Wednesday, 27 June 2018

ई-श्रीमंती

ई-श्रीमंती
प्लास्टिक बंदी आल्यामुळे,  सध्या रद्दीला सोन्याचे भाव,
पेपर पेपर जमवण्यासाठी, लोकांची धावाधाव.

 मी मात्र बसले होते, कविता पाडत मस्त,
आणि झेंगाट एक, मागे लागलं नस्त.

कालच पडली, आयकर विभागाची धाड,
आहे म्हणे तुमच्याकडे, अनाधिकृत रद्दीचे बाड.

खबर आहे म्हणे, अगदी पक्की,
सांगा कुठे लपवलीयेत, ते नक्की.

समजावले किती, डोळ्यात पाणी आणून,
"येतो घरात पेपर, केवळ परंपरा म्हणून.

नाही आम्हाला, पेपर वाचायची आवड,
इथे ई साहित्यातूनच, मिळत नाही सवड. 

हा...आहेत हजार बाराशे, जुन्या कवितांच्या वह्या,
दाखवू का वाचून?" मनी फुटल्या लाह्या.

"का करू तुमच्यावरच कविता, वानगी दाखल?"
म्हणाले, " क्या काटा है हमे, कुत्तेने पागल? "

आयकर वाल्यांची, झाली पळता भुई थोडी,
सोडल्यात म्हणे त्यानी, टाकायच्या धाडी.

खोट नाही सांगत, आम्ही पिढीजात प्रामाणिक ,
रद्दी विना कफल्लक, आम्ही ई साहित्यिक.
..........निलिमा देशपांडे.
०६/०४/२०१८, नवीन पनवेल.

e चोरी

वाढल्यात खरंच हल्ली, फार चो-या मा-या,
म्हणूनच शोधल्यात मी, काही ई तिजो-या.
झालीच साहित्यिक चोरी, तरी चिंता कशाला?
चार चौघात होतो, तेवढाच आपला बोलबाला.
तसही हल्ली, मी विचार करत नाही फारसा,
हा थोडाच आहे काही, साहित्यिक वारसा?
लिखाण माझं सर्व आहे फक्त स्वानंदासाठी,
(अहो म्हणजे fb आणि wa वरच्या, वाहवांसाठी.🤪)
क्षणिक अस्तित्वाचं आहे, या सा-याचं मुल्य,
माझ्यासाठी, माझ्या प्रतिभेचं  (?) 'असणं' च अमुल्य.
........निलिमा देशपांडे.
०७/०४/२०१८, नवीन पनवेल.

आनंद

आनंद
मनाचं आभाळ सारखं भरून येतं.
उगाचंच !
खरं म्हणजे मनमोराने पिसारा फुलवून नाचायला हवं नं? 
पण पिसारा घट्ट मिटवून, तोंड फिरवून बसतो वेडा.
काय हवं असतं याला नक्की ? 
असं वेड्या सारखं वागून तरी आनंद मिळतो का त्याला ? 
आनंद !
कुणी पाहिलाय ?  अनुभवलाय ?
कधीतरी ऊन होऊन येतो तो आनंद !
" क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ".
कधी बालकवींच्या श्रावणासारखा  !
पण आनंदाचा हा कवडसा असाच हुलकावणी देत असतो.
मुठीत धरायला गेलं तर मुठीच्या वर नाचत असतो. मुठ रिकामीच !
दोन्ही हातात पकडू म्हणे पर्यंत गायब ! 
परत दुसरीकडे  कुठेतरी वाकुल्या दाखवत लकाकताना दिसतो. 
की पुन्हा पळा त्याच्या मागे ! 
खरं तर पैशाने विकत मिळत नाही म्हणतात.
पण मग पहिल्या कमाईतून घरच्यांना घेतलेल्या छोट्या छोट्या वस्तू?
मिळालेला की आनंद..  त्यांनाही,  मलाही ! आणि हो त्यातच मिसळलेला अभिमान ! 
आईचा बोलका,  बाबांचा अबोल....नजरेतला !
तारूण्यात हे आनंदचांदणं लेऊन किती रात्री जागवलेल्या !
मग मुलांनी आणलेला.. बाळ मुठी भरभरून  !
वर्तमानात जगलं तर मिळतो म्हणे!
पण भूतकाळातल्या चुका आणि भविष्याच्या चिंता....यात वर्तमान कुठे निसटतो....तेच कळत नाही.
खरं तर आता जाणवतंय.....
पूर्वी कुठूनही केव्हाही कसाही कोणत्याही रूपात यायचा हा आनंद ! 
मग आताच का हा झाला असा अळवावरला थेंब? 
कुठेही न रेंगळता ओघळून जाणारा?  त्याचा ओलावा झिरपायच्या आतच ! 
काल मात्र अवचित मिळालेला.
Season चा पहिला आंबा खाताना  !
अवर्णनीय,  शब्दातीत  !
मग आठवलं,  माझी एक मैत्रीण आंब्याचा रस zip lock पिशव्यांमधे बंद करून fridger मधे साठवून ठेवते.
वर्षभरासाठी ! हवा तेव्हा हवा तेवढा काढून घ्यायचा, उरलेल्याची परत साठवण !
मी विचार करत्येय....हा आनंद सुध्दा असाच छोट्या छोट्या sachets मध्ये साठवून ठेवावा  !
भासलीच उणीव, तर एक एक sachet काढायचा. 
लागेल तसा वापरून परत मनाच्या कुपीत साठवून ठेवावा.
स्वतःसाठी आणि कधी दुस-यासाठी !
आनंदाचे डोही आनंद तरंग  !
जिंदगी के साथ भी...जिंदगी के बाद भी !
...........निलिमा देशपांडे. 

