज्याच्या,
फिरता याव उन्हाच.

                        कुणीतरी असाव .......
                        जगण्याच वेड असणार .....
                        मुसळधार पावसातही,
                        छत्री शिवाय भिजणार .
कुणीतरी असाव ......
आपल्या आनंदात रमणार ......
रस्त्यावरून खिदळत जाताना,
भोवतालच जग विसरणार .
                        कुणीतरी असाव .......
                        फुलपाखरू होऊन जगणार .......
                        आयुष्यातल्या फुलातलं,
                        मध गोळा करणार.
कुणीतरी असाव ........
हात देऊन सावरणार .........
स्वतः चटके सोसून,
सावली होऊन रहाणार.
                        कुणीतरी असाव .......
                        आपल मन जाणणार .......
                        न सांगताच ज्याला,
                        कळाव अंतर्मन जाळणार.
कुणीतरी असाव ........
आपल्यात एकरूप होणार .......
वेगळ अस्तित्व असूनही,
आयुष्यभर साथ देणार.
                        कुणीतरी असाव .......
                        आयुष्यात नसूनही असणार ......
                        सगळ असूनही _असलेल
                        अधुरेपण पूर्ण करणार. ................निलिमा देशपांडे.


                        
  

सखी

आली बघ सखीबाई , सय तुझी ग आली , 
सोबतीच्या दिसांची चाहूल , सोन पाउली ग आली 
आठवणींची पाखर , मनाच्या कुशीत शिरली , 
शिणावठ्याची चादर आसवांच्या ग धुक्यात विरली. 
उदासीचे मळभ , झाले ग पळभरात दूर , 
खळखळाटाचे ग तुझ्या कानी येताच सूर . 
निमिषात मन माझे झाले ग प्रफुल्लीत, 
उमटले ग हसू ओठांवर माझ्याही नकळत. 
परतुनी आले बघ , सारे ते अल्लड बालपण  
फिरूनी धावे मन, वाचायचे सोनेरी ते क्षण.  
लुटूपुटूचे तंटे अन् लटके रुसवे, फुगवे, 
क्षणात दुसर्‍या, गोबऱ्या गाली, खुदूखुदू ते हसणे.  
तारुण्य ग होते किती बेफिकीर अन् बेफाम, 
होता परि तयाला, स्नेह अन् विश्वासाचा लगाम. 
गुपितांचे गुंजारव अन् हास्याची कारंजी, 
अजुनी ये जणू कानावरती, तयाची ग सारंगी. 
आपुल्याच विश्वात होतो आपण किती दंग, 
प्राक्तने आपुली भिन्न, सुटला आता  ग संग. 
जन्मजन्मांतरीचे ग परि आपुले हे ऋणानुबंध, 
तुटता न तुटतील मैत्रीचे रेशीम अनुबंध. 
............. निलिमा देशपांडे. 

Friday, 31 July 2015

गुरु

दिला जन्म मज मात पित्यानी,
अलंकृत, वात्सल्य, संस्कारांनी,
केला एक समृध्द प्रवास सुरु,
मातपिता, माझा पहिला गुरु.

लीन सदा  मी देवा चरणी ,
जीवन ,केवळ त्याची करणी!
जाणीव, करी मज पापभिरू,
ईश्वर, माझा दुसरा गुरु.  

ज्ञानार्जन झाले विद्यामान्दिरी ,
शिकलो अर्थार्जन, दुनियादारी,
संस्कार मनी लागले मुरु ,
अध्यापक, माझा तिसरा गुरु .

सादर प्रणाम माझा आप्तांना,
साथ तयांची, मार्गस्थ होताना ,
सुखदु:खी, मन लागे सावरु,
गणगोत, माझा चवथा गुरु .

मानतो ऋण, मी अपत्याचे,
नव पिढी, द्योतक उत्क्रांतीचे,
नव विचार, का न स्विकारु?
तरुणाई, माझा पाचवा गुरू.

