Saturday, 22 August 2015

सुरकुत्या

'सुरकुती'...............शब्द जरी चार अक्षरी असला न तरीही , मनातल्या मनात उच्चारल्यावर सुध्धा, अस वाटत कि तो स्वतःलाच  आक्रसून घेऊन , खूप छोटी जागा व्यापतोय. विचार केला तर गम्मत वाटते . आपण शब्दांना सुद्धा काहीतरी स्वरूप देत असतो का? आकार आणि आकारमान सुध्धा ?त्यांच्या अभिप्रेत असलेल्या अर्थानुसार ? मुळात आधी एखाद्या भाषेत , अमुक एक विशिष्ट शब्द, तमुक एक विशिष्ट अर्थ दर्शवतो हे मानवाला कस ठरवता आल ? ( का  सुरकुत्यांअभावि असे प्रश्न मलाच पडतात ? कोण जाणे ! ) 
जस आता हेच पहाना ……सुरकुती , म्हटलकी मनात काही फारशी सकारात्मक भावना येत नाही चुरगळलेपण . आळशीपण , अस्ताव्यस्तता , अजागळपण ……आणि हो , म्हातारपण …. ह्या  आणि अश्याच काही भावना मनात निर्माण होतात. ह्यातली कोणतीच भावना मनाला उल्हसित करत नाही . आपल्याही आणि इतरांच्याही !
आमच्या कडे तर ' सुरकुत्या ' हा गृहकलहाचा मुद्दा असतो.  बऱ्याचदा तो कळीचा नारद असतो . उदा. bed वर घातलेल्या चादरीला किंवा कपाटातून काढलेल्या uniform ला  सुरकुत्या असल्या,  कि त्याच व्यस्त प्रमाणात , 'आमच्या ह्यांच्या ' कपाळावर उमटतात .! कलहाला सुरुवात होते. मग त्या  सुरकुत्या हळुहळू  माझ्या आणि अर्थातच मुलांच्याही कपाळावार पसरतात . एकूणच आत्तापर्यंत नितळ असलेल्या घरादाराच्या वातावरणात उमटतात ! आणि वातावरण बिघडत !
त्याही पेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होते , जेव्हा ह्या सुरकुत्या कपाळा पर्यंतच आपल अस्तित्व सीमित न ठेवता , पूर्ण शरीर व्यापून टाकतात. त्यांच  क्षणिक अस्तित्व आपण एकवेळ सहन करू शकतो पण जेव्हा त्या कायम स्वरूपी आपल्या शरीरावर वास्तव्य करू लागतात, तेव्हा त्यांचा स्वीकार करण खूप त्रास दायक असत . जणू मग त्यांचा तो वहिवाटीचा हक्क होतो . खर तर आपल्या शेवटापर्यंत त्या आपल्याशी एकनिष्ठ रहातात, पण म्हणून काही त्यांची कदर केली जात नाही !
हवतर  ह्या शब्दाबद्दल थोडासा तिटकाराच वाटतो म्हणानात ! कदाचित हा त्या शब्दावर अन्याय होत असेल , पण ते त्या शब्दाचं प्रारब्ध ! आणि प्रारब्धापुढे कुणाच काय चालत ?
पण मंडळी जस आपल्याकडे 'वेळेला' महत्व आहे तसच ' स्थानालाही'! सुरकुत्या ह्या देखील त्याला अपवाद नाही ! त्या 'कुठे ' उमटल्यात ह्यावर त्यांचा अभिप्रेत होणारा अर्थ बदलतो , त्यांच महात्म्य ठरत ! जस वरती, त्या अप्रिय ठरण्याच उदाहरण दिलच आहे.
पण हीच सुरकुती , जेव्हा एखाद्या जलाशयावर उमटते , तेव्हा ती 'तरंग ' होते . अस्तित्व क्षणिक असल तरी ,या रुपात तिला ' गती  ' आणि ' सौंदर्य  ' दोन्ही प्राप्त होण्याच भाग्य मिळत ! गम्मत बघा ,जशी हि सुरकुती , पाण्यावर उमटली तर 'तरंग' होते तीच दुधावर उमटली तर ' साय ' होते ! आणि ' दुधापेक्षा दुधावरची साय , जास्त घट्ट असते ' हे वेगळ सांगायला नकोच ! आणि  हवेवर उठलेले तरंग म्हणजे वाऱ्याची झुळूक ! खचितच  मनाला आनंद देणारी ! मनात उमटणारे भावतरंग म्हणजे पण एक प्रकारच्या सुराकुत्याच असतील नाही ? काही सुंदर तर काही कुरूप !
मात्र एकंदरीत बहुतेक ठिकाणी , यांच अस्तित्व मिटवण्याचाच घाट घातला जातो ! माणसाला सगळ्याच गोष्टीतली नितळता जास्त आकर्षित करते , नाही का ?
परंतु  हीच सुरकुती  जेव्हा नुसती वरवर न रहाता , हातावर थोडी खोलवर उमटलेली असते तेव्हा तीच आपली ' भाग्यरेषा ' ठरते !  आपल विधिलिखित, तिच्या स्वरुपात अधोरेखित झालेलं असत जणू !
एकंदरीत ह्या सुरकुत्या , कुठेही , ' जेवढ्या कमी, तेवढ चांगल' , अशी जरी एक सर्वसामान्य भावना असली तरी एक स्थान अस आहे जिथे त्याचं अल्पसंख्यांक असंण चक्क कमीपणाच मानल जात ! ते स्थान म्हणजे , मानवी मष्तीश्क ! तिथे म्हणजे चक्क  'more the merrier ' असा प्रकार ! म्हणे, त्या एवढ्याश्या मेंदूवर जेवढ्या सुरकुत्या जास्त तेवढा तो मेंदू तल्लख ! असेल बुवा ! Less said the better ! आपल तर बुवा सगळच smooth ! आयुष्यही आणि ……….
………………. निलिमा देशपांडे 