२१/०४/२०१८, नवीन पनवेल.

नातं, अपेक्षा आणि सापेक्षता

नातं, अपेक्षा आणि सापेक्षता......
अपेक्षा 'ठेवल्याने' की, 'न ठेवल्याने' एखादं नातं, मरत॔ किंवा तरतं?
या उत्तरावर एखाद्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं का?  ....
पण दिलेलं उत्तर... चूक/बरोबर ....कोण ठरवणार?  .
खरंच ! विचार करत्येय. 
इथे प्रत्येक गोष्टीला 'सापेक्षतेचा ' कस लागतो....लक्षात कसं आलं नाही आपल्या ?
खरं तर या जगात कुठलंच नातं 'निरपेक्ष' किंवा 'अपेक्षा विरहित ' नाही.
जिथे नातं आहे तिथे कोणती न कोणती अपेक्षा येतेच.
हं ! कदाचित त्या अपेक्षेत स्वार्थ नसेल....हि शक्यता आहे.
कळत नकळत का होईना किमान 'स्वानंद' तरी अपेक्षित असतोच ना ?
आम्ही बायका तर खरंच वेड्या असतो.
नाती जोडायची आणि ती जोडलेली नाती टिकवण्याचा आटापिटा आयुष्यभर  करायचा !
त्यात स्वतःचं अस्तित्व सुध्दा हरवून जातंय...हे कळतंच नाही.
कळतं तेव्हा उशिर झालेला असतो.
आणि हो,  एक चौकट लागते का...नात्याला ?
...... ...आर्थिक,  सामाजिक,  व्यावसायिक , कायदेशीर , रक्ताची वा मैत्रीची ?
आणि समाज मान्यता ?
सगळंच व्यक्ती सापेक्ष !
आणि नात्यात व्यवहारापेक्षा भावनिक गुंतवणूक जास्त असेल तिथे अपेक्षा जास्त .
आणि 'गरज' ? नातं गरजेवर अवलंबून असतं कि नात्यावर गरज ?
दोन्ही  ! संकल्पना पचायला जड आहे.
पण ते वास्तव आहे.
म्हणूनच ही नात्याची 'गरज' दोघांनाही असावी लागते.
पण नेहमीच ....एकाला जास्त,  दुस-याला कमी असते.
मग ज्याला जास्त  गरज....त्यानेच नेहमी पडतं घ्यायचं. लाचारी,  अगतिकता ?
मग कालांतराने आणि ओघाने येतोच तो..... अपेक्षाभंग !
पण मग आपणच ठरवायचं नं....नातं महत्वाचं असेल तर घालायची मुरड अपेक्षांना !
नातं तोडण्याने येणार दुःख आणि अपेक्षाभंगाचं दुःख....यात अधिक क्लेषकारक काय आहे ?
हे ठरवणं पण, व्यक्ती सापेक्षच असतं न?
तेव्हा...
माझ्या पुरतं तरी मी ठरवलंय......
जी नाती माझ्यासाठी अमुल्य आहेत.....ती रहाणारंच !
अपेक्षा पूर्ण होणं...न होणं....यावर आता ती अवलंबून नाहीत.
निदान माझ्या साठी तरी !
बाकीच्यांच आपण काय सांगावं ?
ते तर व्यक्ती सापेक्षच ! 
..........निलिमा देशपांडे.
०८/०५/२०१८, नवीन पनवेल.