कशी विसरावी निसर्ग माया?
दिले, श्वास, घास, छत्रछाया ,
तरले कृपेवर , जीवन तारु,
निसर्ग, माझा सहावा गुरु.

हरेक पांथस्थाचे, काही देणे ,
भल्या बुऱ्या अनुभवांचे लेणे ,
महती तयाची का नाकारु?
असती अगणित माझे गुरु.

दिले दान काही, हरेक क्षणाने ,
चुकलो, शिकलो, कणाकणाने ,
स्वबळावर, काही पाहिले करु,
मीच माझा अंतिम गुरु.

गुरु वीण ना जीवनास आधार,
गुरु दूर करी जीवन अंधःकार
गुरु देई जीवना आकार ||
..................निलिमा देशपांडे .
  

Monday, 13 July 2015

जीवो जीवस्य .......

प्रत्येकाच स्वतःच अस एक विश्व असत. प्रत्येकाच्या जगण्याच्या काही सीमा रेषा असतात. कधी स्वतः घालून घेतलेल्या ! कधी परिस्थितीने आखून दिलेल्या ! 'विश्वची माझे घर' म्हणणारा एखादाच विरळा ! बहुतेक  'घरची माझे विश्व ' असणारेच जास्त ! .मग उरलेल्या जगात चाललेल्या अव्याहत व्यवहारांशी त्याला काही घेण देण नसत.  आणि आता ह्या स्मार्ट फ़ोन्सच्या युगात तर ,  ' मी आणि  माझा फोन' एवढंच विश्व असत.  प्रत्येक जण जणू एका आभासी जगात जगत असतो.  आजुबाजूला घडत असलेल्या घटना त्याला दिसत नाहीत , दिसल्या तरी register होत नाहीत. त्यातलं नाविन्य , वैविध्य, क्वचित आढळणार वैचित्र्य, ह्यातल्या कोणत्याच गोष्टींबद्दल तो संवेदनशील नसतो. कितीतरी अनुभवांना, भावनांना तो मुकतो. पुर्वी, खाली मान घालून उभं असण ह्याचा अर्थ , तो मनुष्य विनम्र आहे , समोरच्याला मान देतोय किंवा त्याने काही लाजीरवाण कृत्य केलंय , असा काढला जायचा.  ' खाली मुंडी , पाताळ धुंडी ' अशी एक म्हण होती. आता मात्र  ' खाली मुंडी' चा सर्वमान्य एकच अर्थ होतो ' mobile texting' !  
अर्थात मीही ह्या सगळ्याला अपवाद नाही ! हल्ली घरात संवाद होत नाही. पण आम्ही मात्र ' वाद ' होत नाहीयेत म्हणून खुश असतो. एक मेकांची मनस्थिती whats app च्या ' status ' वरून कळते. बऱ्याचदा एकमेकांच्या achievements ही ! पण, ह्याचा सल नाही जाणवत कुठे ! मन , भावना  बोथट होत चालल्यात !
तर परवा एकदा पुतण्याच्या नवीन घरात electrical fittings करून घ्यायची होती म्हणून मी आणि लेक पोहोचलो. तो भाग अजून develop होतोय.  त्यामुळे mobile ला net आणि network मिळेना. मग नाईलाजाने दोघांच्याही मुंड्या वर झाल्या , आणि नजर आजूबाजूला भिरभिरली ! "आई , त्या कुत्राच्या तोंडात काय आहे ग ? ", इति लेक.! मन आणि नजर यातलं अधिक अधू काय झालंय , हे माझ्या बाबतीत सांगण जर कठीणच ! " अरे plastic ची पिशवी दिसतेय !" अंदाजाने म्हटलं. " अग नाही ! नीट बघ , पिल्लु आहे त्याच्या तोंडात " जर बारकाईने बघितलं तर खरच तोंडात पिल्लु धरून तो कुत्रा कुठेतरी जात होता ! कुत्री (मादी ) ला तोंडात पिल्ल धरून , इकडून तिकडे , सुरक्षित जागी हलवताना पहिले होते . पण कुत्रा ( नर ) ?