Wednesday, 19 August 2015

मुंबई मेरी जान

ये मुंबई है मेरी जान,
जिंदादिली है इसकी पहचान |

जिंदगीकी यहा तेज है रफ्तार,
जिसमे खुद वख्त भी गिरफ्तार |

हर चीज की यहाँ होती नुमाईश,
हर दिल में एक अधुरी ख्वाइश |

मेहनत परस्त अगर है  इंसान,
मंजिल पाना  है बहोत आसान |

इमान है धरम, इमान है करम,
बेईमानी भी मगर पलती है बेशरम |

लाखो दिलो मे यहा है  ईन्सानियत,
मौजूद है फिर भी शर्मनाक हैवानियत |

अमिरी गरिबी में  जरूर है फासले,
फिर भी जीनेके के है सबमे बुलंद हौसले |

कभी अजनबीको, है अपनाती,
अपनोंको कभी पराया बनाती |

रोती न सोती, सबको लुभाती,
जिंदगी से भी लोहा मनवाती |

समझना नही आसान,
ये है बंबई मेरी जान |
........... निलिमा देशपांडे.p 

Friday, 14 August 2015

कृष्णविवर

गुढ, अकल्पित  किती दडलेले कृष्णविवारा  अंगी,
'गुरुत्वाकर्षण' मुख्य तत्व असे परि जया अंतरंगी.
तारा एक अतिविशाल होई गिळंकृत स्वकेंद्रस्थानी,
ठरे प्रकाश निष्प्रभ, जाई खेचला आप भक्ष्यस्थानी.
करी धारण अणू रेणू वा सहस्त्र सूर्याचे आकारमान,
'उद्रेकात आत्मदहन' ताऱ्याचे, अंतराळात भासमान ,
वसे द्रुष्टी आडच्या सृष्टी, म्हणे जग ' आकाशगंगा',
अगणित प्रकाश वर्ष योजने , कशी मोजावी सांगा.
ना वेळ काळ ना परिमिती च्या उरती  तेथ सीमा,
कुंठित मम अल्पमती,आवरु कैसा मनीचा संभ्रमा?
उकलण्या अज्ञाताचे मर्म ठेविसी दूरस्थ केंद्री लक्ष,
मानवा,परि शोधिसी का कधी स्व मनाचे अंतरिक्ष?

………निलिमा देशपांडे. 