ए दोस्त

ए दोस्त .....
आखिरकार जब पुंछ ही ली, तुमने हमारी खैरीयत,
कह न पाए, " हमें तुमसे नहीं,  जिंदगी से हैं शिकायत"

देखो, निभा न पाए, आज भी हम दुनियादारी,
कह न पाए, " सुनाओ कुछ तुम्हारी, सुनो कुछ हमारी "

गुमराह कर दिया तुम्हें, हमारी मुस्कुराहट ने,
कह न पाए, " ये करिश्मा किया है, तुम्हारी आहट ने"

पुछते गर तुम, "रहते हो क्यों आजकल गुमसुम ? "
कह न पाते, " हो खयालों में, बस तुम ही तुम "

पुछते गर तुम, " किस बात पर है नाराजगी? "
कह न पाते, " अहम् है जिंदगी में, तुम्हारी  मौजूदगी "
..........निलिमा देशपांडे ।
१७/०५/२०१७, नवीन पनवेल ।

Last Holiday

Last Holiday

असाच एक English picture बघितलेला,   ...'Last Holiday'......'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.

त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस  तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत  नव्हतं,  त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत,  उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते...."why now ?...आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?" 

पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता 'आणखी काही'  गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा  'दांभिक सभ्यतेचा' बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ 'प्रामाणिक ' रहाते/ वागतेे/ बोलते.

आणि तिला जाणवतं....आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना....आपण आयुष्य ख-या अर्थाने जगलोच नाही.  केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'....याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं." I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality " राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या departmental store owner लाही खरी खोटी सुनावते  ....त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.

आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत.... तिला कसलाही आजार नाही....ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday न शिकवलेला धडा, ती कधीच  विसरत नाही.

तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात... फिल्मी भाग सोडला तर खरंच विचार करायला लावणारा होता, नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास. आपणही,  ...आजचा/ आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही....मनात कायम उद्याची चिंता ! काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी ...कायम हातचं सोडून  पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो....इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या  ' सुट्टीत' उपभोगण्यासाठी , शिलकीत टाकत जातो....आणि हे सगळं व्यर्थ आहे....जे खरच हवं होतं...आनंद/ समाधान...हे या कशात नव्हतच. ......हेे कळायच्या आतच ....'शेवटची सुट्टी लागते'. शिलकीतली 'पुंजी' तशीच राहून जाते....न वापरलेली....कोरीच्या कोरी....पण आता निरूपयोगी  !

या 'शेवटच्या सुट्टी' पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर? तर प्रत्येक क्षण त्या 'सुट्टी' इतकाच आनंद देईल ! हो न ? 
........निलिमा देशपांडे. 
२२/०५/२०१८, नवीन पनवेल.

तुझ्या तोंडात साखर पडो....

"तुझ्या तोंडात साखर पडो"

मध्यंतरी, शं नां च पुस्तक वाचत होते,  त्यात हा वाक्प्रचार आला होता.  आणि एकदम जाणवलं,  किती कमी वेळा वापरतोय हा आपण हल्ली !

अर्थात त्याला 'साखर ' हा शब्द कारणीभूत असू शकतो.  अणू बाॅम्ब ला घाबरावं तसं सगळे हल्ली 'साखर' या शब्दाला घाबरतात.
आहारात समाविष्ट करायचं तर  सोडाच पण  बोलण्यात देखिल गोडवा आला तरी मधुमेह होईल की काय अशी लोकांना भिती वाटत असावी आजकाल. 

