Monday, 15 June 2015

सागर किनारी ........

नजर ठरेपर्यंत समोर पसरलेला अथांग सागर!  पाण्याच्या निळाई  अन हिरवाईच्या विहंगम  संगमाची  अपूर्वाई !  किनार्यावरच्या एका मोठ्या खडकावर बसलेले आम्ही ! वेगवेगळ्या वयोगटाचे, मानसिकतेचे ! तरीही आम्हाला एकमेकांची 'गर्दी' न वाटता 'सोबत' वाटत होती. निसर्गाच्या त्या असिमित व्याप्ती पुढे , आमचं अस्तित्व नगण्य वाटत होत, किंबहुना आम्ही आमचं अस्तित्व विसरूनच गेलो होतो. फक्त अनिमिष नेत्रांनी , चाहुबाजूच अफाट सौंदर्य, डोळ्यात साठवण, पिउन घेण, त्यात आकंठ बुडण , अश्या वेगवेगळ्या प्रक्रियेत, आपापल्या मानवी कुवतीनुसार प्रत्येकजण दंगला होता. म्हणूनच म्हटलं कुणालाच कुणाची 'गर्दी ' वाटत नव्हती. 'स्वर्गिय आनंद' , याहून काही वेगळा असेल का ? 
मनाची अवस्था फार संभ्रमित झाली होती. आपण या अलौकिक क्षणांचे साक्षीदार आहोत , याच समाधानही होत आणि तरीही एक हुरहूर , असहायता ! त्या अद्वितीय निसर्ग निर्मितीला आपण कोणत्याही माध्यमातून, पूर्णपणे व्यक्त करायला  , योग्य न्याय द्यायला असमर्थ आहोत , याची खंत ! स्वतःच खुजेपण जाणवत होत ! अर्थात हे सारे पुसटते, निसटते विचार होते ! मन केव्हाच तद्रुप झालेलं निसर्गाशी !
ह्या सागराच्या पाण्याविषयी नेहमीच एक गूढ आकर्षण वाटत आलंय . एकीकडे उसळणाऱ्या लाटांच चैतन्य नकळत आपल्यात सामावत,  किनाऱ्याच्या  मिलनासाठी आसुसलेली  उताविळता , क्षणिक मिलना  नंतर होणाऱ्या अपरिहार्य ताटातुटीची अगतिकता , लाटेगणिक मनाला भिडते  आणि दुसरीकडे त्याचं पाण्याचं, ठाव नसलेलं गहिरेपण, मनात एक अनाहूत भीती निर्माण करत. किती गूढ गुपित सामावलेली असतील ह्याच्या गर्भात ? 
आणि मग तशात  वरुणालाही  आपली उपस्थिती लावण्याचा मोह आवरता आला नाही तरच नवल ! पण आला तोही अल्वारच ! समोरून , उसळणाऱ्या लाटांचे अन पाठीवर भुरभुरणाऱ्या पावसाचे तुषार !तन , मन चिंब झालेलं  ! सिंगापूरच्या त्या किनाऱ्यावर , विदेशवारिच स्वप्न पूर्ण करत  आम्ही सारेच साजरा करत होतो तो निसर्ग सोहळा !

………………………. निलिमा देशपांडे. 

No comments:

Post a Comment