मुळात मी श्वान प्रेमी नाही . त्यामुळे या जमातीच्या behavioral pattern चा माझा काही गाढा अभ्यास नाही. ( आणि शाळेत सुध्धा कधी G. K . हा विषय आवडलाच नाही ) त्यामुळे त्यांच्यात पण एवढी 'gender  equality ' आलीये कि काय , असा प्रश्न मनाला चाटून गेला आणि पुढच्या क्षणी लक्षत आल, तोंडात अलगद धरलेलं ते पिल्लु निष्प्राण होत. उगाच गलबलुन आलं. ( म्हणजे मन अजून तेवढ अधू झाल नसावं ! ) आता मात्र कुतूहल जाग झाल. नक्की काय करतोय हा कुत्रा ? हातातल्या , आमच्यासाठी जीव कि प्राण असणाऱ्या पण आत्ता  निष्प्राण झालेल्या mobile चाही चक्क विसर पडला ! आजूबाजूला बहुतेक ठिकाणी नवीन बांधकाम चाललेली होती . समोरचा तो प्लॉट मात्र अजून रिकामा होता. त्यामुळे तिथे बरच rabid टाकलेलं होत. मधेच साचलेल्या पावसाच्या पाण्याची डबकीही होती. कुत्रा , वाट काढत काढत , त्यातून जात होता. बराच फिरल्यावर त्याला हवी तशी जागा सापडली बहुतेक ! पिल्लू तसच तोंडात धरून पायाने ती माती उकरायला सुरवात केली. थोड्या वेळाने खड्डा तयार झाला . त्याने त्या पिल्लाला त्या खड्यात ठेऊन पाहिलं . पण त्याच समाधान झाल नाही. पुन्हा त्याला तोंडात धरून खड्डा खोल केला. दोन तीनदा trial घेतल्यावर , त्याने ते पिल्लु अलगद खड्ड्यात ठेवलं. खुप वेळ तिथेच घुटमळला. मग परत यायला निघाला. मात्र आता त्याला परतीची  वाट सापडेना ! अस का झाल असेल ? त्याच्याही मनात भावनिक कल्लोळ सुरु असतील का ? पुत्र वियोगाच्या दुखाःने त्याच मन सैरभैर झाल होत का ? कोण जाणे ! आम्ही मात्र दोघ त्या काहीश्या असंभव वाटणाऱ्या  दृश्याने भारावून गेल्या सारखे बघत रहिलो. काही वेळाने डबक्यातल्या पाण्यातून पोहून जाऊन त्याने आपला मार्ग शोधला आणि तो रस्त्यावर आला. तेवढ्यात electrician आल्याने आमची तंद्री भंग पावली. मी त्यालाही ती अदभूत घटना कथन केली. तोही भारावून गेला. " मागच्या जन्मीचा पुण्यात्मा असणार तो ! त्या शिवाय अस करणारच नाही " मराठी पापभिरू मणसाच प्रांजळ मत ! पुन्हा आमचा मोर्चा आम्ही घटनास्थळी वळवला आणि आणखीनच भारावून गेलो . माझ्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्यासारख्या वाटल्या मला ! कारण तो कुत्रा परत त्या खड्ड्यापासून काही अंतरावर , खड्ड्याकडे तोंड करून बसला होता. राखण करत बसल्या सारखा ! 
मनुष्य प्राण्याइतकीच , इतर प्राण्यांमध्ये पण वात्सल्य भावना असते का ? आणि तेही एक मादी नाही तर नर व्यक्त करत होता ?  खूप काही वेगळी अनुभूती होती ती ! मलाच नाही तर लेकालाही ते  जाणवले. दोघेही जरा भारावल्या सारखे झालो. 
तेवढ्यात mobile च net आणि network परत आल्याचा साक्षात्कार झाला आणि दोघेही पुन्हा आपापल्या ' जगात ' रमलो . पण हा आनंद फार काळ  टिकला नाही . गेलच network ! अभावित पणे  नजर पुन्हा तिकडे वळली मात्र आणि दोघांचेही घसे एकाच वेळी  कोरडे पडले. कारणही तसच होत ! मघाचा कुत्रा कुठेही नव्हता . मात्र दुसराच एक कुत्रा , कोवळ्या ताज्या  भक्षावर ताव मारून आपली भूक शमवत होता !  अंगावर सरसरून काटा आला ! एका श्वानाने जरी वात्सल्याचा दुर्मिळ गुण दाखवला तरी दुसर्याने मात्र आपली ' जात ' बरोब्बर दाखवून दिली ! 
थोड सावरल्यावर मनात विचार आला , एवढ दचकायला काय झाल आपल्याला ? स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या मनुष्य प्राण्याच्या प्रवृत्तीत देखिल असा विरोधाभास दिसतोच ना ? आणि ' जीवो जीवस्य जीवनं  ' हा सृष्टीचाच तर नियम आहे !!!
………………………निलिमा देशपांडे 

