Thursday, 1 October 2015

तो......

'तो 'आपल्याला गाठतोच! कुठे न कुठे, कधी न कधी.  कितीही टाळलं तरी! कितीही ठरवलं, त्याच्या वाऱ्यालाही उभं रहायचं नाही किंवा त्याला थाऱ्यालाही येऊ द्यायचं नाही, तरीही' तो 'येतोच! कोणत्या तरी अवचित क्षणी, एखाद्या बेसावध वळणावर! तो जणू जातपात, लिंग भेद मानत नाही. त्याला आपल्या वयाशी, आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी, यशापयशाशी, घेण देण नसतं . जसं निराशेच्या खाईत, जणू हात धरून घेऊन जातो, तसाच आनंदाच्या अत्युच्च क्षणी देखील, असू शकतो, आपल्या सोबत!
जेव्हा त्याने असावसं वाटतं, तेव्हा त्याचा मागमूसही नसतो आणि जेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेनेही थरकाप होतो तेव्हा दत्त म्हणून हजर होतो. त्याचं साटंलोटं असतं, ते फक्त आपल्या मनाशी! आपल्याही नकळत या मनानेच त्याला निमंत्रण दिलेलं असतं.  तोही तेवढ्याच तत्परतेने, हक्काने येतो.  आपला जिवलग असल्या सारखा! आणि ठाण मांडून बसतो. अगदी माणसांच्या, विचारांच्या गर्दीत सुध्दा, स्वतः च्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो!
आणि मग मात्र त्याला नीट हाताळणं गरजेचं आहे.  त्याला त्याची जागा वेळीच दाखवून दिली गेली पाहिजे.  डोईजड झाला तर आपल्या पूर्ण आयुष्याचा ताबा घेऊन , आयुष्यातून उठवू शकतो.  'म्हातारपण' हे त्याचं सगळ्यात सहजसाध्य सावध असतं. पण क्वचितच एखाद्याचा तो स्थायीभावच असतो.  
सामान्य माणसाचं आणि त्याचं, सख्य नसतच पण एखादा कलंदर कलाकार मात्र त्याच्या सानिध्यात फुलतो.  कारण तोच देतो कलाकाराला, त्याच्या निर्मितीचा क्षण! त्याचं असणच, एखाद्या महान कलाकृतीच्या निर्मितीला कारणीभूत ठरतं. त्याला सकारात्मक होऊ द्यायचं की नकारात्मक, ते आपण ठरवायचं.
एक, जन्माला येताना आणि दुसर, हा नश्वर देह सोडून जाताना, कुणाला आवडो न आवडो, आयुष्याच्या या दोन महत्वपूर्ण टप्प्यांवर तरी , प्रत्येकाच्या बरोबर असतोच असतो, तो , ' एकटेपणा'!!!
......... निलिमा देशपांडे. 

ए दिल......