जीवनसंध्या......
बसले होते एकटीच, त्या अफाट दर्या किनारी, एका संध्याकाळी.नजर जाईल तिथवर पसरलेलं पाणी. अस्ताला चाललेला तो सुर्य ! आपलं प्रकाशाचं साम्राज्य आवरून गुंडाळून घेऊन क्षितिजावर विलीन होण्याच्या तयारीत होता. आणि अंधार, आसमंत व्यापून टाकायला उतावीळ झालेला.प्रकाश आणि अंधार या दोन परस्परविरोधी शक्तींच्या सहअस्तित्वाचा अल्पावधी !
विचारांच मोहोळ नेहमीप्रमाणेच घोंघावत होतं मनात. आयुष्याची देखिल संध्याकाळ जवळ येत होती. तन मनातच नाही तर पूर्ण आयुष्यातच झिरपत होता तो सोनेरी संधीप्रकाश. समोर, उसळणा-या लाटांचा देखिल आवेग किना-याला येईपर्यंत ओसरून जात होता. दृष्टी जरी, आजूबाजूची सृष्टी टिपून घेत होती, तरी तो निव्वळ अंगवळणी पडलेला, संवेदनेचा एक सोपस्कार होता. मन मात्र, आयुष्याचा लेखाजोखा मांडण्यात गुंतलेल होतं.
मन:पटलावर उजवीकडे जमेचा रकाना आणि डावीकडे खर्चाचा. हा देखिल अंगवळणी पडलेल्या सोपस्कारांपैकीच एक !
जगायचं राहून गेलेल्या क्षणांची, कितीतरी पोतडी, मनाच्या वळचणीला गाठी मारून भिरकावलेली होती. कारण थांबायला वेळ कुठे होता ? घड्याळाच्या काट्यावर धावणं .....एवढंच माहित होत शरीराला. मनाला काय वाटतं....याचा विचार करायला उसंतच कुठे होती ? पापणी जरी लवली किंवा एखादा श्वास जाणीवपूर्वक घ्यावा म्हटलं तरी तेव्हढ्यात, जगाच्या आणि जगण्याच्या स्पर्धेत, योजने मागे पडण्याची धास्ती ! म्हणूनच, आला क्षण वळचणीला टाकायचा, फुरसतीने जगण्यासाठी आणि सतत पळत रहायचं, हातचं सोडून पळत्यापाठी ! सवयच लागलेली.
त्या सा-या गाठोड्यांवर, आता विस्मृतीच्या धुळीचे, थर च्या थर साचले होते. ती आता एक एक करून काढली. त्यावरल्या धुळीवर हळूवारपणे फुंंकर मारली. धास्ती वाटली....इतकी वर्ष जपून ठेवलेल्या या खजिन्याची उगाच, आता मोडतोड व्हायला नको . काही पोत्यांच्या निरगाठी सोडवताच आल्या नाहीत. थोडा वेळ निष्फळ प्रयत्न करून तो नाद सोडून दिला. ती परत जागच्या जागी ठेवली. 'नंतर कधीतरी साठी' ! काही पोत्यांच्या मात्र सुरगाठी अलवार सोडवता आल्या. आणि उघडून पाहिलं तर काय...त्या शिल्लक टाकलेल्या सा-या क्षणांच्या आता आठवणी झालेल्या. आणि काय विचारता, अनादी कालापसून याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत असल्यासारख्या सगळ्या आठवणी भराभर बाहेर पडल्या. डिवचलेल्या वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा.
पण आता मात्र पाहिलेल्या पावसाळ्यांचा अनुभव माझ्या गाठीशी होता. नाही करू दिली मी त्यांना माझ्यावर कुरघोडी! भावनेच्या आहारी न जाता अगदी बरोब्बर एकेका आठवणीची वर्गवारी केली. काही खर्चाच्या बाजूच्या नोंदी, होत्या अजूनही तितक्याच क्लेशकारक ! काही सलणा-या ! काही मात्र काळाच्या आणि अनुभवाच्या दगडावर घासून बोथट झालेल्या. कितीही कोरडं रहायचं ठरवलं तरी काही आठवणींनी केल्याच ओल्या डोळ्यांच्या कडा ! ओठांनी आणि जिभेनी, चाखली क्षारयुक्त पाण्याची चव, मधुनच थोडी कडवट सुध्दा ! समोरचं पाणी देखिल त्यापुुुुढे कदाचित गोड ठरलं असतं. डोळ्यातल्या समुद्राला अचानक आलेल्या भरतीने, धुुसर झाली ती मावळती आणि वर्तमान सुध्दा !