Friday, 19 June 2015

MRT

 MRT
Mass Rapid Transport...... The Metro in Singapore.  An excellent and extensive  network of public transport.  Easy to follow any route,  once you understand its working.  You easily can reach your destination irrespective of the fact that you are a foreigner and a first timer. Eligibility for travelling includes your understanding of English and basic colours.
The different lines are demarcated by different colours.  Blue line,  Red line,  Yellow line,  Green line and Purple line. You just got to know your destination, rest you can trust the sign boards and follow accordingly.
 Travelling by Metros is not only convenient but also healthy !  You have to keep on walking to go from one station to another .  Of course there are escalators and  escalating belts that prevent you from over exerting yourself.
But for a typical mumbaikar like me, it is really beyond imagination, how could train travelling be so peaceful ! Unlike Mumbai , nobody ever has the life's hurry to catch the train !  You are not squeezed or pushed around by the crowd . The boarders stand away from the entrance, giving way to the passengers to alight first , then in a queue, they board from two corners. The surprise does not end here. Even inside the train, you come across many  wonders! And actually there is no ' fourth seat ' culture ! Can you digest that ?To be very frank, it troubles me a lot !  How could any one have the entire seat for himself, when I am standing ,having bought the ticket, spending the same fortune? It takes some deliberate efforts on my parts to overcome the urge of saying ' जरा खिसाकाके लेना तो !' Moreover nobody follows the ritual of tapping the shoulder of each dozing passenger, waking them up, to ask where they are getting down , no fights over who booked the seat first , no use of  ' गाली गलोच ' ! More than the clothes they wear, every one is donned with etiquettes  and manners ! I very much miss the charm of our  ladies , who within no time get to know about the fellow passenger's  ' खानदान ' ! I think, many of the matrimonial knots in India , are tied in the trains rather than in heaven ! Am I missing the touch of human warmth here ?
All the platforms are spotlessly clean , no colourful patterns of spittoons of betel leaf ! No crossing of tracks since platforms are closed.  No slums and the' poverty show' to dampen your spirits, outside the stations ! The exits/ entrances  of the many stations open in  magnificent malls ! The spectacular array of colourful displays in the variety of boutiques leave you  spellbound ! 
But leaving aside all the parody, travelling by metros in Singapore is an heavenly experience ! It leaves me wondering , why in India with all our resources, we can't  have a system of parallel standards ? I am sure a dash of discipline and a pinch of civic awareness can really do more wonder to our culturally rich nation ! 
.......................................Nilima Deshpande. 

Monday, 15 June 2015

सागर किनारी ........

