Tuesday, 28 June 2016

समस्या 1


जीवन मार्गक्रमणाची आपल्या, असे जरी धोपट वहीवाट,
मिळती नशीबाची वळणे अन् समस्यांचे बिकट घाट.

भेटती त्या समस्या, अगणित अन् पावलागणिक,
जरी सक्षम विद्वान,करती आपणांस , दुबळा, अगतिक.

होऊन विवश ,घेऊ पाहतो, भुमिका आपण टोकाची,
होते मग जणू ताटातूट, तारतम्य अन् सद्सद्विवेकाची.

नेती हे प्रश्न, ह्या चिंता, आशा निराशेच्या हिंदोळ्यावर,
उमटती ओरखडे, तनमनावर अन् नाजुक नात्यांवर.

फिरू नये परत, कधीही परीस्थितीशी हार मानून,
जगावे आत्मसन्मानाने, अडचणींवर मात करुन.

हरेक समस्येवर मिळे, किमान एक तरी समाधान,
मात्र शोधण्यास, लागे ठेवावे योग्य ते व्यवधान

द्यावे सोडून काही निरूत्तरीत प्रश्न, येणा-या काळावर,
शेवटी घडे तेच जीवनी, जे विधिलिखित भाळावर.

असेल नसेल जगाची साथ , परावलंबी नाही रहायचं,
जोरावर आत्मबळाच्या, साध्य आपलं ध्येय करायचं.

कस्तुरीमृगाने शोधावा जसा, स्वतःत दडलेला कस्तुरीगंध,
स्वतःतला 'स्व' मिळवून आपणही  जिंकावं अडचणींच द्वंद्व.
...........निलिमा देशपांडे. 

No comments:

Post a Comment