Friday, 31 July 2015

गुरु

दिला जन्म मज मात पित्यानी,
अलंकृत, वात्सल्य, संस्कारांनी,
केला एक समृध्द प्रवास सुरु,
मातपिता, माझा पहिला गुरु.

लीन सदा  मी देवा चरणी ,
जीवन ,केवळ त्याची करणी!
जाणीव, करी मज पापभिरू,
ईश्वर, माझा दुसरा गुरु.  

ज्ञानार्जन झाले विद्यामान्दिरी ,
शिकलो अर्थार्जन, दुनियादारी,
संस्कार मनी लागले मुरु ,
अध्यापक, माझा तिसरा गुरु .

सादर प्रणाम माझा आप्तांना,
साथ तयांची, मार्गस्थ होताना ,
सुखदु:खी, मन लागे सावरु,
गणगोत, माझा चवथा गुरु .

मानतो ऋण, मी अपत्याचे,
नव पिढी, द्योतक उत्क्रांतीचे,
नव विचार, का न स्विकारु?
तरुणाई, माझा पाचवा गुरू.

कशी विसरावी निसर्ग माया?
दिले, श्वास, घास, छत्रछाया ,
तरले कृपेवर , जीवन तारु,
निसर्ग, माझा सहावा गुरु.

हरेक पांथस्थाचे, काही देणे ,
भल्या बुऱ्या अनुभवांचे लेणे ,
महती तयाची का नाकारु?
असती अगणित माझे गुरु.

दिले दान काही, हरेक क्षणाने ,
चुकलो, शिकलो, कणाकणाने ,
स्वबळावर, काही पाहिले करु,
मीच माझा अंतिम गुरु.

गुरु वीण ना जीवनास आधार,
गुरु दूर करी जीवन अंधःकार
गुरु देई जीवना आकार ||
..................निलिमा देशपांडे .
  

Monday, 13 July 2015

जीवो जीवस्य .......