नजर ठरेपर्यंत समोर पसरलेला अथांग सागर!  पाण्याच्या निळाई  अन हिरवाईच्या विहंगम  संगमाची  अपूर्वाई !  किनार्यावरच्या एका मोठ्या खडकावर बसलेले आम्ही ! वेगवेगळ्या वयोगटाचे, मानसिकतेचे ! तरीही आम्हाला एकमेकांची 'गर्दी' न वाटता 'सोबत' वाटत होती. निसर्गाच्या त्या असिमित व्याप्ती पुढे , आमचं अस्तित्व नगण्य वाटत होत, किंबहुना आम्ही आमचं अस्तित्व विसरूनच गेलो होतो. फक्त अनिमिष नेत्रांनी , चाहुबाजूच अफाट सौंदर्य, डोळ्यात साठवण, पिउन घेण, त्यात आकंठ बुडण , अश्या वेगवेगळ्या प्रक्रियेत, आपापल्या मानवी कुवतीनुसार प्रत्येकजण दंगला होता. म्हणूनच म्हटलं कुणालाच कुणाची 'गर्दी ' वाटत नव्हती. 'स्वर्गिय आनंद' , याहून काही वेगळा असेल का ? 
मनाची अवस्था फार संभ्रमित झाली होती. आपण या अलौकिक क्षणांचे साक्षीदार आहोत , याच समाधानही होत आणि तरीही एक हुरहूर , असहायता ! त्या अद्वितीय निसर्ग निर्मितीला आपण कोणत्याही माध्यमातून, पूर्णपणे व्यक्त करायला  , योग्य न्याय द्यायला असमर्थ आहोत , याची खंत ! स्वतःच खुजेपण जाणवत होत ! अर्थात हे सारे पुसटते, निसटते विचार होते ! मन केव्हाच तद्रुप झालेलं निसर्गाशी !
ह्या सागराच्या पाण्याविषयी नेहमीच एक गूढ आकर्षण वाटत आलंय . एकीकडे उसळणाऱ्या लाटांच चैतन्य नकळत आपल्यात सामावत,  किनाऱ्याच्या  मिलनासाठी आसुसलेली  उताविळता , क्षणिक मिलना  नंतर होणाऱ्या अपरिहार्य ताटातुटीची अगतिकता , लाटेगणिक मनाला भिडते  आणि दुसरीकडे त्याचं पाण्याचं, ठाव नसलेलं गहिरेपण, मनात एक अनाहूत भीती निर्माण करत. किती गूढ गुपित सामावलेली असतील ह्याच्या गर्भात ? 
आणि मग तशात  वरुणालाही  आपली उपस्थिती लावण्याचा मोह आवरता आला नाही तरच नवल ! पण आला तोही अल्वारच ! समोरून , उसळणाऱ्या लाटांचे अन पाठीवर भुरभुरणाऱ्या पावसाचे तुषार !तन , मन चिंब झालेलं  ! सिंगापूरच्या त्या किनाऱ्यावर , विदेशवारिच स्वप्न पूर्ण करत  आम्ही सारेच साजरा करत होतो तो निसर्ग सोहळा !

………………………. निलिमा देशपांडे. 