Wednesday, 5 August 2015

मुलगी

'मुलगी' असतेच ग , खरच  लाघवी,
म्हणूनच, 'घरटी एक' तरी जन्मावी.
चिवचिवाटाने तिच्या, सार घर भरत,
खुळावलेल घर, तिच्या भोवती फिरत.
तीच असण, मनाला देत प्रसन्नता,
तीच तर असते घराची खरी संपन्नता.
तीच घेते, आईच्या मनाचा अचूक ठाव,
कळतात तिला चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव.
तिच्या स्पर्शातली जादू, जिभेवर साखर,
विरघळत बापाच काळीजही  कणखर
असतेच ती मुळात स्वभावाने चाणाक्ष,
घरातल्या सगळ्यांवर असत तिंच लक्ष.
" आई,आज तोंड का ग तुझ उतरलय?"
"आई,दाद्याच काहीतरी हल्ली बिनसलय !"
"आई, आबांच्या उशीच कव्हर  फाटलय  "
"आई, आजीच औषध कालच संपलय "
"आई,बाबांचा दिवसेंदिवस वाढतोय घेर "
"आई कामवाली निट काढत नाही ग केर"
होऊ देत मोठी, ती आणि तीची सारी स्वप्न
सोडवू  दे तिचे तिलाच, पडलेले सगळे प्रश्न
पंखातील बळावर, घेईल ती क्षितीज भरारी
तू मात्र, कच न खाता ,कर मनाची तयारी.
कितीही दूर गेली, तरी तुटणार नाही नाळ,
वियोगाच्या दुःखावर, फुंकर घालेल काळ.
कोण म्हणतं, मुलगी चालवत नाही आपला वंश,
तीच्यातही असतोच न आपला एक सुंदर अविभाज्य अंश?
.......... निलिमा देशपांडे.

Monday, 3 August 2015

सोहळे नात्यांचे

कालच 'friendship day'  झाला.  'मैत्री' बद्दल खुप काही लिहिल, बोलल, व्यक्त केल गेल.  हल्ली father's day,  mother's day, valentine day असे विविध नात्यांचे सोहळे साजरे केले जातात शिवाय  rose day,  chocolate day,  ....... आणि असे अगणित days साजरे केले जातात.  काहींच्या मते, हे एक  fad आहे.  पाश्चात्यांच केलेल अंधानुकरण आहे.  " आमच्या काळी नव्हती हो असली थेर !", " आम्हाला नाही वाटली आपल्या नात्यांची प्रदर्शन करायची गरज!", हे आणि असे बरेच शेरे , ताशेरे जुन्या पिढीकडून ऐकायला मिळतात. त्यातही तथ्य नाही अस नाही ! 
          आपल्या कडे म्हणजे आपल्या संस्कृतीत , बहुतांश  नाती,  'गृहीत ' धरली   जातात.  आत्तापर्यंत , एखाद्या नात्यात अभिप्रेत असलेल्या भावना , आवर्जून , वेगळ्या, व्यक्त करायची गरज भासत नव्हती. कारण, त्या  कृतीतून व्यक्त केल्या जाण्याइतकी  त्या नात्यांमध्ये  सहजता होती आणि सहवासही  होता ! पण गम्मत अशी आहे, कि कृतीतून कितीही व्यक्त झाल्या तरी काही भावना , समोरच्या ' आपल्या ' माणसाने , शब्दातूनही बोलून दाखविल्या कि मिळणार समाधान केवळ शब्दातीत असत ! जसा पोकळ शब्दांना अर्थ नाही तसाच नुसत्या यंत्रवत कृतींनाही ! त्यामुळे हि, 'भावनांचे  सोहळे ' साजरे करण्यातही वेगळी नजाकत आहे ! निष्तेज  होऊ पाहणाऱ्या नात्यांमध्ये , पुन्हा एकदा नव्याने रंग भरण्याची , नव्या पिढीची हि एक अदा आहे , अस म्हणायला हरकत नाही.  
             परंतू  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आधुनिकीकरण आणि गतीमानाशीलता हे आजच्या जीवन पद्धतीचे अविभाज्य घटक झाले आहेत . कुणालाही  इथे कशासाठीही थांबण अशक्यप्राय झालंय.कारण ' थांबला तो संपला ' !  एवढ मात्र नक्की , माणसांमध्ये नाती , जिव्हाळा अजूनही आहे. फक्त त्याची  स्वरूप बदलली. कृतीतून दाखवण्याच्या वेळेअभावी , ती व्यक्त करण्याच्या निरनिराळ्या पध्दती  अवलंबण्यात आल्या . मग पाश्चात्यांप्रमाणे एखादा विशिष्ठ दिवस, एखाद्या विशिष्ट्य नात्यासाठी  मुकर्रर करून, त्या विषयीची आपली भावना व्यक्त व्हायला सुरुवात झाली. पण त्यालाही ठराविक मर्यादा होत्या. कारण greeting cards , gifts या सारख्या माध्यमासाठी  होणारा आर्थिक भार उचलण , प्रत्येकाला शक्य नव्हत. परंतु म्हणतात न ' गरज हि शोधाची जननी आहे!' technology develop होत राहिली , आणि social media हे एक अत्यंत सहज सुंदर , सोयीस्कर माध्यम, सर्वसामान्यांच्या  हाती लागलं. Everything and everybody became accessible ,with a click of a button !' ' copy paste ' , ' forward ' केलं , कि तीच एक भावना, असंख्य लोकांपर्यंत निमिषात पोहोचवू शकतो ! technology ची केव्हढी हि किमया ! 
नात्यांची परिभाषाच बदलली ! Everybody, who crosses  our path , becomes a 'buddy' ! रोज नवीन नाती तयार होतात. ज्यात 'commitment' या शब्दाची गरज देखील नाही. उलट ' गरजेपुरतच नात ' , हि संकल्पना रुजत चालली. जेव्हढ्या सहजतेने जुळतात, तेव्हढ्याच सहजतेने संपतातही ! & people ' move on '! कुठलाही खेद , दुःख न बाळगता , नवीन नात्याच्या शोधात! आणि मग या सगळ्या नात्यांच्या रामरगाड्यात , खरी , जवळची , नाती जपायला वेळ कुणाला आहे ? म्हणून मग हे ' days ' ' celebrate ' करण सोयीस्कर होत! वर्षातून एक दिवस त्या नात्याचा ' सोहळा ' केला कि उरलेले ३६४ दिवस परत आयुष्याच्या मागे, मनात कोणतीही अपराधी भावना न बाळगता , धावायला मोकळे ! शिवाय रोजच्या चकोरिबद्द , ' boring' आयुष्यात, तेव्हढाच थोडासा ' time pass '! नाही का ?
……………………. निलिमा देशपांडे. 

