Friday, 31 July 2015

गुरु

दिला जन्म मज मात पित्यानी,
अलंकृत, वात्सल्य, संस्कारांनी,
केला एक समृध्द प्रवास सुरु,
मातपिता, माझा पहिला गुरु.

लीन सदा  मी देवा चरणी ,
जीवन ,केवळ त्याची करणी!
जाणीव, करी मज पापभिरू,
ईश्वर, माझा दुसरा गुरु.  

ज्ञानार्जन झाले विद्यामान्दिरी ,
शिकलो अर्थार्जन, दुनियादारी,
संस्कार मनी लागले मुरु ,
अध्यापक, माझा तिसरा गुरु .

सादर प्रणाम माझा आप्तांना,
साथ तयांची, मार्गस्थ होताना ,
सुखदु:खी, मन लागे सावरु,
गणगोत, माझा चवथा गुरु .

मानतो ऋण, मी अपत्याचे,
नव पिढी, द्योतक उत्क्रांतीचे,
नव विचार, का न स्विकारु?
तरुणाई, माझा पाचवा गुरू.

कशी विसरावी निसर्ग माया?
दिले, श्वास, घास, छत्रछाया ,
तरले कृपेवर , जीवन तारु,
निसर्ग, माझा सहावा गुरु.

हरेक पांथस्थाचे, काही देणे ,
भल्या बुऱ्या अनुभवांचे लेणे ,
महती तयाची का नाकारु?
असती अगणित माझे गुरु.

दिले दान काही, हरेक क्षणाने ,
चुकलो, शिकलो, कणाकणाने ,
स्वबळावर, काही पाहिले करु,
मीच माझा अंतिम गुरु.

गुरु वीण ना जीवनास आधार,
गुरु दूर करी जीवन अंधःकार
गुरु देई जीवना आकार ||
..................निलिमा देशपांडे .
  

No comments:

Post a Comment