Wednesday, 20 May 2015

तुळशी पत्र

तुळशी पत्र 

आपल्या पारंपारिक, पौराणिक,सांस्कृतिक , सामाजिक, आणि वैयक्तिक आयुष्यात, तुळशी पत्राचे अनन्य साधारण महत्व आहे .पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असायचेच. आता न ती प्रशस्त घर राहिलीत न ते आंगण. पण आजही १ BHK च्या घरातही, छोटीशी का होईना,तुळशीची एक कुंडी, कोना व्यापातेच !
 हे तुळशी पत्र वेगवेगळ्या प्रकारे  आपल्या उपयोगी पडत. त्याचे औषधी गुण सर्वज्ञात आहेत. घरातल्या आजीच्या हातचा तुळशीचा काढा, खोकणाऱ्या  नातवंडानी एकदातरी प्यायलेला असतोच. आजोबांना रोज, पूजा करताना, फुलांबरोबर तुळशी पत्र वाहताना वेगळच समाधान मिळत. ग्रहणात जे अशुध्द वातावरण तयार होत, त्याचे शुध्धीकरण करण्याची प्रचंड ताकद या तुळशी पत्रांत असते , असा समज जुन्या पिढीत आहे. आणि विज्ञानानेहि या विधानाला पुष्टी दिलेली आहे. तुळशीपत्र सगळ्यात जास्त प्राणवायु उच्छ्वासतात. म्हणूनच आजूबाजूचा परिसर शुध्द राहतो. ह्या  तुळशीपत्रा पासुन  नुसतें डासच नाहीत तर चक्क, मृत्युवर अधिपत्य गाजवणारा यमराज देखील चार हात लांब रहातो. म्हणूनच घरच्यांच्या  आरोग्याच आणि जीवनाच रक्षण होत.
तसच, उपसानेचा एक अविभाज्य घटक आहे , हे तुळशीपत्र ! उदक आणि तुळशीपत्र सोडून केलेलं कोणतही दान , हे सत्पात्रीच होत, अशी ठाम समजूत आहे. 
मात्र व्यवहारी जगात , या तुळशी पत्राला काही वेगळे संदर्भहि आहेत. ' एखाद्या गोष्टीवर तुळशीपत्र ठेवणे ' म्हणजे त्या गोष्टीचा कायमचा त्याग करण किंवा त्या गोष्टीच अस्तित्व , या पुढे संपुष्टात आल्याच ग्राह्य धरणं ! इहलोकीची यात्रा संपवलेला 'देह' जेव्हा ' कलेवर ' म्हणून उरeतो , तेव्हा त्यच्या तोंडात तुळशीपत्र ठेवल तर त्या आत्म्याला मोक्ष मिळतो , अशी धारणा आहे. शिवाय ' हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे  ',म्हणजे एकाची  वस्तु , तिसऱ्याला परस्पर देऊन , मधल्या मधे आपण त्या दानाचे श्रेय लाटून , पुण्य कमावू पहाणारी माणस तर या स्वार्थी जगात, पावलोपावली भेटतात.  
एरवी सोयीस्करपणे  ' पुराणातली वांगी पुराणात ' ठेवतो आपण! पण या पुराणातच तुळशीपत्राच्या महात्म्याचे कितीतरी दाखले आहेत ! मात्र हे तुळशी पत्र केवळ विष्णू आणि त्याचे वेगवेगळे अवतार , यांनाच वाहिले जाते.  प्रेमाचं  आराध्य दैवत मानला जाणारा  श्रीकृष्ण, ह्याला तर ते प्राणप्रिय आहे. कृष्णाला वाहिलेलं कोणतही अर्ध्य, तुळशी पत्राचा समावेश  केल्याशिवाय  पूर्णत्व पावत  नाही. कृष्णाशी होणारा तुलसी विवाह, हा आपल्या सगळ्यात आवडत्या सणाचा, दीपावलीचा, समारोपाचा दिवस असतो.
 सत्यभामेने जेव्हा, कृष्णाची 'सुवर्ण तुला' करून , आपल त्याच्यावरच प्रेम सिद्ध करायचा प्रयत्न केला तेव्हा संपूर्ण राज्यातलं सुवर्ण , 'तुला' करायला कमी पडलं . मात्र तेव्हा रुक्मिणीने श्रद्धेने अन्  प्रेमाने ठेवलेल्या केवळ एका तुळशी पत्राने ती 'तुला' पूर्ण झाली. आणि रुक्मिणीच्या प्रेमाच पारड किती जड आहे, हे सिध्द झाल.  
कृष्णाने , आपली बहिण द्रौपदी, वनवासात असताना , तिच्याकडे अन्नाची याचना केली. द्रौपदीने सर्व अन्न संपल्याचे सांगितले. तेव्हा थाळीला चिकटलेले एक तुळशीपत्र कृष्णाला दिसले. त्याने आनंदाने त्याचे सेवन केले. अन अहो आश्चर्य ! कृष्णाने तृप्तीची ढेकर दिली! एवढच नव्हे तर पांडवांची फजिती करायला आलेल्या दुर्वास ऋषी अन त्यांच्या भक्त गणांचीही पोटे भरली.
म्हणजेच काय तर हे तुळशी पत्र प्रत्येक गोष्टीला पूर्णत्व देत. त्याच्या सेवनाने किंवा त्याच्या नुसत्या सानिध्याने देखिल समाधान , तृप्ती , परिपुर्णता, याची अनुभूती येते.