आणि परवा काय झालं, एक मैत्रीण रस्त्यात भेटली. मला आवर्जून थांबवून म्हणाली, "अग गंमत सांगू का ? मला न काल स्वप्न पडलेलं.... तु तुझ्या नवीन घरात रहायला गेलीयेस आणि घराचा खुप मोठ्ठा हाॅल आहे....अं....पण पुढचं नाही आठवते बाई  "
मला इतका आनंद झाला.  मी almost नाचत म्हटलं, " नको आठवु दे ग....तुझ्या तोंडात साखर पडो! "
तर चक्क, तिच्या तोंडात मी किडे घातल्याच्या आविर्भावात ओरडलीच माझ्या अंगावर ( आजुबाजुची चार डोकी वळली आमच्या कडे)  ,  "का ग असं ?मी काय तुझं घोडं मारलं? मी तुझ्या साठी एवढं छान स्वप्न पाहिलं तर 'thank you' म्हणणं तर दूरच..... आणि वर मला शाप देत्येस...  ! मैत्रीण म्हणवतेस न स्वतःला?  मग अशी वैरीणी सारखी का वागलीस?" 
मला कळेचना...  माझं काय चुकलं? " अग अग.....काय झालं?  मी तुझ्या स्वप्नात आले आणि तु माझ्या प्रगतीची इच्छा केलीस.. म्हणून आनंदानेच म्हटलं  ..तुझ्या तोंडात साखर....."
" तेच तेच.... एक वेळ विष म्हणाली असतीस तरी चाललं असतं ...पण  'तो' शब्द सुध्दा उच्चारू नकोस. नुसतं तो शब्द कानावर पडल्याने पण वजन वाढेल..... 'तुझ्या सारखं !'  सध्या dieting वर आहे न  मी.  १०० ग्रॅम कमी झालंय..... एका आठवड्यात ! केवळ साखर वर्ज्य केल्याने..... आता बोल "

मी काय बोलणार कप्पाळ !...मला जाडी म्हटल्याचा राग व्यक्त करू की...अग बाई मी तुला thank you च म्हणत होते......हे समजावण्याचा प्रयत्न करू?  .....तेच मला कळेना ! 
आ वासलेलं माझं तोंड मी गपकन् मिटलं. आणि " thank you " म्हणून विषय बदलला. 'तिच्या लेकिचा अन् तिचा dp कित्ती गोड आलाय'  असं म्हटलं ....तेव्हा  कुठे ती शांत झाली.
 मग पुढचा अर्धा तास तिच्या लेकिच्या कौतुकाचं पुराण ऐकून घेतलं. आणि अधून मधून...." हो न ग ", " कित्ती छान ", " मग काय तर.." , वगैरे शब्दांची साखरपेरणी  ( पण अर्थात, तििच्या नकळत)करत, गप्पा मारून, दोघी परत आपापल्या दिशांना मार्गस्थ झालो.

मी चालायला लागले खरी....आणि मनातल्या मनात हसायला आलं.
पुन्हा त्या दिवशीचाच विचार मनात घोळायला लागला.  ' तुझ्या तोंडात साखर पडो '....किती दुर्मिळ झालंय हे म्हणणं !  असं का बरं ?

मी जस जसा विचार करायला लागले....तश्या काही कारणांच्या शक्यता डोक्यात आल्या.
पहिलं म्हणजे....ब्रिटिश ! हो ब्रिटिशच कारणीभूत आहेत ! कारण त्यांनीच तर आणली न ती आंग्ल भाषा....
जी आता आपल्याला आपल्या मायबोली पेक्षा सहज सोपी आणि सोयीची वाटायला लागलीये.
 त्यातले....'sorry' , 'thank you' या दोन शब्दांनी तर मायबोलीतले कितीतरी शब्द आणि भावना , आपल्या बोली भाषेतून हद्दपार केल्या
 ....  माफी मागणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं...यातलं अवघडलेपण संपवून टाकलं....किती short & sweet झालंय दोन्ही !

आणि पुढचं कारण डोक्यात आलं तेव्हा जरा अस्वस्थच झाले. हल्ली ....दुस-याच्या मनोकामना पूर्ण होवोत ....म्हणून मनापासून शुभेच्छा व्यक्त करणारे कुठे कोणी उरलंय ?
बहुतांशी सगळे... स्व...मध्ये रमलेले असतात. स्वतः पलिकडे दुस-याचा विचार करायला वेळच कोणाला आहे ?
 ' शुभेच्छुक ' ही जमात नष्ट व्हायच्या पातळीवर आहे. 
 हां ! आता...शिष्टाचार म्हणून,  उपचारादाखल....'wish' ...केलं जातं.आणि  म्हणून त्यासाठी...'thank you'...पुरेसं असतं.
पण खरंच ! किती कोरडेपणा आहे त्यात !
....."तुझ्या तोंडात साखर पडो"....यातलं....'तुझही भलं होवो'...या सदिच्छेचं उत्स्फूर्तपण,  भावनेचा ओलावा....कुठे  व्यक्त होतो ?
 आणि आता तर काय, या social media वरच्या emoji नी, अजूनच सगळं सोप्पं करून टाकलंय.