प्रत्येकाच स्वतःच अस एक विश्व असत. प्रत्येकाच्या जगण्याच्या काही सीमा रेषा असतात. कधी स्वतः घालून घेतलेल्या ! कधी परिस्थितीने आखून दिलेल्या ! 'विश्वची माझे घर' म्हणणारा एखादाच विरळा ! बहुतेक  'घरची माझे विश्व ' असणारेच जास्त ! .मग उरलेल्या जगात चाललेल्या अव्याहत व्यवहारांशी त्याला काही घेण देण नसत.  आणि आता ह्या स्मार्ट फ़ोन्सच्या युगात तर ,  ' मी आणि  माझा फोन' एवढंच विश्व असत.  प्रत्येक जण जणू एका आभासी जगात जगत असतो.  आजुबाजूला घडत असलेल्या घटना त्याला दिसत नाहीत , दिसल्या तरी register होत नाहीत. त्यातलं नाविन्य , वैविध्य, क्वचित आढळणार वैचित्र्य, ह्यातल्या कोणत्याच गोष्टींबद्दल तो संवेदनशील नसतो. कितीतरी अनुभवांना, भावनांना तो मुकतो. पुर्वी, खाली मान घालून उभं असण ह्याचा अर्थ , तो मनुष्य विनम्र आहे , समोरच्याला मान देतोय किंवा त्याने काही लाजीरवाण कृत्य केलंय , असा काढला जायचा.  ' खाली मुंडी , पाताळ धुंडी ' अशी एक म्हण होती. आता मात्र  ' खाली मुंडी' चा सर्वमान्य एकच अर्थ होतो ' mobile texting' !  
अर्थात मीही ह्या सगळ्याला अपवाद नाही ! हल्ली घरात संवाद होत नाही. पण आम्ही मात्र ' वाद ' होत नाहीयेत म्हणून खुश असतो. एक मेकांची मनस्थिती whats app च्या ' status ' वरून कळते. बऱ्याचदा एकमेकांच्या achievements ही ! पण, ह्याचा सल नाही जाणवत कुठे ! मन , भावना  बोथट होत चालल्यात !
तर परवा एकदा पुतण्याच्या नवीन घरात electrical fittings करून घ्यायची होती म्हणून मी आणि लेक पोहोचलो. तो भाग अजून develop होतोय.  त्यामुळे mobile ला net आणि network मिळेना. मग नाईलाजाने दोघांच्याही मुंड्या वर झाल्या , आणि नजर आजूबाजूला भिरभिरली ! "आई , त्या कुत्राच्या तोंडात काय आहे ग ? ", इति लेक.! मन आणि नजर यातलं अधिक अधू काय झालंय , हे माझ्या बाबतीत सांगण जर कठीणच ! " अरे plastic ची पिशवी दिसतेय !" अंदाजाने म्हटलं. " अग नाही ! नीट बघ , पिल्लु आहे त्याच्या तोंडात " जर बारकाईने बघितलं तर खरच तोंडात पिल्लु धरून तो कुत्रा कुठेतरी जात होता ! कुत्री (मादी ) ला तोंडात पिल्ल धरून , इकडून तिकडे , सुरक्षित जागी हलवताना पहिले होते . पण कुत्रा ( नर ) ?मुळात मी श्वान प्रेमी नाही . त्यामुळे या जमातीच्या behavioral pattern चा माझा काही गाढा अभ्यास नाही. ( आणि शाळेत सुध्धा कधी G. K . हा विषय आवडलाच नाही ) त्यामुळे त्यांच्यात पण एवढी 'gender  equality ' आलीये कि काय , असा प्रश्न मनाला चाटून गेला आणि पुढच्या क्षणी लक्षत आल, तोंडात अलगद धरलेलं ते पिल्लु निष्प्राण होत. उगाच गलबलुन आलं. ( म्हणजे मन अजून तेवढ अधू झाल नसावं ! ) आता मात्र कुतूहल जाग झाल. नक्की काय करतोय हा कुत्रा ? हातातल्या , आमच्यासाठी जीव कि प्राण असणाऱ्या पण आत्ता  निष्प्राण झालेल्या mobile चाही चक्क विसर पडला ! आजूबाजूला बहुतेक ठिकाणी नवीन बांधकाम चाललेली होती . समोरचा तो प्लॉट मात्र अजून रिकामा होता. त्यामुळे तिथे बरच rabid टाकलेलं होत. मधेच साचलेल्या पावसाच्या पाण्याची डबकीही होती. कुत्रा , वाट काढत काढत , त्यातून जात होता. बराच फिरल्यावर त्याला हवी तशी जागा सापडली बहुतेक ! पिल्लू तसच तोंडात धरून पायाने ती माती उकरायला सुरवात केली. थोड्या वेळाने खड्डा तयार झाला . त्याने त्या पिल्लाला त्या खड्यात ठेऊन पाहिलं . पण त्याच समाधान झाल नाही. पुन्हा त्याला तोंडात धरून खड्डा खोल केला. दोन तीनदा trial घेतल्यावर , त्याने ते पिल्लु अलगद खड्ड्यात ठेवलं. खुप वेळ तिथेच घुटमळला. मग परत यायला निघाला. मात्र आता त्याला परतीची  वाट सापडेना ! अस का झाल असेल ? त्याच्याही मनात भावनिक कल्लोळ सुरु असतील का ? पुत्र वियोगाच्या दुखाःने त्याच मन सैरभैर झाल होत का ? कोण जाणे ! आम्ही मात्र दोघ त्या काहीश्या असंभव वाटणाऱ्या  दृश्याने भारावून गेल्या सारखे बघत रहिलो. काही वेळाने डबक्यातल्या पाण्यातून पोहून जाऊन त्याने आपला मार्ग शोधला आणि तो रस्त्यावर आला. तेवढ्यात electrician आल्याने आमची तंद्री भंग पावली. मी त्यालाही ती अदभूत घटना कथन केली. तोही भारावून गेला. " मागच्या जन्मीचा पुण्यात्मा असणार तो ! त्या शिवाय अस करणारच नाही " मराठी पापभिरू मणसाच प्रांजळ मत ! पुन्हा आमचा मोर्चा आम्ही घटनास्थळी वळवला आणि आणखीनच भारावून गेलो . माझ्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्यासारख्या वाटल्या मला ! कारण तो कुत्रा परत त्या खड्ड्यापासून काही अंतरावर , खड्ड्याकडे तोंड करून बसला होता. राखण करत बसल्या सारखा ! 
मनुष्य प्राण्याइतकीच , इतर प्राण्यांमध्ये पण वात्सल्य भावना असते का ? आणि तेही एक मादी नाही तर नर व्यक्त करत होता ?  खूप काही वेगळी अनुभूती होती ती ! मलाच नाही तर लेकालाही ते  जाणवले. दोघेही जरा भारावल्या सारखे झालो. 
तेवढ्यात mobile च net आणि network परत आल्याचा साक्षात्कार झाला आणि दोघेही पुन्हा आपापल्या ' जगात ' रमलो . पण हा आनंद फार काळ  टिकला नाही . गेलच network ! अभावित पणे  नजर पुन्हा तिकडे वळली मात्र आणि दोघांचेही घसे एकाच वेळी  कोरडे पडले. कारणही तसच होत ! मघाचा कुत्रा कुठेही नव्हता . मात्र दुसराच एक कुत्रा , कोवळ्या ताज्या  भक्षावर ताव मारून आपली भूक शमवत होता !  अंगावर सरसरून काटा आला ! एका श्वानाने जरी वात्सल्याचा दुर्मिळ गुण दाखवला तरी दुसर्याने मात्र आपली ' जात ' बरोब्बर दाखवून दिली ! 
थोड सावरल्यावर मनात विचार आला , एवढ दचकायला काय झाल आपल्याला ? स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या मनुष्य प्राण्याच्या प्रवृत्तीत देखिल असा विरोधाभास दिसतोच ना ? आणि ' जीवो जीवस्य जीवनं  ' हा सृष्टीचाच तर नियम आहे !!!
………………………निलिमा देशपांडे