मग हीच अनुभूती, माणसाला का बर येत नाही ? त्याला मात्र कितीही सुख मिळालं तरी ' ये दिल मांगे more ' ! कुठे थांबायचं , ते त्याला कधीच का कळत नाही ?
मग माझ्या मनात विचार येतो कि आपल्याला  नाही का अस एखाद तुळशी पत्र मिळणार? कि ज्याच सेवन केल्याने, आपल्या आयुष्याला परिपूर्णता येईल ? आपण समाधानाची आणि तृप्तीची ढेकर देऊ शकू ?
तुम्हाला कुणाला गवसलंय का हो, असं  'तुळशी पत्र '?
.............निलिमा देशपांडे.

Sunday, 17 May 2015

शब्द

शब्द
शब्द शब्द जपुनी ठेव , बकुळीच्या फुलापरी....
जातील बघ विखरुनी, अवखळ वाऱ्यावरी.
पहावे शब्दांचे अंतरंग ,शब्द दर्शवतात रागरंग .
शब्द म्हणजे प्रीत, शब्द म्हणजे रीत, शब्द द्वेष, शब्द आवेश
शब्दांना असतात स्पंदन ,शब्दांनाही असतात बंधन.
शब्दांनाही असते जातपात, घडवून आणतात कधी घातपात,
असली जरी शब्दांना धार, लक्षत घ्याव फक्त त्याचं सार.
मान्य आहे, शब्द घालतात कधी वाद,
शब्दांमुळेच होतो तुझ्या माझ्यात विसंवाद,
पण साधून पाहिलास का कधी या शब्दांशी सुसंवाद ?
शब्द स्फुरतात, शब्द स्मरतात, शब्द उरतात,
नाही आले अधरी तरी... डोळ्यातुन झिरपतात ,
लेखणीतून उतरतात, कागदावर झिरपतात,
आणि मनात तुझ्या नाही का, घर करून रहातात?
शब्दांना केल  जर अंकित , हेच शब्द वाटतात संगीत.
शब्द असतात उभारी देणारे हात, पाहशील कधी, देऊन त्यांना साद ?
म्हणशील… शब्द करतात गोंगाट, अंतर्गत कलहांची वहिवाट.
पण एक गुपित सांगू ? तुझ मौन तरी कुठे निःशब्द असत ?
तुझ्याच शब्दात, तुझ अलवार गुज, मला सांगुन जात !
शब्द ऐकण्याचा आणि ऐकवण्याचा हा एक खेळ साधा,
याच शब्दांवरच तर निर्भर आहे, तुझ्या माझ्या विश्वाचा सांधा .
म्हणूनच…. शब्द माझा श्वास…शब्द माझा निश्वास,
शब्द माझा ध्यास… तुझ्या इतकाच प्रिय, मला शब्दांचा सहवास,
ठेवशील का एकदाच…. फक्त एकदाच… माझ्या या  शब्दांवर विश्वास?
………………………… निलिमा देशपांडे.