आज लेकीचा वाढदिवस आहे ...म्हणून....
मिनू साठी खास....
कधी बदलली ग, तुझ्या डोळ्यातली स्वप्नं?
कधी घेतली अल्लडपणाने, तारुण्य सुलभ वळणं ?
कधी गुंडाळून ठेवलास तुझा भातुकलीचा खेळ ?
संस्कार आणि संगोपनाचा, मी सांधत बसले मेळ.
पण थांबलं नाही व्हायचं, अळीचं फुलपाखरू,
एक स्वतंत्र व्यक्तीमत्व, लागलंय साकारू.
मात्र एक गोष्ट आता, प्रकर्षाने येत्येय लक्षात,
नवीन पिढीचं प्रतिनिधित्व, करत्येस तू साक्षात.
नाही प्रतिक्षा तुला, घोड्यावरून येणा-या राजकुमाराची,
धमक आहे तुझ्यात, स्वबळावर आयुष्य जगण्याची.
नको विचार करूस " लोकं काय म्हणतील ?"
जी तुझी आहेत ती, तुझ्या बाजूनेच रहातील.
नकोच बाळगूस, स्त्रीत्वाचं बेगडी जोखड,
आत्मसन्मानाशी मात्र, कधीच नको तडजोड!
जा पिला, भरारी घ्यायला तुला मोकळं आहे आभाळ,
प्रत्येक वेळी फक्त, 'फिनिक्स व्हायचं तत्व' सांभाळ.
........निलिमाई.
No comments:
Post a Comment