Wednesday, 27 June 2018

नातं, अपेक्षा आणि सापेक्षता

नातं, अपेक्षा आणि सापेक्षता......
अपेक्षा 'ठेवल्याने' की, 'न ठेवल्याने' एखादं नातं, मरत॔ किंवा तरतं?
या उत्तरावर एखाद्या नात्याचं भवितव्य अवलंबून असतं का?  ....
पण दिलेलं उत्तर... चूक/बरोबर ....कोण ठरवणार?  .
खरंच ! विचार करत्येय. 
इथे प्रत्येक गोष्टीला 'सापेक्षतेचा ' कस लागतो....लक्षात कसं आलं नाही आपल्या ?
खरं तर या जगात कुठलंच नातं 'निरपेक्ष' किंवा 'अपेक्षा विरहित ' नाही.
जिथे नातं आहे तिथे कोणती न कोणती अपेक्षा येतेच.
हं ! कदाचित त्या अपेक्षेत स्वार्थ नसेल....हि शक्यता आहे.
कळत नकळत का होईना किमान 'स्वानंद' तरी अपेक्षित असतोच ना ?
आम्ही बायका तर खरंच वेड्या असतो.
नाती जोडायची आणि ती जोडलेली नाती टिकवण्याचा आटापिटा आयुष्यभर  करायचा !
त्यात स्वतःचं अस्तित्व सुध्दा हरवून जातंय...हे कळतंच नाही.
कळतं तेव्हा उशिर झालेला असतो.
आणि हो,  एक चौकट लागते का...नात्याला ?
...... ...आर्थिक,  सामाजिक,  व्यावसायिक , कायदेशीर , रक्ताची वा मैत्रीची ?
आणि समाज मान्यता ?
सगळंच व्यक्ती सापेक्ष !
आणि नात्यात व्यवहारापेक्षा भावनिक गुंतवणूक जास्त असेल तिथे अपेक्षा जास्त .
आणि 'गरज' ? नातं गरजेवर अवलंबून असतं कि नात्यावर गरज ?
दोन्ही  ! संकल्पना पचायला जड आहे.
पण ते वास्तव आहे.
म्हणूनच ही नात्याची 'गरज' दोघांनाही असावी लागते.
पण नेहमीच ....एकाला जास्त,  दुस-याला कमी असते.
मग ज्याला जास्त  गरज....त्यानेच नेहमी पडतं घ्यायचं. लाचारी,  अगतिकता ?
मग कालांतराने आणि ओघाने येतोच तो..... अपेक्षाभंग !
पण मग आपणच ठरवायचं नं....नातं महत्वाचं असेल तर घालायची मुरड अपेक्षांना !
नातं तोडण्याने येणार दुःख आणि अपेक्षाभंगाचं दुःख....यात अधिक क्लेषकारक काय आहे ?
हे ठरवणं पण, व्यक्ती सापेक्षच असतं न?
तेव्हा...
माझ्या पुरतं तरी मी ठरवलंय......
जी नाती माझ्यासाठी अमुल्य आहेत.....ती रहाणारंच !
अपेक्षा पूर्ण होणं...न होणं....यावर आता ती अवलंबून नाहीत.
निदान माझ्या साठी तरी !
बाकीच्यांच आपण काय सांगावं ?
ते तर व्यक्ती सापेक्षच ! 
..........निलिमा देशपांडे.
०८/०५/२०१८, नवीन पनवेल.

No comments:

Post a Comment