पण असो....कालाय तस्मै नमः !

घरी आल्या आल्या लेक म्हणाली,  "आई, उद्या पासून बहुतेक कामवाल्या मावशी यायला लागतील. आत्ता office मधून  येताना रस्त्यात दिसल्या. गावाहून आल्या वाटतं."
मी एकदम खुश होऊन म्हटलं," तुझ्या तोंडात साखर पडो ग बाई! "
तर म्हणाली, "  ए आई, बाई आल्या तर मी कशाला साखर खाऊ ? तुला माहितीये न...मला गोड आवडत नाही ते. "
मी ' explain ' केलं की तिला खरंच साखर खायची नाहिये तर मी तिला 'thank you' म्हणत्ये.
 " अगं मग..thank you ...असं सरळ सोप्या मराठीत म्हण की. उगाच difficult words वापरून bore मारू नकोस. आणि तोंडात काही पाडायचंच असेल तर मस्त पैकी पाणीपुरी,  शेवपुरी,  वडापाव असलं काही तरी चमचमीत घाल नं. साखर काय? पकाऊ नुसती  "

आता बोला ! 
" काय म्हणताय?  काळजी नको करू ? सगळं ठीक होईल?
तुमच्या तोंडात साखर पडो बाई!!!!!" 
............निलिमा देशपांडे.
२३/०५/२०१८,नवीन पनवेल.

शिखर

मजल दरमजल करत, आयुष्याच्या शिखरावर आपण चढायला सुरुवात करतो. तेव्हा, किती चढायचंय हे माहित नसतं . पण आपल्या  शिखराची उंची आपणंच ठरवायची...एवढं निश्चित. गाठलेली उंची, आपल्यासाठी पुरेशी आहे का  ? नसेल तर अजून वर चढण्यासाठी आपल्या कडे वेळ,  शक्ती आणि पात्रता आहे का ? नसेल तर अट्टाहास करावा का ? & ultimately,  is it worth it  ?

आणि हो ! शिखरावर पठार हे हवंच.  नसेल तर तेही आपणच तयार करायचं ! अर्थात थांबायचं तर नाहीच. पण गती थोडी मंद करून, गाठलेल्या उंचीचा आनंद घ्यायचा. आयुष्याच्या या मुक्कामी, एक दीर्घ श्वास घ्यायचा.....ज्या दरीतून वर आलो तिथे डोकावून पहायला हरकत नाही. चढून आलेली दरी जितकी खोल, तितकं मोठं आपलं यश ! या यशााचा आस्वाद घ्यायचा. तिथली हवा श्वासात ओढून, पेशीपेशीत भरून घ्यायची. हं ! मात्र, तिथलं वारं डोक्यात शिरणार नाही,  याची काळजी घ्यायला हवी.

शिवाय वरती चढून येण्याच्या चुरशीत, चढावावरची, काही सौंदर्य स्थळं, नजरेतून सुटली असतील. तेव्हा वेळे अभावी नाही उपभोगता आलं ते सुख ! हरकत नाही. या शिखरावरून पाहतानाही त्यांच एक आगळं सौंदर्य असतं.  त्याचा आता तरी, आस्वाद घेऊच शकतो.

मात्र हे करताना गाफिल राहून चालणार नाही.  कारण,  चालतोय या पठाराची लांबी तरी कुठे माहितीये ? कधी अचानक उतार सुरू होईल ते कळणार नाही आणि नाहक गडगडत खाली येऊ. सतर्क राहिलो तर उतार जाणवेल.  मग तोही सावकाश उतरायचा . उताराची देखिल आपली एक नजाकत असतेच. अनुभवायची तीही .

तो उतारही संपणार, हे अटळ आहे. मात्र हा शेवट जिथे कुठे असेल तिथे , आनंद समाधान आणि तृप्ती आपल्या सोबत असावेत. एवढंच !!!!!
.........निलिमा देशपांडे.
०८/०६/ २०१८,
नवीन पनवेल.

मृगजळ


किताब


माल


फुंकर


ए दोस्त...


तीट


प्रतिक्षा


बाधित


मीराभक्ती