Sunday, 6 January 2019

सुख मौक्तिके

सुख मौक्तिके....

क्षण काही आठवता,
भासती ताजे तितके
वळण एक कितीदा,
खुणावी मज इतके

वाटे चुकलासा रस्ता,
प्रारब्ध मात्र ना चुके
ठरवलेली एकदा,
भेट खचित ना हुके

उभा समोर ठाकता,
अधीर नजर झुके
धडधड ती वाढता,
ईश ना थांबवू शके

लेणे सौभाग्याचे लेता,
कुबेराचे धन फिके
मिळे सदा ती तृप्तता,
घास जरी ओले सुके

रोज जगता जगता,
वेचली सुख मौक्तिके
साठवले सारे आता,
जरठ मनी कौतुके

मागे पाहता पाहता,
विरले ते धुके धुके
गोष्ट सांगता सांगता,
शब्द होती मुके मुुके
.......निलिमा देशपांडे.
०७/१०/२०१८,नवीन पनवेल.

पनगत

माझी पहिली मात्रा वृत्तातली कविता
वृत्त  : लवंगलता

पनगत

साम्य जरी का दिसते देशी परदेशीच्या पर्णी,
पेशी पेशी जीवनरस तो देवाची ती करणी.

इवल्या पानी हरितकणांची जगण्यासाठी कर्मे,
होता पनगत चुकली नाही त्यांना शिशिरी वर्मे.

आणि दिसे मग ठायी ठायी परमात्म्याची किमया,
हो ऋतु पालट पलटे तेव्हा सृष्टीचीही काया.

इथली पाने पाचोळा तो जन पायतळी तुडवी,
तिथली करती रंगांची ती उधळण दृष्टी निमवी.

वागणूक का वेग वेगळी शंका मनास यावी,
अहोरात्र 'तो' राखे सृष्टी अपार श्रद्धा ठेवी.

होशी का तू दुःखी कष्टी इथल्या सुकल्या पर्णा,
झाली कर्तव्ये होशी आनंदे तयार  मरणा. 

माती असशी माती होशी का न बाळगी ध्यानी ?
जाण तू जरा असे जरूरी अस्तित्व तुझे अवनी.
........निलिमा देशपांडे.११/१०/२०१८

प्रतिबिंब

वृत्त : हरिभगिनी

प्रतिबिंबं

डोह स्मृतींचा खोल त्यात प्रतिबिंबे माझी धूसरशी
पुलाखालुनी जाता पाणी बरीच आता परकीशी

नकोच वाटे त्या डोही मज विहार करणे आताशा
चेहरे आणि मुखवटे यांत होते गल्लत अंमळशा

मारे सुळकी घेई उसळी आठवणींची मासोळी
वाट अनवट नि धुके पांढरे उगी मनाला झाकोळी

जीवन गेले वाया सारे जपली केवळ ती  प्रतिमा
माझे होते मजपाशी जे जाणली न का मी गरिमा

बदलली आणि या वळणावर सुख दुःखाची परिभाषा
प्रतिमेहूनी ती होती प्रिय  मज प्रतिबिंबे आताशा
.......निलिमा देशपांडे.
१६/१०/२०१८, नविन पनवेल.

ओझे


ठसा


दादा.....


कैसे कह दे.....