पण निकराने हिशोब मांडायला सुरुवात केली. आणि अहो आश्चर्यम! चक्क माझ्या जमेच्या रकान्यात, खर्चाच्या रकान्यापेक्षा कितीतरी जास्त नोंदी होत्या. कारण यापूर्वी काही नोंदी ज्या खर्चाच्या रकान्यात होत्या , त्याच आता जमेच्या बाजूला येऊन बसल्या होत्या. नीट निरखून पाहिलं तेव्हा लक्षात आलं.....ह्या आठवणी..जशा अनेक उत्कट क्षणांच्या होत्या तशाच....तेव्हा अगदी ...सुमार....म्हणून कानाडोळा केलेल्या प्रसंगांच्याही होत्या.
आईने कितीतरी वेळा केलेल्या त्याच त्याच सुचना.....तेव्हा आपण तिचा खुप राग राग केलेला......आणि नंतर हाताला लागलेल्या आठवणीत....त्याच सगळ्या सूचना मीही माझ्या लेकरांना परत परत दिलेल्या आढळल्या . शाळेतून घरी आलेल्या लेकिचं अवती भवती बागडणं, शाळेतल्या गमती जमती सांगताना, तिने केलेला चिवचिवाट.....तेव्हा कामाच्या रगाड्यात असलेल्या आपली चिडचिड झालेली....शांतता हवी होती थोडी डोक्याला....आणि आज....आज तीच शांतता, खायला उठते.पण आत्ता त्या चिवचिवाटाचे नुसते पडसाद आले कानी...आणि...आटून गेलेली ममता वात्सल्य , पुन्हा दाटून आली सारी.हे आणि पुढच्याही आयुष्यातले असेच कितीतरी छोटे छोटे प्रसंग !
आता नकळत मनाच्या दर्याला भरती आली. आनंदाच्या लाटांनी मला आपल्या आवेगात चिंब भिजवून टाकलं.परत एकदा डोळे भरलेच ! दृष्टी अन् सृष्टी अस्पष्ट झाली. पण यावेळी मात्र पाणी गोड लागलं.. आणि पहिल्यादाच जाणवलं..... आनंद, समाधान, तृप्ती .....यांचा झरा शोधण्यासाठी आत्तापर्यंत वणवण केली, त्याचा स्त्रोत ...बाहेर कुठे नव्हताच. माझ्या मनातच होता. या छोट्या छोट्या क्षणात होता.या जाणिवेनेच तृृषार्त चातक तोषला.आकाशात मागे उरलेला तो सोनेरी वर्ख माझ्या देहालाही उजळवून गेला.
आजच्या संध्येने मला जगण्याची नवीन कला शिकवली होती. अंधाराचं साम्राज्य पसरेल आता हळूहळू. पण आता भिती नाही वाटणार त्या तिमीराची. तो तरी कुठे अमरपट्टा घेऊन आलाय ?
पावलं आपसुकच घराकडे वळली. एक मात्र खुणगाठ पक्की बांधली मनाशी....घरी गेल्यावर त्या निर्गाठी बसलेल्या गाठोड्यांचा देखिल हिशोब लावायचाच. आता, मिळालेला प्रत्येक क्षण ख-या अर्थाने जगायचा. या पुढे आयुष्य शिलकीत टाकायचं नाही. नाहीतरी आपल्या माघारी....त्याचा दुस-या कोणाला उपयोगही नाही आणि...त्याचा हिशोब लावायला वेळ तरी कुठे होता, बाकी कुणाला !!!!!
.............निलिमा देशपांडे.
27/05/2017,New Panvel.

No comments:
Post a Comment