Saturday, 22 August 2015

सुरकुत्या

'सुरकुती'...............शब्द जरी चार अक्षरी असला न तरीही , मनातल्या मनात उच्चारल्यावर सुध्धा, अस वाटत कि तो स्वतःलाच  आक्रसून घेऊन , खूप छोटी जागा व्यापतोय. विचार केला तर गम्मत वाटते . आपण शब्दांना सुद्धा काहीतरी स्वरूप देत असतो का? आकार आणि आकारमान सुध्धा ?त्यांच्या अभिप्रेत असलेल्या अर्थानुसार ? मुळात आधी एखाद्या भाषेत , अमुक एक विशिष्ट शब्द, तमुक एक विशिष्ट अर्थ दर्शवतो हे मानवाला कस ठरवता आल ? ( का  सुरकुत्यांअभावि असे प्रश्न मलाच पडतात ? कोण जाणे ! ) 
जस आता हेच पहाना ……सुरकुती , म्हटलकी मनात काही फारशी सकारात्मक भावना येत नाही चुरगळलेपण . आळशीपण , अस्ताव्यस्तता , अजागळपण ……आणि हो , म्हातारपण …. ह्या  आणि अश्याच काही भावना मनात निर्माण होतात. ह्यातली कोणतीच भावना मनाला उल्हसित करत नाही . आपल्याही आणि इतरांच्याही !
आमच्या कडे तर ' सुरकुत्या ' हा गृहकलहाचा मुद्दा असतो.  बऱ्याचदा तो कळीचा नारद असतो . उदा. bed वर घातलेल्या चादरीला किंवा कपाटातून काढलेल्या uniform ला  सुरकुत्या असल्या,  कि त्याच व्यस्त प्रमाणात , 'आमच्या ह्यांच्या ' कपाळावर उमटतात .! कलहाला सुरुवात होते. मग त्या  सुरकुत्या हळुहळू  माझ्या आणि अर्थातच मुलांच्याही कपाळावार पसरतात . एकूणच आत्तापर्यंत नितळ असलेल्या घरादाराच्या वातावरणात उमटतात ! आणि वातावरण बिघडत !
त्याही पेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होते , जेव्हा ह्या सुरकुत्या कपाळा पर्यंतच आपल अस्तित्व सीमित न ठेवता , पूर्ण शरीर व्यापून टाकतात. त्यांच  क्षणिक अस्तित्व आपण एकवेळ सहन करू शकतो पण जेव्हा त्या कायम स्वरूपी आपल्या शरीरावर वास्तव्य करू लागतात, तेव्हा त्यांचा स्वीकार करण खूप त्रास दायक असत . जणू मग त्यांचा तो वहिवाटीचा हक्क होतो . खर तर आपल्या शेवटापर्यंत त्या आपल्याशी एकनिष्ठ रहातात, पण म्हणून काही त्यांची कदर केली जात नाही !
हवतर  ह्या शब्दाबद्दल थोडासा तिटकाराच वाटतो म्हणानात ! कदाचित हा त्या शब्दावर अन्याय होत असेल , पण ते त्या शब्दाचं प्रारब्ध ! आणि प्रारब्धापुढे कुणाच काय चालत ?
पण मंडळी जस आपल्याकडे 'वेळेला' महत्व आहे तसच ' स्थानालाही'! सुरकुत्या ह्या देखील त्याला अपवाद नाही ! त्या 'कुठे ' उमटल्यात ह्यावर त्यांचा अभिप्रेत होणारा अर्थ बदलतो , त्यांच महात्म्य ठरत ! जस वरती, त्या अप्रिय ठरण्याच उदाहरण दिलच आहे.
पण हीच सुरकुती , जेव्हा एखाद्या जलाशयावर उमटते , तेव्हा ती 'तरंग ' होते . अस्तित्व क्षणिक असल तरी ,या रुपात तिला ' गती  ' आणि ' सौंदर्य  ' दोन्ही प्राप्त होण्याच भाग्य मिळत ! गम्मत बघा ,जशी हि सुरकुती , पाण्यावर उमटली तर 'तरंग' होते तीच दुधावर उमटली तर ' साय ' होते ! आणि ' दुधापेक्षा दुधावरची साय , जास्त घट्ट असते ' हे वेगळ सांगायला नकोच ! आणि  हवेवर उठलेले तरंग म्हणजे वाऱ्याची झुळूक ! खचितच  मनाला आनंद देणारी ! मनात उमटणारे भावतरंग म्हणजे पण एक प्रकारच्या सुराकुत्याच असतील नाही ? काही सुंदर तर काही कुरूप !
मात्र एकंदरीत बहुतेक ठिकाणी , यांच अस्तित्व मिटवण्याचाच घाट घातला जातो ! माणसाला सगळ्याच गोष्टीतली नितळता जास्त आकर्षित करते , नाही का ?
परंतु  हीच सुरकुती  जेव्हा नुसती वरवर न रहाता , हातावर थोडी खोलवर उमटलेली असते तेव्हा तीच आपली ' भाग्यरेषा ' ठरते !  आपल विधिलिखित, तिच्या स्वरुपात अधोरेखित झालेलं असत जणू !
एकंदरीत ह्या सुरकुत्या , कुठेही , ' जेवढ्या कमी, तेवढ चांगल' , अशी जरी एक सर्वसामान्य भावना असली तरी एक स्थान अस आहे जिथे त्याचं अल्पसंख्यांक असंण चक्क कमीपणाच मानल जात ! ते स्थान म्हणजे , मानवी मष्तीश्क ! तिथे म्हणजे चक्क  'more the merrier ' असा प्रकार ! म्हणे, त्या एवढ्याश्या मेंदूवर जेवढ्या सुरकुत्या जास्त तेवढा तो मेंदू तल्लख ! असेल बुवा ! Less said the better ! आपल तर बुवा सगळच smooth ! आयुष्यही आणि ……….
………………. निलिमा देशपांडे 


No comments:

Post a Comment