Sunday, 2 August 2015

मैत्र

कुणीतरी असाव .....
आपल जीवाभावाच......
हातात हात घालून ज्याच्या,
फिरता याव उन्हाच.

                        कुणीतरी असाव .......
                        जगण्याच वेड असणार .....
                        मुसळधार पावसातही,
                        छत्री शिवाय भिजणार .
कुणीतरी असाव ......
आपल्या आनंदात रमणार ......
रस्त्यावरून खिदळत जाताना,
भोवतालच जग विसरणार .
                        कुणीतरी असाव .......
                        फुलपाखरू होऊन जगणार .......
                        आयुष्यातल्या फुलातलं,
                        मध गोळा करणार.
कुणीतरी असाव ........
हात देऊन सावरणार .........
स्वतः चटके सोसून,
सावली होऊन रहाणार.
                        कुणीतरी असाव .......
                        आपल मन जाणणार .......
                        न सांगताच ज्याला,
                        कळाव अंतर्मन जाळणार.
कुणीतरी असाव ........
आपल्यात एकरूप होणार .......
वेगळ अस्तित्व असूनही,
आयुष्यभर साथ देणार.
                        कुणीतरी असाव .......
                        आयुष्यात नसूनही असणार ......
                        सगळ असूनही _असलेल
                        अधुरेपण पूर्ण करणार. ................निलिमा देशपांडे.


                        
  

सखी

आली बघ सखीबाई , सय तुझी ग आली , 
सोबतीच्या दिसांची चाहूल , सोन पाउली ग आली 
आठवणींची पाखर , मनाच्या कुशीत शिरली , 
शिणावठ्याची चादर आसवांच्या ग धुक्यात विरली. 
उदासीचे मळभ , झाले ग पळभरात दूर , 
खळखळाटाचे ग तुझ्या कानी येताच सूर . 
निमिषात मन माझे झाले ग प्रफुल्लीत, 
उमटले ग हसू ओठांवर माझ्याही नकळत. 
परतुनी आले बघ , सारे ते अल्लड बालपण  
फिरूनी धावे मन, वाचायचे सोनेरी ते क्षण.  
लुटूपुटूचे तंटे अन् लटके रुसवे, फुगवे, 
क्षणात दुसर्‍या, गोबऱ्या गाली, खुदूखुदू ते हसणे.  
तारुण्य ग होते किती बेफिकीर अन् बेफाम, 
होता परि तयाला, स्नेह अन् विश्वासाचा लगाम. 
गुपितांचे गुंजारव अन् हास्याची कारंजी, 
अजुनी ये जणू कानावरती, तयाची ग सारंगी. 
आपुल्याच विश्वात होतो आपण किती दंग, 
प्राक्तने आपुली भिन्न, सुटला आता  ग संग. 
जन्मजन्मांतरीचे ग परि आपुले हे ऋणानुबंध, 
तुटता न तुटतील मैत्रीचे रेशीम अनुबंध. 
............. निलिमा देशपांडे.