Monday, 4 July 2016

झोप

आज जरा काहीतरी हलकं फुलकं... .

झोप......
झोप आहे माझी, माझ्या सारखीच वेडी,
नको तेव्हा जास्त अन् नको तेव्हा थोडी.

सुट्टीच्या दिवशी, पहाटेच जाते उडून,
इतर दिवशी, जाता जात नाही, डोळे सोडून.

तिच्या वेडेपणाची, मला पटतेच खात्री,
जेव्हा सोडून जाते ती मला, अचानक मध्यरात्री.

घरच्या दुलईत, घेते स्वतःला गुरगटून,
जागा बदलली की, बसते फुरंगटून.

'वामकुक्षी' हे तिचं, दुपारचं गोंडस नाव,
गोडाच्या जेवणानंतर, आवरता आवरत नाही राव.

भल्या भल्यांना ती करते, क्षणात ढेर,
आणि वाढवते म्हणे ती, पोटाचा घेर.

'जांभया' ,हे तिच्या आगमनाचे दूत,
जमवते कधी कधी ती, घोरण्यशी सुत.

ओढून घेऊन पापण्या, एकदा का झाली श्रांत,
मग नसते तिला, बाहेरच्या जगाची भ्रांत.

जेवढी गरजेची, देवावरची गाढ श्रध्दा,
तेवढीच आवश्यक माझ्यासाठी, माझी झोप सुद्धा .

कधी असुन अडचण, कधी नसुन खोळंबा,
माझी ही झोप, अशी कशी अगदीच वेडोबा ?
..............निलिमा देशपांडे.'